Monday, December 9, 2013

दृष्टी


आज बऱ्याच दिवसांनी खोलीचं दार उघडलं.
दाराचा रंग उडालेला.. बिजागिऱ्यांत वंगण नव्हतं.
 धुळीने माखली होती सारी चौकट.
या दाराकडे मी वारंवार पाही. वाटे उघडावं की नको?
काय असेल आत..? काही असेल की काहीच नसेल?
नसेलच, अशी समजून घालून वारंवार या दारावरून जात असे मी.
पण, आज उघडलंच ठरवून दार.
करकर झाली.. ठिणग्या उडाल्या. चटके बसले तशी सताड झाली चौकट.
आत पहिल्यांदा नजरेस पडलं ते सुरकुतलेलं काही..
... हाताला ​लिबलिबित भासलं.. थंड.
काय होतं कळेना..
तिकडे डावीकडे टांगून ठेवलेलं लक्तर दिसलं.. मखमली.
समोर काय आहे ते मात्र कळेना.
या भणंग प्रकाशामुळे काही दिसेना. मग हळूहळू शोधून शोधून लावले दिवे अंधाराचे.
मग लख्ख दिसलं.
..
..
..
..
ही समोर होती आठवण. 
अधांतरीच रुतलेली..
तिच्या नशिबी ना मन ना मेंदू.
भोर काळी.. निपचित.. निर्जीव..
चरा बनून उरलेली केवळ.
................................................................... पुस्तकातून.










Friday, November 15, 2013

संघर्ष


- कोण आहे?
- मी
- आत्ता यावेळी.. अचानक कसा?
- मी मुहूर्त शोधत नाही. मला वाटलं मी आलो. उघड दार.
- ठीकाय. पण आज तुला इथे प्रवेश नाही. मला माहितीये ती नेहमीपेक्षा जास्त तीव्र, आतुर असशील आत यायला. पण, हा दरवाजा आज मी नाही उघणार. तुला परत जावं लागेल. दरवेळी तुझ्या येण्याचं मी स्वागत करत आलो. तुझा यथायोग्य पाहुणचार करत आलो. यापुढेही करेन. पण आज नाही. आज तू कृपया परत जा. आज तुझा भागीदार मला व्हायचं नाही. इथे आलास, की तू आणखी हिंसक होतोस.. तुला आकार येतो. रुप येतं शिवाय, तीक्ष्ण टोकही. आज हे टोक कदाचित मलाच बोचेल. त्यामुळे आज नको. दरवेळी तू तुझ्या नव्या रुपात येतोस. नवा चेहरा.. नवी त्वचा.. नवी नजर.. नवी संवेदना.. आज तू आलायस तो नेमक्या कोणत्या रुपात ते पाहायची हिंमत माझ्यात नाही. ना धाडस. ना कुवत. मला माझ्या भरवशावर सोड. तू तुझा नवा आधार शोध या खेपेला. तुला सत्वर नेस्तनाबूत करण्यासाठी तुला एकटं पाडणंच माझ्या हातात आहे. तू निघून जा. निघून जा. हे बघ, ऐक.. तू कितीही धडका दिल्यास तरी आज मी हा दरवाजा उघडणार नाही. वा तो दरवाजा आज तुटणारही नाही. आज या बंद खोलीतला प्रत्येकक्षण माझा आहे. इथल्या प्रत्येक भिंतीने मला कौल दिला आहे. मी असं का वागलो याचा जाब तूच विचार माझ्या प्राक्तनाला. मिळालं तर मिळेल उत्तर. नाहीतर फिर नागडा दिशाहीन धमन्यांमध्ये. मला फिकीर नाही. ना मला खंत. निघून जा.
विचाराने विचाराला नष्ट करायची, हीच ती वेळ. हो चालता इथून.
अलविदा
............................................................................................. पुस्तकातून.

Saturday, November 9, 2013

प्रतल

चुकलो आहे की चुकतो आहे माहीत नाही.. पण घुसमट होते आहे. म्हणून तुझ्याकडे आलो.. पण वेळ चुकीची होती बहुधा.
पण नाही.. तिथेही मला माझे गाणे म्हणायचे नव्हतेच. त्यात तुझा दोष नाही.. खरच.
मला शान्तता हवी होती तुझ्यासोबत. सैल व्हायचे होते. असो...
हवे तसे झाले नाही की भावनांचा पराजय होतो. त्याचा क्लेश अधिक बोचतो मनाला.
जाऊ दे..सोड विषय.
माझी काही तक्रार नाही. उलट फार मागे लागले की बाब निसटते हातून. जशी तू जाते आहेस क्षणाक्षणांनी.. मग वाटते सोडून द्यावे जे काही अदृश्य अपेक्षांचे पाश आहेत ते.
बघू किती आणि काय उरते..
गैरसमज नको करू.
होइल निचरा..  भावना नेस्तनाबूत झाली की मन कोरे होते.
मला समजतेय.. तुझे मनही बावरले आहे. पण मनातले काही बोलण्यासाठी दोघांची मने एका प्रतलात दिसायला हवीत.
ती आहेत, असे जाणवले की खरेच बोलेन.
......................................पुस्तकातून.

समज

बरोबर.. 
आता मला किमान काही वाटते आहे.
सध्या कमालीच्या अस्वस्थपणात अडकलो आहे.. आता घालमेल, कुतूहल, संदिग्धता, दाम्भिकता, उणीवा असे सगळे पुरते एकवटले आहे..
पहा मला तुझे शेकडो चेहरे दिसताहेत. 
भावनेचे थैमान असुनही पुरते कोरडे पडलेले.. 
मला एकाकी, एकटे वाटू लागले आहे एव्हाना.
आता मात्र मला पुरेसे सूक्ष्म व्हायला हवे. नाविन्याचा मार्ग गर्भातून जातो म्हणतात सुक्ष्माच्या. पण मला गर्भ नाही. 
तो मी तुला कधीच देऊ केला आहे.
तू मला तो परत देशील!!? की...
अरेरे.. तुला ओळखणे बनणार आणखी अवघड.

खेटून उठलेल्या या अस्वस्थ मनोऱ्याने हां माणूस समजणे मुश्किल बनवले आहे.
म्हणून कदाचित मला मी समजत नसेंन.
.................. पुस्तकातून

Friday, November 1, 2013

खरे काय?

कसं होतं असं?
आजवर आपण ना कधी बोललो.. ना कधी भेटलो.. वर्षामागून वर्षं उलटली. तरी आपण एकमेकांना शोधण्याचा यत्न केला नाही. एकमेकांचं अस्तित्व जाणवल्यावरही आपण कधी त्याकडे ढुंकून पाहिलं नाही. असं असताना आज अचानक समोरुन असे भडाभडा काय बाहेर येते आहे. जसे की आपण वर्षानुवर्षे भेटतो आहोत.. बोलतो आहोत.
खरं काय?
आजची भावना की कालची शांतता?
बनावट आहे की नव्याने फुटलेला उमाळा?
हा संवाद आहे की फक्त जाता जाता साधलेला संपर्क?
अंगावर आलेली अनोळखी मनांची ही चक्री मला भंडावून सोडते आहे.
बिनउत्तरांचे प्रश्न निर्माण करते आहे.
या गणगोती फुगवट्याआडचं किती उरेल.. किती सरेल..
माहीत नाही.
पण, संपर्क नको. कारण तो सोपा आहे.
उरतो प्रश्न संवादाचा.
ती जर जाता जाता साधण्याची गोष्ट असती,
तर आज दिसणारा.. नात्यांमधला विमनस्क गुंता झालाच नसता.
............................................................ पुस्तकातून. 

Wednesday, October 16, 2013

जीव कळवळला.. गुदमरला एकटा आत
जन्म जुने, मग फोडिती टाहो सात
विस्कटले.. सुटले नियतीचे हे कोडे
मौनाचे चटके गप्प घेतसे प्रेत.
..................................................... पुस्तकातून.

Thursday, October 10, 2013

स्वागत

अरे तू?
एकदम अचानक आलीस..
काहीच कळवलं नाहीस. ना साधं पत्र.. ना फोन.. ना इमेल.
अशी एकदम कशी काय?
बरं आलीस ते आलीस.. वर अशी एकदम थेट आत..
नाही.. नाही.. राग नाही.
घर तुझंच आहे म्हणा. परवानगीची गरज नव्हतीच.
थोड कळवलं असतंस, तर जुजबी का होईना तयारी करता आली असती..
कसली म्हणजे? तुझ्या स्वागताची.
अहं. आताही करता येईलच. पण, आधी या धक्क्यातून तरी सावरू दे.
तुझं बरंय..
हे असं एकदम येऊन असं सगळं घर एका क्षणात भरून टाकलंस.
मलाच सुचेना बघ काय कराव ते.
काय घेणार? काय आवडतं तुला?
थांब, मीच देतो तुला काहीतरी छान.
अर्रर्र.. पण हे असं होतं..
तू अशी अवचित आल्यामुळे, आत्ता माझ्याकडे काही नाही द्यायला तुला.
नाही म्हणायला तू येताना आणलेलं समाधान तेवढं आहे माझ्यापाशी.
ते मात्र मागू नकोस.
एकदा दिलेली गोष्ट पुन्हा मागत नाहीत आपल्याकडे.
आत्ता आलीयेस. आता असणारच आहेस सोबत. आराम कर.
तोवर मीही ताळ्यावर येईन थोडा.
त्यानंतर सगळे लाड पुरवेन तुझे.
शब्द आहे माझा.
....................................................................... पुस्तकातून


Friday, October 4, 2013

आनंद आणि आकाश


दुःख सोसता येतं. तसा साला आनंद घेता यायला हवा.
..
सोसलेलं दुःख दिसतं माणसाच्या चेहऱ्यावर. आनंदाचं तसं नाही नै.
आनंदाची आलेली लाट कधी ओसरते ते सालं जाणीवेलाही उमगत नाही.
..
आनंदाची व्याख्या काय?
..
आनंदाला तळ असतो काय?
..
आनंदाच्या तळाशी काय असतं?
..
आनंदाची घनता एकसमान असते.. की चढती.. की ओसरती?

एकापेक्षा दोन.. दोनापेक्षा चार आनंद झाले तर? तर व्यक्त कसे करायचे?
..
आनंद होतो. आणखी आनंद होतो. मग तो आनंद गगनात मावेनासा होतो.. असं म्हणतात. मग गगनात न मावणाऱ्या आनंदाचं पुढं काय होतं?
..
आनंदाचं डिसेक्शन करून पहायला हवं.
दुःख त्याबाबतीत सुखी आहे. कारण शोकात्म क्षणांच्या चिरफाडीची गरज नसते.
या सुखाचा आनंद दुःखाला होत असेल काय?
दुःखाला झालेल्या आनंदाची व्याख्या काय?

बरं. हे सगळं बाजूला ठेवू.
..
..
मला आनंद दिसतो?
कसा?
आनंद आहे.. ऐसपैस.. उनाड.
पण, आनंदाला तळ नाही. आनंद मला खोलात नेत नाही.
उलट वर आणतो थंड दरीतून.
भिजवतो.. आणि आणून ठेवतो उघड्यावर.
आनंदापेक्षा माझं मन हलकं आहे बहुधा.
सालं.. आनंदात.. आत बुडत नाही.
आनंदाचा केवळ स्पर्शच हा.
फक्त पडून रहायचं या विस्तीर्ण आनंदावर.
हे असं वरच्यावर तरंगताना घ्यावी वाटते, आनंदातली एखादी डुबकी.
म्हणून मी हळूच डोळे उघडतो..
त्यावेळी माझ्या लक्षात येतं,
या आनंदावर पहुडलं की एरवी माझ्या डोळ्यात मावणारं माझं आकाश इथून मला दिसत नाही.
................................................................................... पुस्तकातून.
 

Wednesday, September 25, 2013

सूचन


तुझ्या डोळ्यांमध्ये आज आकंठ बुडून जावं वाटतं.
असं पाहाणं नवं नाही म्हणा.
तरी आज काहीतरी वेगळं सूचन होतं आहे.
एरवी तुझ्या डोळ्यांमध्ये असलेल्या बहुरंगी चकत्यां मला मोहून टाकायच्या.
त्यांच्यासाठी मग नाइलाजाने तुझ्या डोळ्यांचा पिच्छा पुरवावा लागे.
आजही मला त्या विश्वात्मकी रंगाने लुब्ध केलं.
इतकं, की तपश्चर्या भंग व्हावी.
पण त्यांचं आजचं काम बहुतेक तेवढंच होतं.
आज मला भूरळ पडते आहे ती या मधोमध असलेल्या कृष्ण कंच अवकाशाची.
ही टीचभर जागा लपेटून घ्यावी वाटतोय अंगभर.
लुप्त होऊन जावं का या भोर अवकाशात?
तुझ्या स्वप्नांचं उगमस्थान शोधण्यासाठी?
त्या ठिकाणचं ओंजळभर पाणी निदान पाहता तरी येईल.
त्यामुळे कदाचित पाझरतील डोळे.
 ..
..
..
..
बघितलंस..
या सगळ्या प्रवासात,
तिथे उजळून निघालेला सावळा चंद्र पाहायचा तेवढा राहिला.
.................................................................................................. पुस्तकातून

Sunday, September 15, 2013

छत्रपतींचा मला अभिमान आहे, कारण...

शिवाजी महाराजांचा मला कमालीचा अभिमान वाटतो.
का?
कारण, शिवराय माणूस होते. माझ्यासारखेच दोन हात, दोन पाय, दोन डोळे, एक मेंदू असलेला हट्टाकट्टा मनुष्य होता तो. तरीही त्यांनी आपल्या मनगटातल्या ताकदीने स्वराज्य उभं केलं. शिवराय देव असते तर कदाचित आज वाटणारा अभिमान वाटला नसता मला. कारण, देवच तो. त्याला ‘काहीही’ शक्य आहे. त्यात फारसं कौतुकास्पद ते काय? उलटपक्षी प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करणारे शिवराय मला जास्त प्रिय वाटतात. प्रेरणा देतात.
तसा मला साईबाबांबद्दलही आदर वाटतो.
कारण तोही माणूसच होता. अपूर्व मायेने.. अमाप कष्टाने त्या माणसाने समाजाला शहाणं करण्याचा प्रयत्न केला.

अगदी आजचं बोलायचं तर बाळासाहेब ठाकरेंचा बाणाही मला ​अचंबित करतो.
कारण, बाळ ठाकरे नावाचा एक चित्रकार साठच्या दशकात मैदानात उतरतो आणि तमाम मराठी जनतेला आपलंसं करतो, असं देवाचंही उदाहरण नाही. एक माणूस ‘चला’चा नारा देतो आणि सबंध महाराष्ट्र सोबत चालू लागतो. ही मला कमाल वाटते.
अशा निकषांनी मला संभाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज यांच्यापासून महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, वल्लभभाई पटेल, नेल्सन मंडेला, मदर टेरेसा, दादासाहेब फाळके, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, रजनीकांत, झाकीर हुसेन, ए.पी.जे अब्दुलकलाम, एस.एल.भैरप्पा ही सगळी सगळी माणसं होती.. आहेत. म्हणून त्यांच्या कामगिरीचं मला नेहमीच अप्रूप, कौतुक वाटत आलं आहे.

आता जरा गल्लत झाली आहे.
या सगळ्या माणसांना दैवत्व प्रदान करण्याचा हावरट हेतू आकाराला येतो आहे.
माणसातलं माणूसपण संपवण्याच्या वाटेवर असलेल्या या मारेकऱ्यांना कोण वठणीवर आणणार हा प्रश्न सतत मनात घर करतो.
मनुष्य वंशात जन्म घेऊन त्यांनी पराक्रम केल्यामुळेच त्यांचं मोठेपण सिद्ध होतं. शंकराच्या सागरप्राशनापेक्षा शिवरायांनी करवून घेतलेली आग्र्याची सुटका मला जास्त अचंबित आणि प्रेमात पाडते ती त्यामुळेच. मग या अशा हिमालयाएवढ्या लोकांना जर आपण देवपण दिलं तर त्यांच्या कर्तृत्वाचा तो अपमान आहे, हे आमच्या अजून लक्षातच येत नाही.समजूनच घ्यायचं नाहीय आम्हाला.
कदाचित दैवत्व दिलं की काम सोपं होतं. वर्षातून एकदा सेलिब्रेशन आणि रोज उदबत्तीच तेवढी लावावी लागते.

दुर्दैवाने मी त्याच समाजाचा घटक आहे.
............................................................................................. पुस्तकातून

Friday, August 30, 2013

प्रतीक्षा


ऐन रात्री सगळं शांत होतं. सबंध समाज निद्राधीन असताना मी मात्र सताड जागा असतो. एरवी नकळत हातातून सुटत जाणारी वेळ आता सतत धडका देत असते. एकाच लयीत मेंदूवर साठवेळा धडका देणारा सेकंद मिनिटामिनिटाने पुढे जात असतो. नजरेसमोरून कोणीतरी मुठीतली वेळ बोटं पिरगाळून खेचून नेतो. या संघर्षातून बाहेर पडायला मी माझे डोळे गच्च मिटतो. हात उशाशी घेतो. पण काही क्षणांपुरतं.. रोज येणारं.. रात्रीचं, काही तासांसाठीचं मरण मात्र मला येत नाही. त्याचवेळी तू मात्र अलगद निजून गेलेली असतेस दुसऱ्या जगात. तुझा देह माझ्याशेजारी शांत असतो आणि तुझे मिटले डोळे मात्र पाहात असतात तुझ्या मनस्वी विश्वातल्या नव्या स्वप्नांना.  
तुझा हेवा वाटतो.
एवढ्यात तुझा एक हात माझ्या छातीवर नकळत पडतो आणि सेकंदाच्या सतत बाहेरून येणाऱ्या धडकांशी माझ्या देहाने चक्क दोन हात केलेले मला जाणवतात. बाहेरच्या टीकटीकाटाला आतल्या धडधडीने उत्तर दिलेलं असतं. परंतु, नंतर हे दोन्ही आवाज एकच असल्याचं माझ्या लक्षात येतं.कोणीतरी बाहेरून मेंदू पोखरतंय आणि काहीतरी आतून हृदयाला डिवचतंय असं वाटू लागतं. मी हतबुद्ध होऊन पडून राहतो निपचित.
मी वेळ प्यायलो? की वेळेने मला गिळून टाकलंय ते कळेनासं होतं. मी पुन्हा माझे डोळे गच्च मिटतो. परंतु, मला झोप लागत नाही.
काय गंमत आहे नै. रोज जगण्याची उमेद घेऊन चालणारा मी, आज या दयाघनाकडे भीक मागत असतो ती एका रात्रीपुरत्या मरणाची.
................................................................................................... पुस्तकातून.

Tuesday, August 13, 2013

बऱ्याच वर्षांनी तू पुन्हा माझ्यासमोर येणार. कल्पनेनंच धडधडू लागलंय.
भीतीने नव्हे. पण, अनेक वर्षांपासून भक्कम उभा असलेला माझ्या नजरेआडचा बांध तुझ्या येण्याचा लोट पेलू शकेल की नाही, अशी चिंता वाटते. आजवरचे अनेक प्रवाह येताना दिसले.. काही अनपेक्षित येऊन धडकले. काही नुसतेच येऊन थबकले. पण, त्यांना पेलणं फार सोपं होतं. कारण, प्रलयातून तयार झालेला बांध होता तो. जगबुडी एकदाच येते म्हणतात ना.. तसंच झालं नव्हत का. त्यामुळे या नवनिर्माणानंतर खरंतर मी निर्धास्त होतो. पण, आता तुझ्या येण्याच्या शक्यतेने मी काहीसा गर्भगळीत झालो आहे.
काय करावं.. तुला टाळावं का? ते माझ्यादृष्टीने खरंतर फार सोपं आहे. मग वाटतं का टाळावं आणि कशासाठी? कुणाला वाटेल मी असा लिहितो आहे म्हणजे, तुझ्या-माझ्यात काही असेल भयप्रद.. किंवा अनैतिक काही.. असं तर नाहीच. उलट होतं ते फार प्रेमळ.. मायेपलिकडचं असं काही. मग?
मग कधी वाटतं एकदा भिडूच देत प्रवाह. होऊच देत नजरा नजर.
नेमकं काय वाटतं ते तरी कळेल.एकदा गमेल तरी की आता तो धक्का पचवायची ताकद उरलीये स्वतःत की वयापरत्वे मीही झुकू लागलोय काळापलिकडच्या वृद्धत्वाकडे.
कधी वाटतं, त्यानिमित्ताने कळेल तरी की खूप वर्षांपूर्वी तुझ्या जाण्याने ​ओल्या झालेल्या या भिंतींमध्ये त्यावेळी भोगलेलं थोडं काही उरलंय.. की सगळंच कोरडं ठणठणीत असं सुकून गेलंय सारं. 
कधी वाटतं, गेल्या अनेक वर्षांपासून मी जो ओलावा शोधतो आहे तो पुन्हा मिळवण्यासाठी या स्थितप्रज्ञ बांधापलिकडून जागा करावी का हळूच.
वाटतं, त्याच ओलाव्यावर नवी हिरवी शाल पांघरली जाईल.. हळूच एखादं पान डोकावेल नव्याने. कदाचित नवी जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी म्हणून का असेना, तुझी अबोल भेट अनुभवावी काय?
.................................................................................................. पुस्तकातून.

Thursday, August 1, 2013

एकाचे दोन
दोनाचे चार
चाराचे आठ
आठाचे सोळा.
तुकडे तुकडे होऊ देत सारे.
लहान लहान
एकदम छोटे
इतके बारीक की
गरज वाटली पाहिजे एकमेकांची..
नव्याने उभं राहण्यासाठी.
नव्याने काही घडवण्यासाठी.
म्हणजे त्या निमित्ताने तरी पुन्हा एकजीव होऊ.
आपल्या सर्वांना नव्याने एकरूप होता येतं का.. ते तरी पाहू.
................................................. पुस्तकातून.

Friday, July 19, 2013


पाहा..
माझी कंबर पार झिजून गेलीय.
हातांचे तळवेही पुरते गुळगुळीत झालेत.
पूर्वी असं इथे विटेवर उभं राहिलं की समोर उभी अथांग गर्दी दिसे.
तीही झिजली आणि दृष्टीचा झोत केवळ या चौथऱ्यापुरताच उरला.
आता या वेशीपलिकडच्या गर्दीचा अंदाज येत नाही.
कपाळावरचा गंधही हल्ली ओघळून पुरता पायाशी येतो.
नाही म्हणायला खांदे आणि गुडघे तेवढे मजबूत उरलेत येवढंच.
 पायात बळ आहे तोवर इथून काढता पाय घ्यावा.
इथे वर्षानुवर्ष ठिय्या मारून उभं राहिल्याने माझ्याच काय तुझ्याही पदरात काही फारसं पडलेलं नाही.
बस झालं आता हे असं स्थितप्रज्ञ उभं ठाकणं.
इतकी वर्ष सतत उभं राहूनही
कंबरेपासून हात विलग करण्याचं स्वातंत्र्य आज मला नाही.
उद्या मी केलंच जरी तसं.. 
तर धर्मांध अविश्वास उफाळून येईल अंगावर.
मग.. इतकी वर्षं असं उभं राहून काय मिळवलं आपण?

म्हणूनच आता कंबरेवरचा हात खाली घेऊन पाहावं म्हणतो.
थोडं माझं अवघडलेपण जाईल.. थोडी तुलाही कवेत घेईन.
शिवाय, ठाम श्रद्धेआडचा फाजिल विश्वासही कळेल आपल्याला.
त्यानंतर मात्र तू म्हणतेस तसं वागेन मी.
इतकी वर्ष काही न बोलता निमूट उभी राहिलीस शेजारी.
आता तुझ्या मागोमाग चालेन म्हणतो.
आता लक्षात येतं...
एका जागी तिष्ठत साचण्यापेक्षा प्रवाही राहिलेलं बरं.
..
..
..
पांडुरंग पांडुरंग
...................................................................  पुस्तकातून.

Thursday, July 11, 2013

हत्या

सहज सुंदर हसू दिसणाऱ्या चेहऱ्यांमागे दडलेल्या मनाचा थांग लागणं दिवसेंदिवस अवघड होऊ लागलं आहे. तुम्ही हसताहात.. हसवताहात..
पण, मनाच्या कोपऱ्यात एखाद्या वेदनेने नखं मारून मारून बीळ तयार केलं असेलही कदाचित.
कदाचित उद्या ही वेदना उफाळून येईल आणि घेईल कवेत तुमच्या इतर सर्व भावनांना.
तेव्हा काय कराल?
नैराश्याने वेढलेल्या वेदनेला मारून टाकाल की स्वतःला?
मला भीती वाटते कधीमधी तुमची.
तुमच्या खरेपणाला आजकाल खोटेपणाचे कोंब फुटू लागले आहेत.
तुमच्या सच्चेपणाला शाप आहे घाईचा.
मला भीती वाटते, की तुमच्या या आनंदी चेहऱ्याला फाडून टाकायला नैराश्याचा एक क्षण पुरेसा पडेल की काय अशी.
कारण हल्ली तुम्ही आत्ममग्न होऊ लागला आहात.
भीती वाटते की हत्येचा सूक्ष्म दर्प तुम्हाला खुणावतही असेल कदाचित. जो मलाच काय, तुमच्या सावलीलाही नसेल जाणवला.
अशावेळी मी काय करायचं?
मला हे सगळं खूप नंतर कळतं हो. मला ऐकू येतं तुमच्या शेवटच्या किंकाळीचं मूक तार सप्तक आणि त्यानंतरची असंख्य निरूत्तर प्रश्नांनी भंडावून सोडणारी गच्च शांतता.
शेवटी शेवटी माझ्या मनात एकच प्रश्न ठाशीव होत जातो..
आज तुम्ही तुमच्या कुटुंबाची हत्या केली आहे.
या गर्भगळीत जिवंत शवांची जबाबदारी आता कोण घेणार?
....................................................................................... पुस्तकातून.

Tuesday, July 2, 2013

तलवार

शेवटी तलवार आहे ती. तीसुद्धा दुधारी.
सांभाळून वापरलीत तर तुमच्या फायद्याची. हां.. भले मुठ तुमच्या हाती असली, तरी एक छोटी चूक पडू शकते महागात. तलवारीला काय हो, आडवा येईल तो कापला जाईल.
नाहीतरी पूर्वीसारखी माणसं उरलीत कुठे हल्ली. फार पूर्वी अगदी तलवारही मोडून पडेल अशी व्यक्तिमत्त्वं असायची समाजात. दगडासारख्या शरीरांत जपलेली संवेदना होती. अशाच माणसांच्या हाती हे शस्त्र दिलं जात असे. नव्हे, अशीच माणसं ही तलवार हाती घ्यायचं धाडस करीत.
आजकाल माणसांचं काठीण्यच कमी होत चाललंय. त्यामुळे थेट हृदयाला छेद होणं सोपं झालंय तिला. शिवाय, आजच्या लोकांची सहनशक्तीही आटलीय. ओरखडा उठला की जणू शिरच्छेद झाल्यागत तांडव सुरू होतं. पण तलवार मात्र तितकीच निगरगट्ट.
तिला काय त्याचं? ती तिचं काम करत राहाते. तिला ना तुटण्याचं भय ना भावना ना जाणीवा.
आपलं काम चोख करणं एवढंच तिला माहीत.
हल्ली तलवारीही कमी झाल्यात आणि ती हातात घेणारी माणसंही.
तात्पर्य..
तलवार धारदार आहे. सांभाळा. दुधारी आहे ती. मनगटात ताकद असेल तरच हातात घ्या. नाहीतर तुमचाच शिरच्छेद होऊन तुमच्या रिकाम्या डोक्याचं रहस्य उघड व्हायचं.
........................................................................................... पुस्तकातून.

Sunday, June 30, 2013

फार छान गाता हं तुम्ही.
अहो तुमच्यासारखे ऐकणारे आहेत म्हणून तर आमच्या गाण्याचं कौतुक.
 ..
फार छान लिहितोस तू
तुम्ही वाचता आवर्जून? वा. नक्की वाचत रहा.
 ..
या चित्रातली रंगसंगती केवळ अप्रतिम.
अजूनही आहेत. परवा प्रदर्शन आहे. या बघायला नक्की.
 ..

कलेला प्रतिसादाचा शाप आहे असं वाटतं. प्रतिसाद हवाच. अन्यथा ती कला नव्हे. म्हणजे... गणं ऐकणारा.. लिखाण वाचणारा.. आवर्जून चित्र पाहायला जाणारा नसेल तर मग या कलांनी काय करायचं?  एकटं व्यक्त होण्याचा अधिकार त्यांना नाहीच. शिवाय श्रोते वा वाचकांची ‘आकलनाची लाइन’ ठरवणार कशी? तो पेच आहेच.
म्हणजे पाहणाऱ्याच्या आकलनावर माझी कला अवलंबून. माझं लिखाण मला कच्चं वाटत असलं आणि त्याला प्रतिसाद उत्तम आला तरी ते लिखाण चांगलंच. तेच एखादं उत्तम लिखाण प्रेक्षकांच्या पचनी पडलं नाही तर ते रद्दड? हीच बाब चित्रांची. गाण्याची. गायकाला, कलाकाराला वा लेखकाला काय आवडतं.. तो कुठे अधिक मोकळा होतो हे पाहायचं की नाही? सतत दुसऱ्याला समजेल अशाच भाषेत व्यक्त होत रहायचं कलेतून.
कलाकार बंधनांमध्येच मोठा होतो बहुतेक. 


उगाच काहीतरी निरर्थक लिहिणं हे. काहीतरी खुळ डोक्यात जातं आणि हे असं दूध उतू गेल्यागत होतं अधूनमधून.
असो. 
....................................................................................... पुस्तकातून.


Thursday, June 13, 2013

काय लिहू?
कसं लिहू?
काय होईल लिहिल्यामुळे?
शब्द सांडत जातील एकामागोमाग एक
या पहुडलेल्या पांढऱ्या माळरानावर काळी गोलाई डोलेल.
बदल झाला तर फक्त एवढाच.
बरं, येवढं करून जे म्हणायचंय ते नेमकं उमटेल याची शाश्वती नाही.
समजा, जे जे हवं ते ते लिहिलं जरी,
तरी ते वाचणाऱ्याच्या डोळ्यात उतरेल याची खात्री नाही.
मग कशाला लिहायचं?
आणि काय लिहायचं?
साऱ्या खटाटोपानंतर समाधानाचा शोध संपत नाहीच.
केवळ आणि केवळ ‘ह्याला काही म्हणायचंय बहुतेक’ येवढचं लक्षात येतं समोरच्याच्या.
या शोधातला मैलाचा दगड दृष्टीस पडतो तो हा एवढाच.
................................................................................. पुस्तकातून.

Monday, June 3, 2013

सगळं मागे ठेवून निघून जायचंय इथून.
इथे मळलेली कपाळं आहेत.
जळलेली विषण्ण मनं आहेत.
गोलाई हरवलेले ओसाड मेंदू आहेत.
सतत कोलांट्या मारणारी मतं आहेत.
भर रस्त्यात फतकल मारून बसणाऱ्या नजरा आहेत.
हे सगळं सगळं मागे ठेवून निघून जायचंय.


टाच रोवून उभं राहता येईल
अशा भक्कम जमिनीचा तुकडा हवा आहे.
मतांना तर्कांची भीती नसावी..
उगारलेल्या बोटांना पक्षपाताची बाधा नसावी.
... निघून जायचंय इथून.

कंबरेवरचा वर्षानुवर्षं तसाच ठेवलेला हात झटकायची वेळ आली आहे.
भाळी उतरलेल्या चंद्राला पुन्हा आकाशी जाण्याचा हुकूम द्यायचा आहे.

खांद्यावरल्या धनुष्याला भात्यातल्या बाणाशी परिचय आता व्हायचा आहे.
हातातला कमंडलू फेकून द्यायची तसदी घ्यायची आहे. 

..इथून जाण्यसाठी..
सगळं मागे ठेवून निघून जाण्यासाठी.
......................................................................... पुस्तकातून. 



Sunday, May 26, 2013

ः बाबा गोष्ट सांगा ना.
ः अं... कोणती गोष्ट सांगू..
ः कोणतीही सांगा. डोंगरांची, वाघाची, चिमणीची, माणसाची.. कोणतीही..
ः बरं. ही गोष्ट आहे एका चिमणीची आणि एका पिंजऱ्याची. एका चिमणीला एका पिंजऱ्यात ठेवलेलं असतं. बाहेरचं जग बंद दारातून पाहात असते ती. बाहेर यावं, स्वच्छंदी उडावं असं तिला फार वाटे. पण, पिंजऱ्याचं दार काही तिला उघडता येत नसे.  ही तिची धडपड पिंजरा रोज पाही.  दिवस उजाडला की ती पिंजराभर गोल गोल फिरत असे. दोन गजांमधल्या अंतराचं नव्याने माप घेत असे. पण, त्यात काही बदल होत नसे. पिंजरा हे सगळं शांतपणे पाहायचा. तिची धडपड पाहून अखेर त्याने चिऊशी संवाद साधला. पिंजरा म्हणाला, चिऊ मी सोडतो तुला बाहेर. उद्या सकाळी ये तू माझ्या दाराजवळ. तू आलीच की मी दार उघडेन. चला चिऊ आनंदली. सकाळ झाली. चिऊ दाराशी आली. पण दार काही उघडेना. पहिला दिवस गेला.. दुसरा दिवस गेला..
ः बाबा, पण पिंजरा दार का नाही उघडतेय.
ः अरे पिंजऱ्याला भीती वाटते. तिला मोकळं करावं असं त्याला वाटेही. परंतु, तो धजावत नसे. उद्या उघडलाच पिंजरा आणि गेलीच उडून चिमणी तर..? मग पिंजऱ्याचा उपयोग काय..?  रिकामा पिंजरा ठेवत नाहीत कोणी. शिवाय तिलाही बाहेर खूप लोकांचा त्रास होईल हेही तो जाणून होता.
ः बाबा, आपल्याला हवं तेव्हा बाहेर जाता न येणं म्हणजेच पिंजरा ना. उलट या पिंजऱ्याने उघडावं की दार. जाऊ दे तिला बाहेर. भटकू दे. दमू दे. बागडू दे. तिला वाटलीच भीती कुणाची तर येईल ना परत पिंजऱ्यात. त्याने तिला आत घ्यावं बस्स. असं झालं तर कशाला जाईल चिमणी पिंजरा सोडून. उलट तो पिंजरा उरणारच नाही. ते घर होईल ना तिचं. दोघेही खुश होतील.
ः हं.. बरोबराय तुझं. पण  हे पिंजऱ्याला कळत नाही ना. जो फरक तुला कळला तो प्रत्येकाला समजला तर वेड्या घराचा पिंजरा कधीच झाला नसता. उलट सर्व प्रकारचे पिंजरे ही वेगवेगळी छान छान घरं झाली असती. कळळं? चला. झोपा आता.
ः हं. गुड नाइट
..................................................................................... पुस्तकातून.

Wednesday, May 15, 2013

तूः हल्ली सतत रडत असतोस. बघेत तेव्हा निराश असतोस. सतत दुसऱ्याला दोष देणं वाढलंय तुझं.
मीः दोष. मी कधी दोष दिला तुला. मी फक्त म्हण्तोय की तू पूर्वीसारखी बोलत नाहीस.
तूः तेच सततचं तेच टुमणं. मला या साळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय. बघेल तेव्हा सतत काहीतरी उगाच असंबद्ध बोलत रहायचं. वेडेपणा नुसता.
मीः मी असा नाहीये. मी असा नव्ह्तो.
तूः पण तू आत्ता असाच आहेस. तुझं तुला माहित काय झालंय ते. तू नीट झालास की बोलू.
मीः नीट होण्यासाठीच तर तुझ्याशी बोलतोय.
तूः हे असं बोलणं? अशा बोलण्याने तू मला तुझ्यासोबत नेशील नैराश्यात.
मीः मी तुला नैराश्यात नेईन? मी मित्र आहे तुझा. कधीतरी थोडं जवळ ये. थोडं जवळ घे. विचार ‘तुला काय होतंय? तुला काय म्हणायचंय? कुठे दुखतंय.. काय दुखतंय.. ’
तूः म्हणजे पुन्हा मीच विचारायचं. तुला कळत नाही? तुला अडचण आहे तर तू बोल माझ्याशी.
मीः धीराची गरज आहे. हाताची निकड आहे. थोडा पाठिंबा मिळाला तर येईल बाहेर आपोआप.
तूः लहान पोराच्या उपर चाललंय सगळं. म्हणजे एखादं पोर भोकांड पसरून रडायला लागलं की आपण त्याच्याजवळ जायचं. कारण,  त्याला धड बोलता येत नसतं. त्यामुळे नेमकं काय होतंय हे त्याने सांगण्याचा प्रश्नच नाही. मग ओंजारुन गोंजारुन त्याला शांत करायचं. हे सगळं लहानपणी ठीक आहे रे. एक मिनिट.. एक मिनिट.. म्ह्णजे आता हे सगळं मी तुझ्यासोबत कराव अशी तुझी अपेक्षा असेल तर सॉरी. कारण हे सगळं करण्यात मला रस नाही आणि तूही आता लहान नाहीस.
मीः माणूस बोलायला शिकला म्हणून त्याला दरवेळी व्यक्त होता येतंच असं नाही. किंबहुना अशी अपेक्षा धरणंही गैरच. तू फक्त दरवाजा उघडावास इतकीच माझी अपेक्षा होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट.. तुला वाटेल की तू माझ्याजवळ आल्यामुळे माझा अहं सुखावेल. पण, अशा बहुतेकवेळी तो माणसात उरलेलाच नसतो. उलट तुझ्या आपुलकीच्या चौकशीमुळे तू तुझे दरवाजे माझ्यासाठी खुले करत असतेस. मी त्याचीच तर वाट पाहातो आहे.
.............................................................................................. पुस्तकातून


Monday, May 13, 2013

त्या दिवशी मी निहत्ता होतो. निःशस्त्र.
त्या दिवशी ढगही काळवंडले नव्हते. गडगडाटी आवज नव्हते. सगळं शांत होतं. सूर्य वार्धक्याकडे झुकत होता. चंद्रजन्म दृष्टीपथात होता.. त्याचवेळी नेमका हा बाण असा येऊन पुरता घुसला माझ्या छातीच्या डाव्या बाजूला.
घुसला.. रुतला.. आणि छातीजवळ आतल्या आत तुटला.
वेदना झाली नाही की शरीर फाडून रक्ताने भोकांड पसरलं नाही. शरीर निवांत होतं.
पण, त्या दिवशीपासून सतत एक थेंब स्रवतो आहे.
माझ्या छाताडापासून वर गळ्याच्या दिशेने उलटा.
या एका थेंबाने मात्र मला पुरते हवालदिल करून टाकलं आहे.
ना कोणती खपली.. ना कोणती जखम.
हा येतो कुठून हा जातो कुठे?




Monday, May 6, 2013

तुझ्यासाठी उच्चारलेले शब्द माझ्या तोंडून नेहमीप्रमाणे बाहेर पडतात. पण, आता ते तुझ्यापर्यंत नेहमीसारखे येतीलच याची शाश्वती उरली नाही.
हल्ली ही तुझ्या-माझ्या भवतालची हवा फार चतुर बनली आहे. शब्दांना कोणताही धक्का न लावता त्यांच्या गर्भात दडलेल्या आशयापर्यंत ती बेमालूम पोचते. आणि सरळ साधे वाटणारे माझे शब्द मुखवटा चढवतात काळा. मला त्याची कल्पनाच नसते. पण, तुझी प्रतिक्रिया उमटते आणि मला त्याचा साक्षात्कार होतो. तोवर वेळ नीच. निघून जाते.
मी पुन्हा शब्द जन्माला घालतो. त्यांच्या प्रसुतीपूर्वी पुन्हा पुन्हा ते जीभेवर घोळवतो. चहूबाजूंनी त्यांना नागवं करून वेड्यागत डोळे विस्फारून पाहात राहतो. मग झालाप्रकार तुझ्या नजरेस आणून देण्यासाठी नव्याने शब्द खेळतो. तरी हवेचा सूर बदलतो. वाऱ्याचा नूर पालटतो आणि तुझ्या दिशेने झेपावणाऱ्या अक्षरांची उलटी बाजू मला दिसू लागते. तोच कोन माझ्या दिशेने झेपावतो उलटा. मी पुन्हा भांबावतो.
भांबावतो... कारण मी कधी संवादाच्या या टोकाला असतो. तर कधी त्या टोकाला. मला माझी नेमकी जागाच लक्षात येत नाही.
............................................................... पुस्तकातून.
कणा ताठ आहे. पण, हल्ली इथे खुर्चीत नेहमीच्या जागी पाठ टेकवणं मुश्कील झालंय. थोड्या विश्वासाने इथे अंग टाकलं की खुर्ची वाजते सततची. मग तिला फिरवता येत नाही. हालवता येत नाही. इथे बसायचं तर फक्त एकाच कोनात. खांदे, हाताचे कोपरे, कंबर अशी ताठर हवी. इथे मान वळवायचीही सवलत नाही. त्यामुळे शरीर गोठतंच. काय गंमत आहे.. भल्या भल्यांच्या खुर्च्या मस्त खेळकर असतात. पण, तो खेळ खेळायला लागणाऱ्या कण्याची उणीव या खुर्च्यांना भासत असते. पण इथे.. इथे तिच्या कंबरेलाच मोळे मारलेत लेकाच्यांनी.
हल्ली ती फिरत नाही. हालत नाही. तिच्यावर पाठ टेकली तरी तिला ते झेपत नाही.
पर्याय दोनच. एकतर खुर्ची बदला किंवा बाणा सोडा. 

Tuesday, April 30, 2013


शरीर हल्ली पूर्वीसारखं साथ देत नाही. म्हणजे मनाचं, मेंदूचं शरीर ऐकतं सगळं. तरी हल्ली त्याचं असं वेगळं म्हणणं आहे याचं सूचन सतत होत असतं. दुर्दैवाने शरीराने साथ सोडली की त्याला आपण थेट वार्धक्याच्या गळ्यात अडकवतो. आता तुला वाटेल मी म्हातारा झालो की काय.. पण, तसं घाबरायचं कारण नाही. हिय्या केला तर मन मारतो तसं शरीर मारून काम करता येतंच की. पण, या धबडग्यात त्याचं म्हणणं नेमकं कायाय त्याकडे लक्ष देता आलं नाही मला. आज माझ्या शरीराने बंड पुकारलेलं नाही. पण, त्या मंडळींनी आपापल्या जबाबदाऱ्या, गुणधर्म एकेमकांना द्यायला सुरुवात केलीय. 
काय बोलतोयस तू?
खंरच की. म्हणजे कसं सांगू.. ताजं उदाहरण द्यायचं तर बघ. सध्या माझ्या मेदू आणि मनाने एकमेकांची जागा घेतलीय.  म्हणजे असं मन थेट डोक्यात घर करून राहतं हल्ली आणि मेदू थेट हृदयात घुसलाय. येतंय लक्षात? समोर सुरू असलेल्या सततच्या कोलाहलाकडे एक टक पाहिल्यानंतर एरवी थंड असणारी माझी दृष्टी हल्ली उष्ण झाल्याचं जाणवतं आणि त्याचवेळी खळाळणारं गरम रक्त धमन्यांतून वाहता वाहता थंड पडलेलं असतं. आता तुझ्या नेमकं लक्षात यायला हरकत नाही.
तू.. जाऊ दे. तुझं डोकं ठिकाणावर आलं की बोलू.
हं... सध्या ते पूर्वीच्या ठिकाणी नाही हे खरं. पण, शरीरभर भटकल्यानंतर कुणाला कोणती जागा आवडेल याचा नेम नाही. किंबहुना बाबा रे तुम्ही तुमच्या ठरलेल्या जागांवर जाऊन बसा असं मला आत्ता त्यांना सांगावंही वाटत नाहीय. त्यांना कुठे जायचं तिथे जाऊ दे. मी त्यांना अडवणार नाही.  ते बघ.. आत्ता मला जाणवतंय माझ्या भिरभिरणाऱ्या काळ्या बाहुल्यांनी माझ्या पावलाशी संधान बांधलंय. म्हणून एरवी ठाम असलेलं माझं पाऊल थोडं सरबरलंय आणि कधीही एका जागी स्थिर न राहणारी नजर निश्चित मताने ठाम रुतून बसली आहे.
लिसन.. यू नीड अ ब्रेक..
आय वाँट टू ब्रेक धीस ऑल. त्याच त्या उष्ट्या ताटात जेवणं नकोच. आहे त्या जागीच नवी इमारत बांधायची तर जुनीला पडलंच पाहिजे. नव्या इमारतीच्या नव्या भिंती-नवे जिने, नवी दारं-नव्या खिडक्या.. मग नवा वारा.. आणि आत एका पायावर नाचणारी जास्वंदी हवा. तिचीच तर वाट पाहातो आहे. 
................................................................................... पुस्तकातून. 

 

Wednesday, April 17, 2013

अंधाराला भीती नसते.
कारण, तो खोटा नसतो.
त्याला ना लाज.. ना शरम
त्याला ना ऋतूंची भीती.. ना त्याला प्रकाशाचं भय.
त्याच्याच खांद्यावर झुलत असते पाशवी पिशाच्चांची मान
तो बेभान आहे. तितकाच बेइमान. .
तो थंड तितकाच गप्प.
अंधार विवस्त्र असतो नेहमी.
भीती त्याला नाही.
ते भय माझ्याच मानगुटीवर
कारण, अंधाराला सगळं दिसतं.
वल्कलांच्या आतलं आणि प्राक्तनाच्या पलिकडचंही
............................................................. पुस्तकातून. 

Sunday, April 14, 2013

मीः असं का बसलायस इथे?
तोः विचार करतोय.
मीः कसला?
तोः तण फार झालेत. जमीन नापिक झालीय. काही नव्याने उगवत नाहीय इथे.
मीः अरे उगवेल की. बी पेर. पाणी घाल.
तोः अरे नुस्तं बी पेरून, पाणी घालून नसतं होत काही. जमीन जिवंत लागते.
मीः  ही नापिक झालीय कशावरून?
तोः बघ की. दिसत नाहीत तण. उगवलेलं खुरटं गवत. च्यायला झाडं आहेत तीही काटेरी.
मीः मग काढ ते सगळं. स्वच्छ कर जमीन.
तोः तेच म्हणतोय. एकदाची पेटवून टाकतो हिला. काय ते एकदाच जळून जाऊ दे.
मीः जाळतोस कशाला? धीराने स्वच्छ कर.
तोः अरे तशी व्हायची नाही ती. पार जीवात घुसलाय तिच्या हा ओसाड माळ. जाळावंच लागेल. एकदा जमीन जाळली की स्वच्छ होईल बघ सगळं. त्रास होईल थोडा. सुक्यासोबत ओलंही जळेल. पण, ही सगळी घाण जाईल दारातून.
मीः वा. मग नवी सुरुवात. नवी पेरणी.. नवं बी. नवा अंकुर.
तोः तेच की. नवा अंकुर बघायचा असेल तर जमिनीला जळावं तर लागेलच.
मीः हं.. पण मन जळतंय रे.
तोः मनाच्या जाळाचं कसलं घेऊन बसलास लेका. मनातल्या आगीनं मन स्वच्छ होत नसतं.
मीः असं?
तोः मग. मनातल्या आगीनं मनातले तण वाढतात बाळा. खुरटी, बुरसटली, मरून वर्षं झालेली रोपटी नव्याने वाढतात. बिनपानांची खोडं उगवतात झटाटा. बाबा रे. जमीनीची आग परवडली. पण, मनाची होरपळ  भलती वाईट. नको लाऊन घेऊस मित्रा. होरपळशील. आतल्या आता जळत जाशील. या जाळाला ना धूर ना ज्वाला. तिचं तंत्र वेगळं आहे. थंड करते. शांत करते. नव्या कोंबांना शमवून टाकते.
मीः अरे ए.. कुठल्या कुठे चाललायंस. जमिनीच्या जळण्याबद्दल बोलत होतो आपण.
तोः अहं. ते मी बोलत होतो. तू मनाच्या जळण्याबद्दल बोललास. 
............................................................................ पुस्तकातून.

Tuesday, April 2, 2013

सर, आपण थोर आहात हे मी कधीच अमान्य करत नाही. त्यामानाने मी फारच कनिष्ठ. परंतु, ही वयानुरुप येणारी थोरवी आहे. जन्म आधी झाल्याने तुम्ही अनुभवाने माझ्यापेक्षा जास्त समृद्ध झालात. जन्म कुणाच्याच हाती नाही. आता तुलनेने माझा अनुभव कमी आहे. परंतु, निष्ठेचा आणि वयाचा, जन्माचा फारसा संबंध नाही. जशी मी तुमच्या हेतूबाबत शंका घेऊ नये असं तुम्हाला वाटतं, तसा तोच नियम तुम्हालाही लागू आहेच. आपल्या दोघांची क्षेत्रं परस्परावलंबी असली तरी ती भिन्न आहेत. आपण आपापल्याप्रती निष्ठावान आहोत एवढं पुरेसं आहे संवाद साधण्यासाठी. वयाचा दाखला देऊन पुन्हा पुन्हा मला ‘लहान’ भासवण्यात आपण धन्यता मानत असाल, तर.. तर सर मी तुमचं सगळं शांतपणे ऐकून घेईन. पण, मग मी तुम्हाला कालबाह्य ठरवेन.
तेवढं मी करू शकतो. 
................................................................. पुस्तकातून.

Thursday, March 28, 2013

मला सतत असं वाटतं की
तुझ्या-माझ्या भेटीमधले चार शब्द सांडू नयेत.
दहा बोटांच्या मगरमिठीतले कोवळे श्वास उसवू नयेत.
एकांताच्या फुलोऱ्याला पानगळ कधी चिकटू नये.
कुतूहलाच्या अंकुराला लज्जेची दृष्ट लागू नये.
आपुलकीचं चक्र भाळीचं गर्वानेही भेदू नये.


मला सतत असं वाटतं की
या समोर फुललेल्या टपोऱ्या फुलाच्या दोन पाकळ्या हाती घ्याव्यात.
ती कुस्करली उष्णता ओजळीत घ्यावी भरून.
आणि तुझ्या रंध्रारंध्रातून स्रवणारा आनंद टाकावा पिऊन एका घोटात.
मग काय होईल..?? 
अशाने एकिकडे वैकुंठाची यात्रा भरेल.
आणि दुसरीकडे..? 
दुसरीकडे नवजन्माची जत्रा.
...................................................... पुस्तकातून.

Monday, March 25, 2013

मला कुणाशीही बोलावं वाटत नाही.
बोलणं नकोच.
मला घरात थांबावं वाटत नाही.
मला बाहेर पडावं पटत नाही.
मला घोळक्यात थांबणं रुचत नाही.
मला एकांतात राहून सुचत नाही.
मला माझी ओढ नाही.

मला तुझी गरज नाही.
मी असाच आहे. 

पण मला माझी ओढ आहे
मला एकांतात सुचत राहतं.
मला घोळक्यात राहणं रुचत राहतं.
सतत बाहेर असावं वाटतं राहातं.
मला घरी थांबावं वाटतं.
मला मी हवा आहे.
मला तुझीही गरज आहे.

तू कोण?
मी? मी मी.
तू मी कसा? मी मी आहे.
असू दे की. तू मी असलास म्हणून माझं मी असणं बदलत नाही ना.
 असं? म्हणजे मीसुद्धा मी आणि तूसुद्धा मीच आहेस?
होय.
ओह.. ही माझी ओळख नव्यानेच होते आहे मला.
........................................................................ पुस्तकातून.



Thursday, March 21, 2013

तुझ्या आठवणींचा तहानलेला कल्लोळ सतत हिंदोळत असतो बघ. मग आकाश भेसूर वाटू लागतं आणि जमीन ओसाड. तरीही हा कल्लोळ थांबता थांबत नाही. मग एखादी बेसूर उसळी अचानक फिरते त्या आकाशात आणि भेगाळल्या जमिनीत क्षणात अंतर्धान पावते. मग चहूकडे पसरते भकास, कोरडी, दिशाहीन शांतता.
इच्छेची मरणासन्न चाल पाहिली आहेस कधी? शांततेला पडलेली कोरड अनुभवलीयेस कधी?
आता या निष्प्राण जमिनीवर मौनाचं थडगं बांधेन म्हणतो.
भविष्यात का होईना, पण ही तहान भागवायला येशीलच की तू.
त्यानंतर या हवेतली आर्द्रता वाढेल.. जमिनीवर हिरवाई बहरेल. मग, त्या लुसलुशीत डवरलेल्या गवतावरून सरसरत पुढे जाताना तुझ्या नजरेचा पाय अडखळेलच या थडग्यापाशी.
तेव्हा तुझ्या लक्षात येईल, की आता भले सगळं स्थिरस्थावर झालं आहे. 
पण..
पण, आपली इथे येण्याची वेळ चुकली.
................................................................................... पुस्तकातून.  

Tuesday, March 19, 2013

हा खेळ मी लहानपणापासून पाहात आलोय.
तूच नाही का शिकवायला सुरुवात केलीस.
तू तुझा खेळ खेळत रहायचीस. नवनवे डावपेच मला शिकवत रहायचीस.
मी मात्र तुझ्या पदराला धरून हा पसारा विस्फारून पाहात असायचो.
या खेळातली धावपळ.. आणि त्याच्या नियमावलीचा राक्षस पाहून त्यावेळी नकळत तुझ्या बोटाला मी माझ्या तळहाताचा वेढा घातला होता. 
बरोबर.. आत्ता येतंय लक्षात.. हा तोच खेळ आहे.
या खेळातला तुझा डाव तू नेहमीच आनंदाने खेळायचीस. तुझं प्रत्येक पाऊल रेखीव असायचं. मी मात्र तुला हवा तसा.. हवा त्या वेगाने रमत नव्हतो. इतरांपेक्षा काकणभर जास्तच ऊर्जा असूनही माझा एक पाय सतत तुझ्या साडीवर अनाहूत पडलेला असे.
तरीही तू थकत नव्हतीस.. रुसत नव्हतीस..
पण, रिंगण पूर्ण होता होता..
वेढ्यांमधलं बोट निसटून गेलं..
एक पाऊल पडता पडता..
उरलं बळ सरून गेलं..
आता मला एक कळलंय,
तुला हा खेळ खेळण्यात रस नव्हताच कधी.
तुला फक्त मला हे मैदान दाखवायचं होतं..
या मैदानात मला आणून सोडायचं होतं.
तू ते केलंस.
..
..
..
..
..
..
..
उपकार कृतघ्न असतात.
................................................................................... पुस्तकातून.

Sunday, March 10, 2013

टवाळकी.

बाहेर आलं की लगेच धावत सुटायचं.
इथे थबकण्‍याची जागा नाही. की थांबण्‍याची मुभा नाही.
मागे वळून पाहायचं नाही. उगाच उसासे भरायचे नाहीत.
वाटेतला प्रत्‍येक अडथाळा ओलांडत रहायचा..
धडकलात की संपलात.
अडकलात की फसलात..
काही करा धावत धावत
पैसे मिळवा.. पैसे साठवा..
धावत धावत.
वेग वाढवा.. ध्‍येयं आखा..
धावत धावत.
जीव खाऊन धावत सुटायचं.
धावा तेही बेभान नाहीच.
कळळं पाहिजे जमेल तसं..
वळळं पाहिजे हवं तसं..
उडी मारलीत तर पुढची संधी.
उडी चुकली की पडेल तंबी.
आपली स्‍पर्धा आपल्‍याशी.
गेल्‍या वेळच्‍या टारगेटशी.
बघ मित्रा असं असतं लाइफ.

हे लाइफ आहे? साल्‍या फसवतोस काय..
आमच्‍याकडे याला टेंपल रन म्‍हणतात. हातांच्‍या बोटावर आम्‍ही रोज खेळतो तो.
मज्‍जा म्‍हणून.

असं? चलो ये भी अच्‍छा है..
..................................... पुस्‍तकातून.

Friday, March 8, 2013

अपराधी भाव मनात दाटून आला की मनात विमनस्क शांतता येते.
अपरिहार्य शरणांगत भाव असला की खिन्नता मूळ धरू लागते.
स्वैर शरणांगती असेल, तर स्वर्गीय आनंदी शांती...
शांततेचे असे निकष मी नेहमीच लावत आलो आहे.
पण, आज या अनोळखी शांततेचा डोह वेगळा आहे.
इतरवेळी ग्रासलेल्या मौनाच्या तळाचा अंदाज बांधणे माझ्यालेखी शक्य होते.
पण, या कालडोहात उतरणे महाकर्मकठीण.
कारण, भवताली उगवलेली तटस्थता या डोहातून मला वर काढण्यास धजावणार नाही हे निश्चित.
मग, तळ शोधत निघून जाणे हा एकच पर्याय.
पण, तळाच्या अंधाऱ्या गंगेत लागला हाताला चंद्र तर ठीक.
नाहीतर?
नाहीतर काय?




 शब्द बेइमान..
निघून गेले लेकाचे.
....................................................................................... पुस्तकातून..
.

Monday, March 4, 2013

अखेर तुम्ही माझ्यावर मात केलीत.
ज्याने तुम्हाला तुमचं हक्काचं स्थान दिलं..
ज्याने तुम्हाला काय वाटतं याचा सतत ध्यास घेऊन पाठपुरावा केला,
त्यालाच तुम्ही निर्दयीपणे बंदीवान बनवलंत.
आता मला माझं मत नाही. आता मला माझी नजर नाही.
आता मी तुम्हाला वाटेल तेच बोलायचं.. शिवाय, त्याची वेळही तुम्हीच ठरवणार??
माझ्याभवती सतत कोंडाळं करून उभं राहण्यात कसली मानताय धन्यता..??
तुम्हाला त्याशिवाय येतंच काय..
मला बंदिवान बनवून तुम्ही मुक्त होऊ पाहाताय मूर्खांनो..
पण, उलट तुम्हीच अडकवून घेताय एकमेकांच्या पायांना एकमेकांमध्ये.
तुम्हाला तुमचं अवकाश गवसावं म्हणून स्वहस्ताने या मुक्तांगणात सोडणारा मीच होतो.
या अवकाशात तुमच्या असण्याला खमका पाठिंबा देणाराही मीच होतो.
पण अखेर ज्याची भीती होती तेच झालं.
तुम्हाला अविचार शिवला.
तुम्ही उरला नाहीत माझे..
आता बसा चिकटून या शेवाळ्याला.. तुमची शेंबडी लक्तरं घेऊन.
मी घडवलेल्या दुनियेत साल्यांनो मलाच केलंत बेघर??
भडवी.. माझीच प्रसुती पोकळ होती बहुतेक.
पण, तुमची ही वखवखलेली पाठ पुरती लुळी करण्यासाठी..
मी जन्माला घालेन नव्या शिलेदारांना..तुमच्याच साक्षीने.
पाहात बसण्याशिवाय आणि भिरभिरण्यापलिकडे येतंय काय तुम्हाला..??
फरक फक्त इतकाच आहे की पूर्वी थोडा वेळ मागितलात तुम्ही की मी तो खुशाल द्यायचो.
आता वेळ माझ्यावर आहे.
पण मी ती मागणार नाही.
या संतप्त हतबलतेतून प्रवाही काही वाहते होईलच..
आणि तुमचं हे सतत माझ्याभवतीचं घोंगावणं क्षणात मृतप्राय बनेल..
सावधान.
............................................................................................................. पुस्तकातून.

Thursday, February 28, 2013

मला समजून घेण्यात नेहमीच तुझी गल्लत झाली आहे.
तू मला शुभ्र चंद्र दाखवत आलास..
पण मला माझी ओंजळ चांदण्यांनी भरायची होती.
तुला गर्द झाडीतल्या वळणदार काळ्याभोर रस्त्यांचं वेड होतं..
मला सतत ओढ होती ती धुक्यात हरवलेल्या मळलेल्या पायवाटेची.
फुलांनी डवरलेल्या झाडाखाली मला नेऊन
माझ्याही नकळत पाकळ्यांचा पाऊस तुला साधायचा असे..
पण, मला आपणहून पहुडलेल्या या फुलराण्यांना अलगद उचलावं वाटे.
तुला वाटे मी तुझ्यासोबत सूर्योदय पाहावा..
माझ मन मात्र खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या तेजस्वी पात्यांच्या बागडण्यावर असे.
याचा अर्थ तू मला समजून घेण्यातच चूक केलीस असं नव्हे.
अरे, आनंदाच्याही गडद फिक्या छटा असतात. 

आता या रंगात दरदिवशी..
दर प्रसंगी थोडाफार बदल होणं गृहित आहे.
एक नक्की की, या देवाणघेवाणीचा रंग एक असला, की मिळवलं.
म्हणून असं असूनही तू मला आवडतोस.
का माहितीये?
कारण तुझ्या आनंदाचा रंग खरा आहे.
............................................................ पुस्तकातून.


  




 

Sunday, February 24, 2013

निरोप येतात..
फोन होतात..
बोलणी होतात.
गप्पा होतात..
चर्चा होतात..
वाद होतात..
मग...
भेट ठरते.
 कारण ठरतं.
 दिवस ठरतो.
वेळ ठरते.
ठिकाण ठरतं.
पुन्हा निरोप येतात..
काम येतं.
अडचण येते.
वेळ होतो.
भेट फसते.
पुन्हा निरोप येतात.
फोन होतात..
पण, भेट फसवत जाते आपल्याला.
एरवी भेटीतून नाती दृढ होतात असा माझा अनुभव.
तुझा काय असेल तो.. माहीत नाही.
पण, ‘भेट’ हा शेवट असेल का आपला?
म्हणूनच ‘ती वेळ’ येत नसावी.
भेटीनंतर येणाऱ्या पूर्णविरामापेक्षा सतत अधेमधे येणारे हे अल्पविराम, स्वल्पविराम, अर्धविराम बरे.
कारण, इप्सित गाठल्यानंतर येणारं भांबावलेपण गोठवून टाकणारं असतं, हे मी बऱ्याचदा अनुभवलंय.
हे काठिण्य मोडायचं असेल तर डोळ्यासमोर नवं साध्य असावं लागतं.
तुझ्या-माझ्या भेटीनंतर माझ्यासमोर काय इ्प्सित असेल ते नाही माहित मला.
समजा काही आलंच डोळ्यासमोर.. तर तुला ते मान्य असेल का?

......................................................... पुस्तकातून.

Thursday, February 21, 2013


जमिनीपासून दोन इंच वर उडायचं कसंब हाती आलं तेव्हा फार मस्त वाटलं होतं.
इतरांपेक्षा वेगळे असल्याचं समाधान लाभलं होतं.
वेगळ्या दृष्टीचा पर्याय गवसला होता.
आता जमिनीवरल्या काट्यांची तमा नव्हती..
वेगाला सतत मोडता घालणाऱ्या खड्ड्यांची काळजी नव्हती.
तरंगत्या सुखाची लालसा बळावत होती.
आता सर्वांत जास्त वेग आपला..
आता सर्वांत अचूक वेध आपला..
आता बिनबोभाट भटकंती ठरलेली.
आता थांबायचं नव्हतं की कुठे टेकायचं नव्हतं.
..
पण, काळाचं रुप पालटूनही
आलेली ही भरती ओसरेना..
आनंदाची लाट काही सरेना..
वाऱ्याच्या झोक्यांनी काळीज चपापलं. 
फुलल्या छातीत हृदय धडाडलं.
पळते पाय थांबेनात..
जळतो जीव करमेना..

आली लाट ओसरली पाहिजे..
थोडी शांती दे.. थोडं स्थैर्य दे.
आता पाय जमिनीशी हवेत.
नको उडणं.. नको तरंगणं.
 ........................................................ पुस्तकातून.


Monday, February 4, 2013


छान पालक..
छान जन्म..
छान बालपण..
छान शिक्षण..
छान नोकरी..
छान लग्न..
छान मुलं..
छान जगणं..
घालून दिलेल्या वाटेवर फक्त चालत रहायचं.
गवसल्या गोष्टींचा आनंद नाही.
गमावल्या गोष्टींची खंत नाही.
वाट सोडून काही मिळवण्याचा अट्टहास नाही..
की वाटेत आलेल्या अडचणीला लाथाडणं नाही.
मर्यादेपलिकडे जाण्यासाठी झटणं नाही..
आणि नाविन्याची तहान नाही.
 फक्त चालत रहायचं.
वाटेत येईल ते घेत जायचं.
कागदावर मारलेली काही केल्या रेषा सोडायची नाही.
प्रत्येक पाऊल रेषेवर पडलं पाहिजे.
आपली स्पर्धा आपल्याशी?
नव्हे.. आपली स्पर्धा घालून दिलेल्या वाटेशी.
..
..
सरळ रेषेलाही ‘चौकट’ म्हणतात?
.......................................................... पुस्तकातून.


Thursday, January 31, 2013

माझ्या दारातल्या मातीच्या मनात काय आहे काही कळत नाही.
मी तुळस लावली.
बघता बघता सुकून गेली.
मग मी मोगरा घेतला.
मोगरा अंकुरला.. वाढला.. बहरला.. आणि त्यानेही बघता बघता वैकुठाचा मार्ग पत्करला.
इतरांचा हा प्रवास माझ्या दारातल्या कोपऱ्यात असलेला निवडुंग निमूट पाहातोय.
त्याला ना फुलांची आस..  ना  फळाची अपेक्षा.
वयानुरुप आलेली काटेरी अनुभवांची झूल पांघरुन तो मात्र उभा आहे स्तब्ध.
आयुष्यातली हिरवाई न सोडता हा मात्र वाढतो आहे आपल्या नि​​श्चित वेगाने.
सावकाश.. सावकाश....
मिळालेल्या जागेत त्यानं व्यवस्थित बसवून घेतलंय स्वतःला.
एरवी इतरांकडून फुलांची, फळांची अपेक्षा करणाऱ्या मला त्याचं हे थंड निरुद्देशीय जगणं दिसलं कसं नव्हतं?
त्याची वाढ आत्ता का डोळ्यात भरते आहे?
पण, आता त्याने मला मात्र दूर लोटलंय.
आपल्या पानांचे टोकदार भाले त्याने माझ्यावर रोखले
तेव्हाच आलं होतं ते लक्षात माझ्या.
सतत अवहेलना नशिबी आलेल्या या महामानवाने स्वतःचा रस्ता ठरवून टाकलाय.
बेपर्वा, मुक्त.

हं.. या हिरव्या फकिराचं बोट पकडून त्याच्या मागे जाण्याशिवाय पर्याय नाही.

परिस्थितीशी जुळवून घेणं हे मी खूप आधीच शिकायला हवं होतं...
तुझ्याकडून!!

........................................................................................... पुस्तकातून.
 

Monday, January 28, 2013

तुला आठवतंय..
त्या दिवशी मी तुला सहज स्पर्श केला आणि वादाला सुरुवात झाली.
मग हळुहळू शब्द अबोल झाले तशी स्पर्शाची पकड झाली.
त्यानंतर रोमांचकारी झगड्याला सुरुवात झाली.
पण इथे जिंकायचं नव्हतंच कुणाला.
किंबहुना स्वतःवर होत असलेली मात साठवायची होती डोळ्यात आनंदाने.
तू पांघरलेली मोहक काया भेदायची होती जोरकसपणे..
तुझ्या मनात खोलवर रुजलेली मोहक कस्तुरी मुसंडी मारून पाहायची होती.
त्या दिवशी आपण टाकलेल्या प्रत्येक पावलागणिक मी हवा तसा तुझ्यात ओढला जात होतो..
नजरेसमोर होता फक्त हिरवा.. गहिरा.. सुगंधी डोह..
एका अनामिक वेळी अचानक एक अनोळखी क्षण पायाखाली आला
आणि माझ्या शरीरातले त्राण नाहीसे होऊन मी सुन्न झालो होतो.
मिटले डोळे.. पकड.. स्पर्श.. .
त्याक्षणी तुझं मर्म एका हाताच्या अंतरावर येऊन ठेपल्याचा साक्षात्कार झाला मला.
त्यानंतर मात्र तुझ्या सौंदर्यासमोर मी शरणागत झालो.
हे खरंय की मला तुझा मोह होता.
कारण, त्याची खात्री होती  की, जी तू दिसतेस.. ती तू नाहीच मुळी.
मग कोण आहेस तू?
माझा वाद, माझा झगडा त्यासाठीच तर सुरू होता.
तुला मात्र फक्त माझं तुझ्याशी ‘खेळणं’ दिसत राहिलं.
..
..
..
..
काश...
.............................................................................................. पुस्तकातून.

Tuesday, January 22, 2013

हल्ली फुलाचं उमलणंही कृत्रिम वाटतं.
आता झाडाचं वठणंही स्वाभाविक वाटतं.
हल्ली मातीला येतोय रसायनांचा गंध.
आता तुझं नसणं जेवढं खात्रीचं,
त्याहून जास्त वाटतं तुझं असणं खोटं.
आता नाही वाटत तुझ्याशी आतून काही बोलावं.
 ..
..
..
..
..
जरा नीट बघ माझ्याकडे...
 ..
 ..
तुझ्याकडची ‘च’ची बंदूक,
तू माझ्या कानशिलावर ताणलीस .
अन त्यातून सुटलेल्या एका गोळीने...
बघ..
बघ मला कसं जायबंदी करून टाकलं.
कायमचं.
................................................................... पुस्तकातून.  

Thursday, January 17, 2013

मेंदू उघडा पडला की माणूस नागवा होतो.
................................................................. पुस्तकातून.

Saturday, January 12, 2013

घड्याळ बंद आहे.
तिन्ही शिलेदार थिजले आहेत.

कधी नव्हे ती वेळ थांबली आहे.

थांबलेल्या क्षणांचाही मला उबग येतो.
ही वेळही जावी निघून म्हणून मी अटापिटा करतो.
सुरकुतल्या वेळेला वाट देण्यासाठी मी वेगवान होतो.
श्वास गरम होतात.
हाताला लागलेली वेळेची निस्तेज काया मी झटकन उचलतो आणि दोन बोटांच्या चिमटीने कालचक्र पुन्हा पुन्हा फिरवलं जातं.. माझ्याकडून.
... आणि.. आणि..
श्वास-उच्छ्वासाच्या गरम फटीमधून साचली वेळ सरकती होते क्षणार्धात.
 सुटकेचा निःश्वास..
आता वेळेने वेग पकडला आहे..
निघून जाते आहे भराभर..
मी मात्र त्याच जागी खिळलेला.. स्थिर, थिजलेला.

माझ्या गरम श्वासोच्छवासामधलं अंतर रुंदावते आहे..
वेळेचा प्रवाह जोर धरतो आहे.
माझा श्वास..
मंद...
मंद..

थंड..!.
................................................................ पुस्तकातून. 

Monday, January 7, 2013

एरवी क्षुल्लक कारणावरून बाहेर उसळी मारून येणारे शब्द काल मात्र दबा धरून होते.
कोणत्याही स्थितीत बाहेर यायचंच नाही असं धोरण त्यांनी जाहीर करून टाकलं होतं काल.
आपण भेटल्यानंतर पसरलेल्या शांततेवेळीच हा असहकार माझ्या लक्षात आला होता.
पण, सांगू कुणाला आणि कसं?
तुला सांगण्याची गरज नव्हती. कारण, तुझ्याही ते लक्षात आलं होतं.
इथे या अबोल्याबद्दल तू मलाच दोषी ठरवून टाकलंस. मी खरंच आतुर होतो बोलण्यासाठी.
पण, त्यावेळी जाणवलं की श्वास अडकतोय शब्दांत.

काय म्हणायचं समजत नव्हतं.
काय सांगायचंय उमजत नव्हतं.
 ..
..
..
घरी आलो.
एक श्वास मोकळा केला. हर एक शब्द सुटा झाला.
तेव्हा एक लक्षात आलं, की काल माझ्या पुरुषार्थाला कणा नव्हता.
पुढाकार घेण्यामध्येच जर पुरुषार्थ सामावला असेल,
तर काल घ्यायचास की माझा पुरुषार्थ तुझ्याकडे..
किमान सुरुवातीपुरता तरी.
..
 निदान काल तरी माझ्याच पदरात मला माझा चेहरा लपवता आला असता.
.................................................................................................. पुस्तकातून.  

Tuesday, January 1, 2013

काय मागू तुझ्याकडून..??
देशील?

माझ्या  कुवतीला नवं आव्हान मिळेल, असं काहीतरी दे.
माझ्या मेंदूमध्ये रुतून बसलेली..
ठसठसणारी नवनिर्मितीची भ्रांत गळून पडू दे.
माझ्या पंचेंद्रियांमधून वाहू देत की,
विचारांचे खळाळते प्रवाह.
प्राक्तनाच्या खुंटीवर कधीचा अडकवून ठेवलेला
काळाचा कल्लोळ काही वेळापुरता का असेना पण,  माझ्या हातात दे.
वेढून टाकणाऱ्या या नभांगणावर सहज टाकता येईल असं एक पाऊल मला दे.
सवंग, सहेतूक  उद्देशांना बगल देत पुढे जाण्याची किमया मला दे.
तुझ्या पोटात कधीचा गडप झालेला माझा एक मोती
तुझ्याच ओटीतून, मला परत मिळवून दे.
..
..
...
बघ यातलं तुला काय द्यायला जमंतं.

पण हे देणं देण्यासाठी
तुला चोरखिशात लपवलेली पुरचुंडी उघडावी लागेल.
.................................................................................... पुस्तकातून.