Friday, November 15, 2013

संघर्ष


- कोण आहे?
- मी
- आत्ता यावेळी.. अचानक कसा?
- मी मुहूर्त शोधत नाही. मला वाटलं मी आलो. उघड दार.
- ठीकाय. पण आज तुला इथे प्रवेश नाही. मला माहितीये ती नेहमीपेक्षा जास्त तीव्र, आतुर असशील आत यायला. पण, हा दरवाजा आज मी नाही उघणार. तुला परत जावं लागेल. दरवेळी तुझ्या येण्याचं मी स्वागत करत आलो. तुझा यथायोग्य पाहुणचार करत आलो. यापुढेही करेन. पण आज नाही. आज तू कृपया परत जा. आज तुझा भागीदार मला व्हायचं नाही. इथे आलास, की तू आणखी हिंसक होतोस.. तुला आकार येतो. रुप येतं शिवाय, तीक्ष्ण टोकही. आज हे टोक कदाचित मलाच बोचेल. त्यामुळे आज नको. दरवेळी तू तुझ्या नव्या रुपात येतोस. नवा चेहरा.. नवी त्वचा.. नवी नजर.. नवी संवेदना.. आज तू आलायस तो नेमक्या कोणत्या रुपात ते पाहायची हिंमत माझ्यात नाही. ना धाडस. ना कुवत. मला माझ्या भरवशावर सोड. तू तुझा नवा आधार शोध या खेपेला. तुला सत्वर नेस्तनाबूत करण्यासाठी तुला एकटं पाडणंच माझ्या हातात आहे. तू निघून जा. निघून जा. हे बघ, ऐक.. तू कितीही धडका दिल्यास तरी आज मी हा दरवाजा उघडणार नाही. वा तो दरवाजा आज तुटणारही नाही. आज या बंद खोलीतला प्रत्येकक्षण माझा आहे. इथल्या प्रत्येक भिंतीने मला कौल दिला आहे. मी असं का वागलो याचा जाब तूच विचार माझ्या प्राक्तनाला. मिळालं तर मिळेल उत्तर. नाहीतर फिर नागडा दिशाहीन धमन्यांमध्ये. मला फिकीर नाही. ना मला खंत. निघून जा.
विचाराने विचाराला नष्ट करायची, हीच ती वेळ. हो चालता इथून.
अलविदा
............................................................................................. पुस्तकातून.

Saturday, November 9, 2013

प्रतल

चुकलो आहे की चुकतो आहे माहीत नाही.. पण घुसमट होते आहे. म्हणून तुझ्याकडे आलो.. पण वेळ चुकीची होती बहुधा.
पण नाही.. तिथेही मला माझे गाणे म्हणायचे नव्हतेच. त्यात तुझा दोष नाही.. खरच.
मला शान्तता हवी होती तुझ्यासोबत. सैल व्हायचे होते. असो...
हवे तसे झाले नाही की भावनांचा पराजय होतो. त्याचा क्लेश अधिक बोचतो मनाला.
जाऊ दे..सोड विषय.
माझी काही तक्रार नाही. उलट फार मागे लागले की बाब निसटते हातून. जशी तू जाते आहेस क्षणाक्षणांनी.. मग वाटते सोडून द्यावे जे काही अदृश्य अपेक्षांचे पाश आहेत ते.
बघू किती आणि काय उरते..
गैरसमज नको करू.
होइल निचरा..  भावना नेस्तनाबूत झाली की मन कोरे होते.
मला समजतेय.. तुझे मनही बावरले आहे. पण मनातले काही बोलण्यासाठी दोघांची मने एका प्रतलात दिसायला हवीत.
ती आहेत, असे जाणवले की खरेच बोलेन.
......................................पुस्तकातून.

समज

बरोबर.. 
आता मला किमान काही वाटते आहे.
सध्या कमालीच्या अस्वस्थपणात अडकलो आहे.. आता घालमेल, कुतूहल, संदिग्धता, दाम्भिकता, उणीवा असे सगळे पुरते एकवटले आहे..
पहा मला तुझे शेकडो चेहरे दिसताहेत. 
भावनेचे थैमान असुनही पुरते कोरडे पडलेले.. 
मला एकाकी, एकटे वाटू लागले आहे एव्हाना.
आता मात्र मला पुरेसे सूक्ष्म व्हायला हवे. नाविन्याचा मार्ग गर्भातून जातो म्हणतात सुक्ष्माच्या. पण मला गर्भ नाही. 
तो मी तुला कधीच देऊ केला आहे.
तू मला तो परत देशील!!? की...
अरेरे.. तुला ओळखणे बनणार आणखी अवघड.

खेटून उठलेल्या या अस्वस्थ मनोऱ्याने हां माणूस समजणे मुश्किल बनवले आहे.
म्हणून कदाचित मला मी समजत नसेंन.
.................. पुस्तकातून

Friday, November 1, 2013

खरे काय?

कसं होतं असं?
आजवर आपण ना कधी बोललो.. ना कधी भेटलो.. वर्षामागून वर्षं उलटली. तरी आपण एकमेकांना शोधण्याचा यत्न केला नाही. एकमेकांचं अस्तित्व जाणवल्यावरही आपण कधी त्याकडे ढुंकून पाहिलं नाही. असं असताना आज अचानक समोरुन असे भडाभडा काय बाहेर येते आहे. जसे की आपण वर्षानुवर्षे भेटतो आहोत.. बोलतो आहोत.
खरं काय?
आजची भावना की कालची शांतता?
बनावट आहे की नव्याने फुटलेला उमाळा?
हा संवाद आहे की फक्त जाता जाता साधलेला संपर्क?
अंगावर आलेली अनोळखी मनांची ही चक्री मला भंडावून सोडते आहे.
बिनउत्तरांचे प्रश्न निर्माण करते आहे.
या गणगोती फुगवट्याआडचं किती उरेल.. किती सरेल..
माहीत नाही.
पण, संपर्क नको. कारण तो सोपा आहे.
उरतो प्रश्न संवादाचा.
ती जर जाता जाता साधण्याची गोष्ट असती,
तर आज दिसणारा.. नात्यांमधला विमनस्क गुंता झालाच नसता.
............................................................ पुस्तकातून.