Thursday, January 31, 2013

माझ्या दारातल्या मातीच्या मनात काय आहे काही कळत नाही.
मी तुळस लावली.
बघता बघता सुकून गेली.
मग मी मोगरा घेतला.
मोगरा अंकुरला.. वाढला.. बहरला.. आणि त्यानेही बघता बघता वैकुठाचा मार्ग पत्करला.
इतरांचा हा प्रवास माझ्या दारातल्या कोपऱ्यात असलेला निवडुंग निमूट पाहातोय.
त्याला ना फुलांची आस..  ना  फळाची अपेक्षा.
वयानुरुप आलेली काटेरी अनुभवांची झूल पांघरुन तो मात्र उभा आहे स्तब्ध.
आयुष्यातली हिरवाई न सोडता हा मात्र वाढतो आहे आपल्या नि​​श्चित वेगाने.
सावकाश.. सावकाश....
मिळालेल्या जागेत त्यानं व्यवस्थित बसवून घेतलंय स्वतःला.
एरवी इतरांकडून फुलांची, फळांची अपेक्षा करणाऱ्या मला त्याचं हे थंड निरुद्देशीय जगणं दिसलं कसं नव्हतं?
त्याची वाढ आत्ता का डोळ्यात भरते आहे?
पण, आता त्याने मला मात्र दूर लोटलंय.
आपल्या पानांचे टोकदार भाले त्याने माझ्यावर रोखले
तेव्हाच आलं होतं ते लक्षात माझ्या.
सतत अवहेलना नशिबी आलेल्या या महामानवाने स्वतःचा रस्ता ठरवून टाकलाय.
बेपर्वा, मुक्त.

हं.. या हिरव्या फकिराचं बोट पकडून त्याच्या मागे जाण्याशिवाय पर्याय नाही.

परिस्थितीशी जुळवून घेणं हे मी खूप आधीच शिकायला हवं होतं...
तुझ्याकडून!!

........................................................................................... पुस्तकातून.
 

Monday, January 28, 2013

तुला आठवतंय..
त्या दिवशी मी तुला सहज स्पर्श केला आणि वादाला सुरुवात झाली.
मग हळुहळू शब्द अबोल झाले तशी स्पर्शाची पकड झाली.
त्यानंतर रोमांचकारी झगड्याला सुरुवात झाली.
पण इथे जिंकायचं नव्हतंच कुणाला.
किंबहुना स्वतःवर होत असलेली मात साठवायची होती डोळ्यात आनंदाने.
तू पांघरलेली मोहक काया भेदायची होती जोरकसपणे..
तुझ्या मनात खोलवर रुजलेली मोहक कस्तुरी मुसंडी मारून पाहायची होती.
त्या दिवशी आपण टाकलेल्या प्रत्येक पावलागणिक मी हवा तसा तुझ्यात ओढला जात होतो..
नजरेसमोर होता फक्त हिरवा.. गहिरा.. सुगंधी डोह..
एका अनामिक वेळी अचानक एक अनोळखी क्षण पायाखाली आला
आणि माझ्या शरीरातले त्राण नाहीसे होऊन मी सुन्न झालो होतो.
मिटले डोळे.. पकड.. स्पर्श.. .
त्याक्षणी तुझं मर्म एका हाताच्या अंतरावर येऊन ठेपल्याचा साक्षात्कार झाला मला.
त्यानंतर मात्र तुझ्या सौंदर्यासमोर मी शरणागत झालो.
हे खरंय की मला तुझा मोह होता.
कारण, त्याची खात्री होती  की, जी तू दिसतेस.. ती तू नाहीच मुळी.
मग कोण आहेस तू?
माझा वाद, माझा झगडा त्यासाठीच तर सुरू होता.
तुला मात्र फक्त माझं तुझ्याशी ‘खेळणं’ दिसत राहिलं.
..
..
..
..
काश...
.............................................................................................. पुस्तकातून.

Tuesday, January 22, 2013

हल्ली फुलाचं उमलणंही कृत्रिम वाटतं.
आता झाडाचं वठणंही स्वाभाविक वाटतं.
हल्ली मातीला येतोय रसायनांचा गंध.
आता तुझं नसणं जेवढं खात्रीचं,
त्याहून जास्त वाटतं तुझं असणं खोटं.
आता नाही वाटत तुझ्याशी आतून काही बोलावं.
 ..
..
..
..
..
जरा नीट बघ माझ्याकडे...
 ..
 ..
तुझ्याकडची ‘च’ची बंदूक,
तू माझ्या कानशिलावर ताणलीस .
अन त्यातून सुटलेल्या एका गोळीने...
बघ..
बघ मला कसं जायबंदी करून टाकलं.
कायमचं.
................................................................... पुस्तकातून.  

Thursday, January 17, 2013

मेंदू उघडा पडला की माणूस नागवा होतो.
................................................................. पुस्तकातून.

Saturday, January 12, 2013

घड्याळ बंद आहे.
तिन्ही शिलेदार थिजले आहेत.

कधी नव्हे ती वेळ थांबली आहे.

थांबलेल्या क्षणांचाही मला उबग येतो.
ही वेळही जावी निघून म्हणून मी अटापिटा करतो.
सुरकुतल्या वेळेला वाट देण्यासाठी मी वेगवान होतो.
श्वास गरम होतात.
हाताला लागलेली वेळेची निस्तेज काया मी झटकन उचलतो आणि दोन बोटांच्या चिमटीने कालचक्र पुन्हा पुन्हा फिरवलं जातं.. माझ्याकडून.
... आणि.. आणि..
श्वास-उच्छ्वासाच्या गरम फटीमधून साचली वेळ सरकती होते क्षणार्धात.
 सुटकेचा निःश्वास..
आता वेळेने वेग पकडला आहे..
निघून जाते आहे भराभर..
मी मात्र त्याच जागी खिळलेला.. स्थिर, थिजलेला.

माझ्या गरम श्वासोच्छवासामधलं अंतर रुंदावते आहे..
वेळेचा प्रवाह जोर धरतो आहे.
माझा श्वास..
मंद...
मंद..

थंड..!.
................................................................ पुस्तकातून. 

Monday, January 7, 2013

एरवी क्षुल्लक कारणावरून बाहेर उसळी मारून येणारे शब्द काल मात्र दबा धरून होते.
कोणत्याही स्थितीत बाहेर यायचंच नाही असं धोरण त्यांनी जाहीर करून टाकलं होतं काल.
आपण भेटल्यानंतर पसरलेल्या शांततेवेळीच हा असहकार माझ्या लक्षात आला होता.
पण, सांगू कुणाला आणि कसं?
तुला सांगण्याची गरज नव्हती. कारण, तुझ्याही ते लक्षात आलं होतं.
इथे या अबोल्याबद्दल तू मलाच दोषी ठरवून टाकलंस. मी खरंच आतुर होतो बोलण्यासाठी.
पण, त्यावेळी जाणवलं की श्वास अडकतोय शब्दांत.

काय म्हणायचं समजत नव्हतं.
काय सांगायचंय उमजत नव्हतं.
 ..
..
..
घरी आलो.
एक श्वास मोकळा केला. हर एक शब्द सुटा झाला.
तेव्हा एक लक्षात आलं, की काल माझ्या पुरुषार्थाला कणा नव्हता.
पुढाकार घेण्यामध्येच जर पुरुषार्थ सामावला असेल,
तर काल घ्यायचास की माझा पुरुषार्थ तुझ्याकडे..
किमान सुरुवातीपुरता तरी.
..
 निदान काल तरी माझ्याच पदरात मला माझा चेहरा लपवता आला असता.
.................................................................................................. पुस्तकातून.  

Tuesday, January 1, 2013

काय मागू तुझ्याकडून..??
देशील?

माझ्या  कुवतीला नवं आव्हान मिळेल, असं काहीतरी दे.
माझ्या मेंदूमध्ये रुतून बसलेली..
ठसठसणारी नवनिर्मितीची भ्रांत गळून पडू दे.
माझ्या पंचेंद्रियांमधून वाहू देत की,
विचारांचे खळाळते प्रवाह.
प्राक्तनाच्या खुंटीवर कधीचा अडकवून ठेवलेला
काळाचा कल्लोळ काही वेळापुरता का असेना पण,  माझ्या हातात दे.
वेढून टाकणाऱ्या या नभांगणावर सहज टाकता येईल असं एक पाऊल मला दे.
सवंग, सहेतूक  उद्देशांना बगल देत पुढे जाण्याची किमया मला दे.
तुझ्या पोटात कधीचा गडप झालेला माझा एक मोती
तुझ्याच ओटीतून, मला परत मिळवून दे.
..
..
...
बघ यातलं तुला काय द्यायला जमंतं.

पण हे देणं देण्यासाठी
तुला चोरखिशात लपवलेली पुरचुंडी उघडावी लागेल.
.................................................................................... पुस्तकातून.