Friday, November 30, 2012

विनाकारण तू संबंध तोडते आहेस..
तोडलेस म्हणण्यापेक्षा संपवले आहेस..

आपल्या नात्याला येणारा नैसर्गिक मोहोर मला पहायचा होता. त्यातून उमलणारी बारामाही आणि जन्मोजन्मी दरवळणारी फुलं मला अनुभवायची होती. त्यासाठी हवा तेवढा लागणारा वेळ द्यायचीही तयारी होतीच की माझी... अहं.. आपली.

पण, काहीतरी कुठेतरी चुकतंय खरं.

आता वाटतंय नातं उमलण्यासाठी लागणारा वेळ देऊन चूक केली की काय मी.
कारण, आजतागायत हा वेळ संपत

च नाहीये.. उलट जखडून ठेवतोय हिरव्या पालवीला.
हा ताण असह्य होऊन अस्वस्थ होतंय मन.
आता तर विनाकारण आलेल्या या अपराधी वाळवीने घरटं बांधलंय झाडावर.

दिसलेलं हे पहिलं घरटं मोठं होण्यापूर्वीच पाडलेलं बरं. नाही?
कारण, वाळवीच ती.

आत वाटतं
भले नाही मोहोर आला तरी बेहत्तर.
पण आपलं झाड हिरवं तरी राहील.

नाही?

................................................................. पुस्तकातून.
तुझ्याबद्दल असलेल्या माझ्या भावनांचा उद्रेक व्हावा असं मला कधीच वाटलं नव्हतं.
पण, माझं ‘वाटणं’ झिरपत झिरपत तुझ्यापर्यंत पोचावं असं वाटे.
बोलून किंवा तुला एखादं पत्र लिहून त्यांना एखाद्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोचवणं मला नको होतं.
त्या थेट मनीच्या मनीला पोचल्या असत्या तर कुणाला त्याचा पत्ताच लागला नसता.
पण, त्यासाठी एकमेकांचं एकमेकांकडे नीट लक्ष असावं लागतं. तू तर थेट दुर्लक्षच करू लागली आहेस.

आता कुठलं झिरपणं आणि कुठलं काय..
सध्या एवढंच बोलू शकतो. तुझ्याशी या पुढचं बोलण्यासाठी लागणारा धीर आज नाहीये माझ्यात. पण, प्रयत्न सुरू आहे.
आपल्याच मनातलं काहीतरी विवस्त्र होत असलेलं पाहाण्याचा हा अनुभव मला नवा असेल.
तोही घेऊच.
नाइलाज आहे. काय करणार?
......................................................................................... पुस्तकातून.
000000

आता अंगण स्वच्छ आहे.. एैसपैस आहे. आता इथे सुक्या पानांचा कचरा होत नाही.
पक्षांची किलबिल तर केव्हाची थांबली आहे.
आता तापलेल्या गंज गोळ्याला थेट घरात शिरता येतं. पूर्वी असलेला फांद्यांचा अडसर आता नाही.
दिसेल त्याला.. वयाचं भान न बाळगता बिनदिक्कत टपली मारत उनाडक्या करत घरभर फिरणाऱ्या फुलांच्या गंधानेही हे घर कधीचं सोडलंय.
असा सगळा इथे उजाडनामा असताना..मधून तू कुठून उगवलास?
कुठून आलास...? असा आलास?

तुझ्या येण्याने पाहा प्रत्येकाच्या आशेला पालवी फुटलीय इवली.
आपलं चौकटीय जीणं उद्या सुगंधी होणार, असं वाटतंय इथल्या प्रत्येकाला आता.
अरे कोण आहेस कोण तू? नाव काय तुझं?
..
..
..
..
..
..
..
..
..
..
मी प्राजक्त!
....................................................................... पुस्तकातून
हं हॅलो.. बोल..
कशी आहेस..?
मी एकदम मस्त. निवांत.
तुझं बरंय. नेहमी मस्त असतेस तू.
हं..
अगं, मस्त..निवांत यांच्या पलीकडे काही आहे की नाही?
आहे की.
काय आहे?
त्या पलीकडे घाई आणि गडबड आहे.
हो का? आणि अलीकडे?
अलीकडे.. अस्थैर्य आणि असुरक्षितता! पण घाई-गडबड पाचवीला पूजलेली. पण्, या ना त्या कारणाने तुझ्याशी बोलणं व्हायची लक्षणं दिसू लागली की मी या ‘मस्त-निवांत’ बेटावर आपोआप येऊन बसते. तुझ्याशी बोलते. तेवढाच विरंगुळा.
..................................................................................... पुस्तकातून.
यापुढे मात्र सगळं ठीक होईल पाहा..
आता तुला हवं तेव्हा बोलवता येईल
तुझ़्याशी हवं तेव्हा.. हवं तितकं बोलता येईल..
आता वाट पाहाणं नको की उशीराचे वादही नकोत.

आता कललेला सूर्य होता येईल..
डवरलेला चंद्र पाहता येईल..
रात्रीचा गंध होता येईल..

तुझ्या नसण्याच्या सवयीने
माझी किती सोय केली पाहा..

आता खरंच सगळं ठीक होईल.
आणि आता माझीही काही तक्रार नसेल.
................................................................... पुस्तकातून.


00000

सूर्याचं मावळतीला जाणं आता माझ्या सवयीचं होतं.
तो उद्या परत येणार, याची खात्री असल्यामुळेच त्याचं मावळणं तसं चटका लावणारं नव्हतं. उलट आनंदच वाटे त्याची जातानाची रंगांची उधळण पाहून.
पण, परवा पहिल्यांदाच चंद्राच्या मावळतीची चाहूल लागली आणि क्षणभराचा थरकाप उडाला.
चंद्राने असं निघून जाणं मला नवं आहे. उलट तो दिसत नसला, तरी सतत असतोच की सोबत. मग?
गृहित धरणं इतकं जीवघेणं असू शकतं?
मावळतीच्या दिशेने चंद्राचं क्रमण सुरू झालंय. मी हतबल.. हतबुद्ध.
आता आकाश पुन्हा अंधारून येणार.....
............................................................................................... पुस्तकातून.
0000हॅलो..

00000

मी सूर्य असा कुरतडला..
ही सांज अशी विस्कटली..

चंद्रालाही मग मी डसलो,
ही रात्र क्षीण, चुरगळली..

मग स्मरणाच्या झोक्यावरची,
पालवी पोरकी झाली.
.......................................... पुस्तकातून.
00000

000

मालाडवरून ट्रेनने सकाळी ऑफिसला येत होतो.
जोगेश्वरीदरम्यान नेहमीप्रमाणे कडेवर बाळसेदार बाळ घेतलेली एक दरिद्री बाई डब्यात चढलेली मी पाहिली.
बाई भीक मागायची आणि लोकांनी हातावर टेकवलेल्या चिल्लरशी कडेवरचं पोर खेळ करत रहायचं.
भीक मागत मागत ती माझ्यापाशी आली. नेहमीप्रमाणे तिच्या नजरेला नजर न भिडवता मी खिडकीच्या दिशेने पाहू लागलो.
एव्हाना बाई परत फिरली. कडेवरच्या पोराने आपली मान अलगद बाईच्या खांद्याव
र टेकवली आणि माझी नजर त्या बाळाच्या डोळ्यांवर खिळली.
मनात आलं..
हा जन्म घेणं तुझ्या हातात असतं, तर काय केलं असतंस? आला असतास बाहेर? की हा जन्म लाथाडून पुन्हा विरघळून लुप्त झाला असतास आईच्या गर्भात? तुझं असं या जगात येणं पाप म्हणावं की पुण्य?
प्रश्नांनी वेग घेतला..
तोच त्या बाळाने चटकन आपली नजर मला भिडवली. तरल, निरागस, निष्पाप असं कोणीतरी माझ्याकडे तितक्याच थंडपणे पाहात होतं.
ती नजर मला झेपेना.
मी माझी नजर चोरली आणि पुन्हा खिडकीकडे भिरकावली.
पण, या न संपणाऱ्या अन वेगाने मागे सरकणाऱ्या झोपडपट्टीशिवाय मला दुसरं काही दिसत नव्हतं.
व्यक्त व्हायला भाषेची गरज नाही हे मलाही माहितीये.
तसं तुझं व्यक्त होणंही माझ्या डोळ्यांतून सुटलेलं नाही. पण, भावनांची तीव्रता नेमकेपणाने समोरच्याला कळावी म्हणून कधीमधी भाषेचा घेतलाच आधार तर बिघडतं काय?
आवर्जून सांगाव्या लागल्या चार गोष्टी तर त्यात कमीपणा नव्हे.
हे बघ, भावना ही पाण्यासारखी असते. अथांग.. तिचा तळ शोधणंच तसं कठीण आणि मूर्खपणाचं. आणि भाषा ही त्यावरच्या तरंगांसारखी.
तरंग नाहीत म्हणून पाण्याचं अस्तित्त्व शून्य होत नाही, हे खरंच. पण, त्यावर उठलेच तरंग तर त्याचं अस्तित्त्व अधिक गहिरं, जिवंत आणि नितळ होतं.
तुला नाही वाटत असं?
खरं सांग..
..................................... पुस्तकातून.
एकमेकांमध्ये गुंतणं वगैरे बोलायला किंवा ऐकायला बरं वाटतं.
मलाही आवडेलच कुणामध्ये तरी गुंतायला.
पण, समोरच्याची कुवत बघून हा निर्णय घ्यावा लागतो, हे विसरु नको. गैरसमज करून घेऊ नकोस. तू खरंच हुशार आहेस. विचारी आणि तितकाच मनमिळावूही. पण, माझं तुझ्यात गुंतणं तुला झेपेल काय रे?
एकमेकांचं होण्यासाठी व्यक्तिमत्वापेक्षा समोरच्याचं अवकाश बघता आलं पाहिजे. ते एकदा दिसलं की त्याचा आवाका लक्षात येतो. आणि तो एकदा लक्षात आला की मग मत-मतांतरं, स्वभाव, वृत्ती अशा सगळ्या ‘इतर’ गोष्टी गळून पडतात.
बऱ्याच लोकांना हे अवकाश दिसतच नाही रे.
मला तुझं अवकाश गवसलंय. तुला सापडेल काय रे माझं??
सापडलंच जरी, तरी मला सांगू मात्र नकोस. तुझ्या वागण्यातूनच जाणवेल मला ते.
गुंतणं त्यानंतर येतं.
............................ पुस्तकातून.
तुझ्याबद्दल असलेल्या माझ्या भावनांचा उद्रेक व्हावा असं मला कधीच वाटलं नव्हतं.
पण, माझं ‘वाटणं’ झिरपत झिरपत तुझ्यापर्यंत पोचावं असं वाटे.
बोलून किंवा तुला एखादं पत्र लिहून त्यांना एखाद्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोचवणं मला नको होतं.
त्या थेट मनीच्या मनीला पोचल्या असत्या तर कुणाला त्याचा पत्ताच लागला नसता.
पण, त्यासाठी एकमेकांचं एकमेकांकडे नीट लक्ष असावं लागतं. तू तर थेट दुर्लक्षच करू लागली आहेस.


आता कुठलं झिरपणं आणि कुठलं काय..
सध्या एवढंच बोलू शकतो. तुझ्याशी या पुढचं बोलण्यासाठी लागणारा धीर आज नाहीये माझ्यात. पण, प्रयत्न सुरू आहे.
आपल्याच मनातलं काहीतरी विवस्त्र होत असलेलं पाहाण्याचा हा अनुभव मला नवा असेल.
तोही घेऊच.
नाइलाज आहे. काय करणार?
......................................................................................... पुस्तकातून.
तू घातलेला घोळ आत्ता माझ्या लक्षात आलाय.
फार कावेबाज आहेस रे तू.

मला सांग,
पूर्ण डवरलेल्या झाडाला पुन्हा छोटं बियाणं व्हायला आवडेल काय?
रंगांनी न्हाऊन निघालेल्या फुलपाखराला पुन्हा काटेरी सुरवंट होत कोषात जाऊन बसावं वाटेल काय?
अथांग रुपाने शांत पहुडलेल्या सागराला पुन्हा स्वतःला आवर घालत उगमापल्याडचा झरा व्हायला जमेल काय?
नाहीच.
कारण कालानुरुप या सगळ्या गोष्टी तुझ्याजवळ जातात. नव्हे तू सर्वांना ए

कत्र आणतोस.. तुझ्याशी एकरुप होण्यासाठी.

मला मात्र तू तुझ्यापासून लांब ठेवलंस.
माझा प्रवास मात्र तू उलटा मांडलास शिताफीने. मी इथे आल्याआल्याच तुझ्याशी असलेली माझी नाळ तू तोडायला लावलीस.. पद्धतशीर. एका शेवटाचीच सुरुवात म्हणायची ती. आता मी दुरावत चाललोय तुझ्यापासून. तू हसतोयस कधीचा.
हा प्रवास थांबवणं माझ्या हातात नाही खरं. तुझं दुर्दैव एवढंच की तुझी ही चेष्टा मला समजली.
असो

चलो आओ इधर.. जादू देखो जादू..
इथे फुलपाखराचा सुरवंट होतो. मग सुरवंटाचा कोष.

ही गंमत न्यारी आहे दोस्तांनो..
मनुष्य जातीत जन्मलात.. भाग्यवान आहात तुम्ही.
...............................................................................................पुस्तकातून.