Wednesday, February 26, 2014

डॉक्टरांना अनावृत्त पत्र


मा. डॉ. लहाने,
नमस्कार,

खरंतर आपली कधी भेट झाली नाही. बोलायचा प्रसंग तर दूरचाच. पण, तुमच्याबद्दल सुरू असलेल्या घडामोडी पाहता म्हटलं जरा तुमच्याशी बोलणं गरजेचंच आहे. पूर्वी तुम्ही लोकांना भेटायचात. आता तेही मुश्कील. ते मुश्कील व्हावं म्हणून तर पाचर.. असो. मग ठरवलं की थेट पत्रच लिहावं.
बोलण्याचा मुद्दा एव्हाना तुमच्या लक्षात आला असेलच. कायद्याने तुम्हालाही सोडलं नाही. तिकडच्या त्या सफाई कामगाराला काहीबाही बोललात तुम्ही आणि स्वतःच्या करिअरवर धोंडा पाडून घेतलात ना. आता काय बोललात.. कसं बोललात हे कळलं नाही आम्हाला. पण, तक्रार झाल्यावर पोलीस तरी काय करणार? त्यांनी उचललं तुम्हाला. आता तुम्ही अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करताय हे ठीकाय. तरी तुम्हाला सांगितलं कोणी होतं हा चावटपणा करायला?
खरंतर तुम्ही आम्हाला ओळखायला चुकलात. आयुष्यभर लोकांना दृष्टी देता देता बहुधा तुमची बुद्धीच आंधळी झाली. कशाला उगाच रक्त आटवून लोकांना दृष्टीदान केली? आम्ही आमचे बरे होतो की. बर तसली ऑपरेशनं करताना तुमच्या लेखी सर्व समान होते हे कळतंय आम्हाला. उलट गरीबांसाठी अहोरात्र काम केलंत तुम्ही. तुम्हाला ढीग पुरस्कार मिळाल्याचं ऐकलंय आम्ही. पुरस्कारांची नावं आठवत नाहीत आम्हाला. नाही, खरंतर आम्हाला आता काहीच आठवत नाही. कारण तुम्ही थेट जातीवाचक शिवीगाळ केलीत हो. ती खरंच केली की नाही.. हे फार महत्त्वाचं नाही. तक्रार दाखल झाली ना.. मग संपला विषय. आता बसा बोंबलंत. तुमच्यासारख्या समाजमित्राला केलं की नाही आम्ही नामोहरम. कुठे जाल आता तोंड घेऊन? वर गंमत माहितीये का, आजवर तुम्ही ज्या अॅट्रोसिटीवाल्यांची ऑपरेशनं केलीत, ती कोणीही माणसं तुमच्या मदतीला आली नाहीत. ती येणारही नव्हती. तुम्ही ऑपरेशन केलं. त्यांना जग दिसलं. त्यांचं काम झालं.. आता कोण तात्याराव आणि कोण लहाने.
काय राव.. आमचा एक छावा तुम्हाला भारी पडला. कुठायत तुमचे पुरस्कारवाले.. तुमचे खंदे पाठीराखे? तुमचे सहकारी.. तुमचे डॉक्टर.. जेजेचे इतके मोठे पदाधिकारी तुम्ही.. कुठायत तुमचे पेशंट? तुम्ही ऑपरेशन केल्यावर ज्यांनी भरल्या डोळ्यांनी तुम्हाला धन्यवाद दिले.. आशीर्वाद दिले.. कुठायत ती सगळी? तुमच्यापेक्षा ते मुंबई युनिव्हर्सिटीचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक बरे की. त्यांच्यामागे पोरं तर आली. तुमच्या मागे कोण पेशंट येणार? पेशंटचं काम झालं की तो जातो घरी. मग सांगा, इतकी वर्ष काम करून काय कमावलं तुम्ही? घंटा? तुम्हाला वाटलं असेल, राजकीय नेतृत्व यात येईल. चुकलात. अशा केसमध्ये नेते येत नसतात. एरवी एखाद्याला उचलून कायमचा गायब करतील ही मंडळी. पण, अशा केसमध्ये येत नसतं कोणी.  
उरला प्रश्न आमचा.. तर आम्ही असेच आहोत. इकडे ढीग डॉक्टर आहेत की ऑपरेशन करायला. आणि समजा तुम्ही भरपूर काम केलंय समाजासाठी असं गृहित धरलंच. तरी त्यात उपकार कसले? सामाजिक बांधिलकी नावाचा काही प्रकार असतो की नाही. आम्ही पण हे जे करतोय ते सुदृढ समाजासाठीच. या समाजातून गेला एक तात्याराव.. काय फरक पडतो? शेवटी जातीवाचक उदगार हे वाईटच. समोरचा कोणीही बाप तिला काही करू शकत नाही. अहो समाजाचे कैवारी तुम्ही.. तरी तुमची बोबडी वळली, तिथे बाकीच्यांचं काय बोलावं. त्यामुळे आता जामीन घ्यायचा आणि तडक रोज खाली मान घालून यायचं इथे जेजेत. यापुढे रोज तुम्हाला अॅट्रोसिटीवाले भेटणार. त्यांच्या रोज पायाकडंच बघायचं. उद्या त्याने तुम्हाला शिवीगाळ जरी केली तरी बोलायचं काम नाही. भले, डोळ्याचं ऑपरेशन करायचं असलं तरी डोळ्याला नजर लावायची नाही.
हा एक धडा आहे तमाम समाजाला. आम्ही दिलेला.
कळलं ना. विसरायचं नाही.
जातीपातीचं राजकारण करायचं नाही.
जय महाराष्ट्र.