Thursday, December 8, 2016

कार्डिअॅक अरेस्ट


हॅलो
अरे ए..

इकडेय मी
कळतंय का तुला..?
मी म्हणतोय काहीतरी..
ऐकू येतंय?
तुला बहुधा नसावं येत ऐकू

थांब,
हे पाहा..

माझे दोन्ही हात उंच
आकाशात हालताहेत.
पाहा इकडे.
दिसतंय का तुला?
तुला बहुधा दिसतही नसावं नीट

थांब..
अं..

एक कर,
डोळे बंद कर.
तू काही बोलला होतास कधी
दिला होतास शब्द..
आठवतंय का काही?
लक्ष दे
आठव..
जाणवतंय का काही?
तुला जाणवतही नसावं बहुधा.

मला 
दिसतोयस तू.
तुझी हालचाल.
कळतायंत, तुझ्या निश्चल असण्याची कारणं
पण, मी तुला.. नाही?

एकमार्गी हृदयाचे
रिक्त ठोके.

कार्डिअॅक अरेस्ट येण्यापूर्वी
काही सेकंद आधी..
………………………… पुस्तकातून

Tuesday, July 12, 2016

ओंजळ

तुम्ही जेव्हा केव्हा माझ्याकडे पाहता,
काय दिसतं तुम्हाला?
माझी ओंजळ भरून असलेली अक्षरंच,
तेवढी तुम्हाला दिसत असतील.
तुम्ही म्हणाल दुसरं आहे, काय तुझ्याकडे?
चुकताहात.
खरंतर,
तुम्हाला काही द्यायला म्हणून,
जेव्हाकेव्हा मी बाह्या सरसावतो,
तेव्हा माझ्या या ओंजळीतून
अक्षरांना लगडलेले शब्दच तर सांडतात नेहमी.
हे खरंय.
या शब्दांनाही,
तुम्ही ओंजळीत अलगद झेलता,
म्हणूनच त्यांना काय तो अर्थ.
अन्यथा,
तेही भटकेच अन दुर्दैवीच की.
पण खरं सांगा,
तुम्हाला,
ही ओंजळच दिसते ना फक्त?
कि दिसतायंत,
या शब्दांआड दडून बसलेली गनिमी अक्षरं?
निश्चयाच्या टोकदार भाल्यांसह सावध,
हे दडलेले शब्द दिसतायत?
कि फक्त चाखाव्या वाटतात,
माझ्या भूतकाळी पाकळ्यांचा गंध केवळ?
हे पहा,
मेंदूमध्ये
मी
प्रयत्नपूर्वक
खोचून ठेवलंय
बंडाचं
एक निशाण.
पाहिलंय तुम्ही?
बरं, निदान ओघळलेल्या अतृप्त इच्छांचा गंध आला का तुम्हाला?
अहं.. नाहीच.
यातलं काहीच तुम्हाला नसेल जाणवलेलं.
कळलंय मला.
कारण, विचार कसेही असले तरी
शब्दांवरच तर भाळतो आपण.
पण, आता मला फिकीर नाही या ओंजळीची.
आता फक्त,
निशाण फडफडतं रहायला हवं.
आणि इच्छांचे ओघळ भळाळते.
यापुढचं
माझं तुम्हाला देणं असेल,
ते असं..
मनस्वी.
…………………… पुस्तकातून

Tuesday, February 23, 2016

कडी

तू दरवाजा ओढून घेतलास 
न विचारता.
अनपेक्षित
...
नात्यांना दरवाजे..
दरवाज्यांची नाती..
आताशा सताड काही असते कुठे?
...
अनेक दिवस
कित्येक महिने
बरीच वर्ष
...
त्याच भिंती
तेच दार
तोच मी
आत
...
आता तू दाराशी
कशासाठी?
कोण जाणे.
....
नीट पाहा..
दरवाजाला
कडी
माझ्याबाजूची.
..................................... पुस्तकातून