Wednesday, March 12, 2014

आज तुझ्याशी बोलावं वाटत नव्हतं.
पण मग म्हटलं, तसं करून चालणार नाही. आज संवाद साधावा लागेलच.
मी बनवलेली सर्वांत सुंदर गोष्ट म्हणून मी तुझ्याकडे पाहात आलो. आजही पाहातो. कारण, तुझ्या निर्मितीनंतर तुझ्याइतकी सुंदर संतुलित निर्मिती मला जमली नाही. किंवा मला ती करावी वाटली नव्हती.. कालपर्यंत.
आज मात्र मला वेगळंच वाटू लागलं आहे. तुझा मला फार उपयोग होणं सोड. उलट आता उपद्रव होऊ लागला आहे. या ना त्या कारणाने मी तुला ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण, तू मात्र उन्मत्त हत्तीसारखा धुडगूस घालतो आहेस माझ्या छाताडावर. मी छोटे भूकंप करून पाहिले. एखाद दोन त्सुनामी आणून पाहिल्या. वादळाची तर गणतीच नको. तरीही तू काही भानावर यायचं नाव घेईनास.
बघ, आता हातात गारपीट घेऊन मी कणखरतेची एक पायरी वर चढलो आहे. मला दुसरा पर्याय नव्हता. भरल्या डोळ्यांनी मी माझ्याच हिरव्यागार दुर्मिळ निष्पाप निर्मितीला मृत्यूपथावर पाठवलं. असंख्य निरागस प्राणीमात्रांना पुन्हा माझ्याकडे बोलावून घेतलं. वाटलं, त्यांना नेण्यापेक्षा साल्या तुलाही पुन्हा खेचावं आपल्याकडे कायमचा. तुझी जातच नामशेष करावी एकदाची. मग, परत वाटलं, की माझी ही सर्वांग सुंदर निर्मिती आहे. एवढ्यात नको हात लावायला. तुझे डोळे उघडले, तर विज्ञान, तंत्रज्ञान आदींच्या साह्याने तू पुन्हा नवनिर्मिती करशील. म्हणून बाकीच्यांचे बळी घ्यावे लागले मूर्ख मनुष्या.
हातची वेळ निसटते आहे. आता मात्र मी केवळ तुझ्यावर विसंबून राहणारा नाही. तुझ्यापेक्षा सुंदर निर्मिती करण्यासाठी मी माझी सर्व शक्ती पणाला लावली आहे. ज्याक्षणी मला तुझ्यासाठी पर्याय सापडेल, त्याक्षणी मी तुला संपवण्याचा चंग बांधेन.
वेड्या, मीच मांडलेला हा पसारा मोडणं दुःखदायक असेल. पण, अशक्य नाही. कारण नवनिर्मिती पुन्हा माझ्याच हाती आहे.
या पुढचा दणका मात्र मोठा असेल, की तुझा इतिहास, वर्तमान आणि भविष्य तीनही काळ पुरते शुन्यात जातील.
तुला काय करायची ती तयारी कर.
....................................................................... पुस्तकातून.