Wednesday, December 24, 2014

कोलाहल

मला चव कळत नाही
माझी भूक भागत नाही

मला विरह पचत नाही
आठव सहन होत नाही

मनात विचार येत नाही
येता थांबता थांबत नाही

मला मी आवडत नाही
मला मी आडवत नाही

मी मला ओळखत नाही
मला मी पटत नाही

इच्छा व्यक्त होत नाही
घुसमट शांत होत नाही

धड़ गिळता काही येत नाही
वा मुकाट बाहेर निघत नाही

वेग जागी थिजत नाही
धावणे पुसता येत नाही

प्राक्तन वाचता येत नाही
नजर प्रारब्धाला भिड़त नाही

आवर्तनाची आस शमत नाही
समेची झिंग सरत नाही

वर्तमानी शेपटावरला पाय
भूत मागे घेत नाही...
...............................पुस्तकातून

Monday, December 22, 2014

आठवण

तुझ्यामाझ्या बोटांमधले
आकाश निरभ्र निळे
चंद्र चांदण्यात न्हाले,
माझे आठवणींचे तळे
................................ पुस्तकातून.

Thursday, December 11, 2014

पाऊलखुणा

चला,
या खोलीतलं
सगळं सामान मी आवरून ठेवलंय.
आवरून म्हणण्यापेक्षा
माझं माझं सगळं मी पुन्हा भरून घेतलंय म्हण. 
आता ही खोली पूर्ण मोकळी झाली पाहा.
एरवी बोलताना,
एकमेकांमध्ये मुरणारे शब्द..
आता मात्र इथल्या भिंतींना धडका देत विखरून जातायंत.
ही आवाजाची कंपन
पुन्हा पुन्हा आपल्याच अंगावर चालून येतायंत.
हं.. 
आता इथे देणारंही कोणी राहिलं नाही.
ना स्वीकारणारं कोणी.
आता इथून निघून जायचं मी फक्त.
उरणारं काही नाही.
ना आक्रंदन.. ना प्राक्तन.
सर्व शून्य. निश्चल. स्तब्ध.
पण साला या पाऊलखुणा बंडखोर.
रिकामपणाला चुरगळून टाकणाऱ्या.
कुणीतरी इथे होत्याची आठवण.
आणि इथे आता कोणीही नसल्याचा पुरावा.
काय करावं यांचं?
पुसून टाकाव्यात का मी त्या?
पण खुणा गेल्या तरी वावर दिसतोच की.
किंबहुना पुसूच नयेत त्या खुणा.
नाहीतरी, पाऊलखुणा पुसण्यासाठी,
‘काळा’ने बागडायला हवंच की खोलीभर.
एकदम सगळं लुप्त होणं सजा आहे.
हळूहळू विरत जाण्यात मजा आहे. 
...................................................... पुस्तकातून.