Tuesday, December 11, 2012

मनाला चौकटीचं बंधन नसतं.
ते कधीही कुठेही कुठलीही चौकट मोडून धावत असतं वेढ्यासारखं बेभान होऊन, असं मी कुठेतरी वाचलं होतं.. ऐकलं होतं..
मला त्याचा अनुभव घ्यायचा असतो. 

मी ठरवून चौकटीबाहेर उडी मारायचा प्रयत्न करू लागतो.
मुद्दाम स्वैर व्हायचं.
मुक्त, स्वच्छंद व्हायचं.
उधळायचं चौखूर..

मनात आलेल्या प्रत्येक विचाराला चिमटीत पकडून मुद्दाम दूर भिरकावण्याचा प्रयत्न होतो. आलेला विचार उन्मत्त होऊन स्वैर होत आकाशी उडी घेतो..
हा चालला विचार भरधाव वेगाने प्रवाहाविरोधात..
आता झालीच गुरुत्वाशी प्रतारणा असं वाटेपर्यंत.. विचाराला लगाम बसतो.
त्याच वेगाने परतीची वाट..
तो थेट खाली येऊन  विसावतो तुमच्या ठरलेल्या चौकोनी मैदानात.


माझं मन चौकटीत विचार करू लागलंय बहुतेक
कारण हल्ली विद्रोही विचारालाच चौकटीबाहेरचा समजतो.
ही मीच माझी केलेली सोय आहे बहुतेक.
च्यायला,
हल्ली चौकटीबाहेर जाणारा विचार येतंच नाही डोक्यात.
आला तरी तो आकारत नाही.
आकारला तरी तो व्यक्त करता येत नाही.
व्यक्त केला तरी तो कुणी ऐकत नाही.

सगळा वेडपट गोंधळ नुसता.
परिणाम शून्य.

........................................................................................ पुस्तकातून.