Thursday, March 21, 2013

तुझ्या आठवणींचा तहानलेला कल्लोळ सतत हिंदोळत असतो बघ. मग आकाश भेसूर वाटू लागतं आणि जमीन ओसाड. तरीही हा कल्लोळ थांबता थांबत नाही. मग एखादी बेसूर उसळी अचानक फिरते त्या आकाशात आणि भेगाळल्या जमिनीत क्षणात अंतर्धान पावते. मग चहूकडे पसरते भकास, कोरडी, दिशाहीन शांतता.
इच्छेची मरणासन्न चाल पाहिली आहेस कधी? शांततेला पडलेली कोरड अनुभवलीयेस कधी?
आता या निष्प्राण जमिनीवर मौनाचं थडगं बांधेन म्हणतो.
भविष्यात का होईना, पण ही तहान भागवायला येशीलच की तू.
त्यानंतर या हवेतली आर्द्रता वाढेल.. जमिनीवर हिरवाई बहरेल. मग, त्या लुसलुशीत डवरलेल्या गवतावरून सरसरत पुढे जाताना तुझ्या नजरेचा पाय अडखळेलच या थडग्यापाशी.
तेव्हा तुझ्या लक्षात येईल, की आता भले सगळं स्थिरस्थावर झालं आहे. 
पण..
पण, आपली इथे येण्याची वेळ चुकली.
................................................................................... पुस्तकातून.  

3 comments:

  1. शांततेला पडलेली कोरड अनुभवलीयेस कधी

    नजरेचा पाय अडखळेलच

    आवडलं…. अफलातून संकल्पना …

    हा प्रदेश जिथे ती गेलीय तो आम्हाला दिसतोय असं वाटल ।
    …तो हि त्याच्या पार्श्वभागी सुरु असलेल्या संगीतासहित …
    आपल्या लिखाणातली दृश्यात्मकता वाढत चाललीये
    …विचार काय हाय तुमचा हो पाव्हणं ?

    ReplyDelete
  2. संकल्पनेचं उगमस्थान नेमकं काय हे सांगणं कठीण. काहीतरी डोक्यात येत असतं एवढंच. आता सगळं लिहून झाल्यावर खरच कल्पना चांगली वाटते. दृश्यात्मकता वाढते आहे म्हणतोस.. पण, खरंतर जे दिसतं तेच लिहितोय. तुला सांगायचं तर मला त्यातली ‘आता मौनाचं थडगं बांधेन म्हणतो’ यातली मौनाचं थडगं ही संकल्पना आवडली. मी त्या थडग्यात वारंवार घुसून पाहिलं विजू.

    ReplyDelete
    Replies
    1. Kadhi kadhi ek awstha prapt hote "SHODH" ghenyachi....teechi anek sankramana ultoon geli ki...jyacha shodjh ghyaycha aahe tyacha awshesh dislyawarahi aapan durlaksh karun nighun jato "KAHITARI" shodhanyassathi..Tula ha anubhav aalay ka re ?

      Delete