Sunday, February 2, 2014


बोलायचं आहे पण मांडता येत नाही.
शब्दांचं आख्खं गोडाउन आहे भरून पडलेलं...
पण, साला.. दरवाजा उघडून आत जावं वाटत नाही.
परवा एकदा तसा प्रयत्न पाहिला करून.
मुद्दाम जाणून बुजून सोडलं इथे आत तिला..
बराचवेळ घुटमळली..
मग नाइलाजाने शिरली आत.
वाटलं, अंगभर लगडलेले शब्द दाखवेल बाहेर आल्यावर.
पण, कुठलं काय.. गेली तशीच आली नागवी.

एखादा परिच्छेद.. एकादी ओळ.. वाक्य.. शब्द..
निदान एखादं अक्षर तरी.. .
भावनेने कशालाही न​ शिवता या अवकाशातून काढता पाय घेतला.
जी काही हालचाल झाली ती फक्त एवढीच.
मी मात्र तसाच तुंबलेला..
आत काही होत नाही असं नक्कीच नाही..
तरी शब्दांविना सारंच ओसाड ठरतं.
शब्द-भावनांना असलेली एकमेकांची ओढ आता उरली नाही की काय?
पण, तसं नसावं.
कारण, इथे आकार येतो आहेच की.
का कळेना..
हल्ली शब्द आणि भावना एकमेकांना बिलगत नाहीत.
झुरत राहतात आतल्या आत..
कारण विचारलं तर भावना म्हणते तू हवीस.
खूप जवळ.. जिथे शब्द संपतात आणि उरतो केवळ श्वास..
तिथे आणि तिथून पुढच्या प्रवासात तू हवीस.
उम्म..
तू हवीस ते पटतं खरं.
पण, तोवर शब्दांनी मात्र पुन्हा लाजून पळ काढलेला असतो.
मी पुन्हा तसाच.. शांत..
मनातली हालचाल मनातल्या मनात पाहाणारा
............................................................................. पुस्तकातून
.