Tuesday, October 23, 2018

भिंत

ही चौकट माझी
इथली नीती माझी
वाटणारी भीती माझी
आशांचे धुमारे माझे
अश्रुंचे बांध माझे

माझ्या परोक्ष तू इथे येशील काय?

डोळ्यांतून सांडलेली स्वप्नं माझी,
तुला वाटेवर दिसतील काय?

वारंवार अडकलेल्या श्वासांची जागोजागची पोकळी तुला कळेल काय?

अस्वस्थ  एकटेपणा तुला जाणवेल काय?

इथला रेंगाळणारा वेळ..
माझा माझ्याशी झगडा..
आठवणींचा छातीत पहुडलेला भाला..
माझ्या थयथयाटाच्या पाऊलखुणा..
माझा गरम उसासा..

माझ्या प्राक्तनाचा कपाळमोक्ष..
माझ्या क्षीण आवाजाचे कंप..
माझ्या संवादाचे ओघळ..
न झालेल्या स्पर्शाची आस..
मला होणारे अनपेक्षित भास..

आणि सगळ्यात शेवटी..
इथल्या हवेवरल्या खुंटीवर वेळोवेळी मी अडकवलेले शब्दांचे असे पुंजके..

परत जेव्हा केव्हा येशील..
हे सगळं पाहता येईल का तुला?
माझ्या चौकटीत सामावलेली..
माझी-तुझी
आपली
एक
भिंत..

फिरता फिरता चौकटीत,
तू
इथे
थबकशील काय?

...................पुस्तकातून

कोण जाणे!

असं का होतं?
कोण जाणे!

तुझा आवाज येत राहतो,
श्वास कळत जातो,
हलचालींची
रेखीव सावली
दिसत राहते अभंग,

तुझे शब्द,
प्रत्येक वाक्य,
पडत रहातं  कानावर,

टपोऱ्या अर्थांचा प्राजक्त
ओसंडून गळताना,
मी होतो अधीर..
मला कळत जातं
तुझं माझ्या भवताली असणं.
पण
धजत नाहीत
हातची बोटं सैलवण्याला.

असं का होतं?
कोण जाणे!

मी उघड्या डोळ्यांनी
घट्ट मिटून घेतो माझा समज.
मी हट्टाने अव्हेरतो तुझ्या आभासी असण्याला.

तरी वाटत राहते
खोल पोटात
थंड भीती.

असं का होतं ?
कोण जाणे!

शब्द येता येत नाहीत
नजर उठता उठत नाही
व्याकुळ इच्छेला
कणा सापडत नाही

खरं सांगतो,
बागडत राहातं मौन अंगभर
शांतता मुकाट
मुसक्या बांधते जिभेचे.
वाकुल्या दाखवत
सुरकुतल्या अपेक्षा
नाचत राहतात डोळ्यात,
फेर धरून!

का होतं असं ?
कोण जाणे!

मी घाबरतो,
मला  या प्रवासाचा
शेवट सुचेना होतो.

दचकतो,
सताड उघडतो डोळे.
झटकतो आल्या वर्तुळांना.
ऐकवतो जिवंत हुंकार वर्तमानाला.

नजर स्वच्छ होते,
श्वास मोकळा होतो.
हात सैलावतो.
एक उसाशाने,
माझा तळहात डोळ्यांसमोर येतो..

एव्हाना माझ्या बोटांना
तुझा स्पर्श जाणवतो.

का होतं असं?
कोण जाणे!
...….................पुस्तकातून