Tuesday, August 13, 2013

बऱ्याच वर्षांनी तू पुन्हा माझ्यासमोर येणार. कल्पनेनंच धडधडू लागलंय.
भीतीने नव्हे. पण, अनेक वर्षांपासून भक्कम उभा असलेला माझ्या नजरेआडचा बांध तुझ्या येण्याचा लोट पेलू शकेल की नाही, अशी चिंता वाटते. आजवरचे अनेक प्रवाह येताना दिसले.. काही अनपेक्षित येऊन धडकले. काही नुसतेच येऊन थबकले. पण, त्यांना पेलणं फार सोपं होतं. कारण, प्रलयातून तयार झालेला बांध होता तो. जगबुडी एकदाच येते म्हणतात ना.. तसंच झालं नव्हत का. त्यामुळे या नवनिर्माणानंतर खरंतर मी निर्धास्त होतो. पण, आता तुझ्या येण्याच्या शक्यतेने मी काहीसा गर्भगळीत झालो आहे.
काय करावं.. तुला टाळावं का? ते माझ्यादृष्टीने खरंतर फार सोपं आहे. मग वाटतं का टाळावं आणि कशासाठी? कुणाला वाटेल मी असा लिहितो आहे म्हणजे, तुझ्या-माझ्यात काही असेल भयप्रद.. किंवा अनैतिक काही.. असं तर नाहीच. उलट होतं ते फार प्रेमळ.. मायेपलिकडचं असं काही. मग?
मग कधी वाटतं एकदा भिडूच देत प्रवाह. होऊच देत नजरा नजर.
नेमकं काय वाटतं ते तरी कळेल.एकदा गमेल तरी की आता तो धक्का पचवायची ताकद उरलीये स्वतःत की वयापरत्वे मीही झुकू लागलोय काळापलिकडच्या वृद्धत्वाकडे.
कधी वाटतं, त्यानिमित्ताने कळेल तरी की खूप वर्षांपूर्वी तुझ्या जाण्याने ​ओल्या झालेल्या या भिंतींमध्ये त्यावेळी भोगलेलं थोडं काही उरलंय.. की सगळंच कोरडं ठणठणीत असं सुकून गेलंय सारं. 
कधी वाटतं, गेल्या अनेक वर्षांपासून मी जो ओलावा शोधतो आहे तो पुन्हा मिळवण्यासाठी या स्थितप्रज्ञ बांधापलिकडून जागा करावी का हळूच.
वाटतं, त्याच ओलाव्यावर नवी हिरवी शाल पांघरली जाईल.. हळूच एखादं पान डोकावेल नव्याने. कदाचित नवी जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी म्हणून का असेना, तुझी अबोल भेट अनुभवावी काय?
.................................................................................................. पुस्तकातून.