Tuesday, April 30, 2013


शरीर हल्ली पूर्वीसारखं साथ देत नाही. म्हणजे मनाचं, मेंदूचं शरीर ऐकतं सगळं. तरी हल्ली त्याचं असं वेगळं म्हणणं आहे याचं सूचन सतत होत असतं. दुर्दैवाने शरीराने साथ सोडली की त्याला आपण थेट वार्धक्याच्या गळ्यात अडकवतो. आता तुला वाटेल मी म्हातारा झालो की काय.. पण, तसं घाबरायचं कारण नाही. हिय्या केला तर मन मारतो तसं शरीर मारून काम करता येतंच की. पण, या धबडग्यात त्याचं म्हणणं नेमकं कायाय त्याकडे लक्ष देता आलं नाही मला. आज माझ्या शरीराने बंड पुकारलेलं नाही. पण, त्या मंडळींनी आपापल्या जबाबदाऱ्या, गुणधर्म एकेमकांना द्यायला सुरुवात केलीय. 
काय बोलतोयस तू?
खंरच की. म्हणजे कसं सांगू.. ताजं उदाहरण द्यायचं तर बघ. सध्या माझ्या मेदू आणि मनाने एकमेकांची जागा घेतलीय.  म्हणजे असं मन थेट डोक्यात घर करून राहतं हल्ली आणि मेदू थेट हृदयात घुसलाय. येतंय लक्षात? समोर सुरू असलेल्या सततच्या कोलाहलाकडे एक टक पाहिल्यानंतर एरवी थंड असणारी माझी दृष्टी हल्ली उष्ण झाल्याचं जाणवतं आणि त्याचवेळी खळाळणारं गरम रक्त धमन्यांतून वाहता वाहता थंड पडलेलं असतं. आता तुझ्या नेमकं लक्षात यायला हरकत नाही.
तू.. जाऊ दे. तुझं डोकं ठिकाणावर आलं की बोलू.
हं... सध्या ते पूर्वीच्या ठिकाणी नाही हे खरं. पण, शरीरभर भटकल्यानंतर कुणाला कोणती जागा आवडेल याचा नेम नाही. किंबहुना बाबा रे तुम्ही तुमच्या ठरलेल्या जागांवर जाऊन बसा असं मला आत्ता त्यांना सांगावंही वाटत नाहीय. त्यांना कुठे जायचं तिथे जाऊ दे. मी त्यांना अडवणार नाही.  ते बघ.. आत्ता मला जाणवतंय माझ्या भिरभिरणाऱ्या काळ्या बाहुल्यांनी माझ्या पावलाशी संधान बांधलंय. म्हणून एरवी ठाम असलेलं माझं पाऊल थोडं सरबरलंय आणि कधीही एका जागी स्थिर न राहणारी नजर निश्चित मताने ठाम रुतून बसली आहे.
लिसन.. यू नीड अ ब्रेक..
आय वाँट टू ब्रेक धीस ऑल. त्याच त्या उष्ट्या ताटात जेवणं नकोच. आहे त्या जागीच नवी इमारत बांधायची तर जुनीला पडलंच पाहिजे. नव्या इमारतीच्या नव्या भिंती-नवे जिने, नवी दारं-नव्या खिडक्या.. मग नवा वारा.. आणि आत एका पायावर नाचणारी जास्वंदी हवा. तिचीच तर वाट पाहातो आहे. 
................................................................................... पुस्तकातून. 

 

Wednesday, April 17, 2013

अंधाराला भीती नसते.
कारण, तो खोटा नसतो.
त्याला ना लाज.. ना शरम
त्याला ना ऋतूंची भीती.. ना त्याला प्रकाशाचं भय.
त्याच्याच खांद्यावर झुलत असते पाशवी पिशाच्चांची मान
तो बेभान आहे. तितकाच बेइमान. .
तो थंड तितकाच गप्प.
अंधार विवस्त्र असतो नेहमी.
भीती त्याला नाही.
ते भय माझ्याच मानगुटीवर
कारण, अंधाराला सगळं दिसतं.
वल्कलांच्या आतलं आणि प्राक्तनाच्या पलिकडचंही
............................................................. पुस्तकातून. 

Sunday, April 14, 2013

मीः असं का बसलायस इथे?
तोः विचार करतोय.
मीः कसला?
तोः तण फार झालेत. जमीन नापिक झालीय. काही नव्याने उगवत नाहीय इथे.
मीः अरे उगवेल की. बी पेर. पाणी घाल.
तोः अरे नुस्तं बी पेरून, पाणी घालून नसतं होत काही. जमीन जिवंत लागते.
मीः  ही नापिक झालीय कशावरून?
तोः बघ की. दिसत नाहीत तण. उगवलेलं खुरटं गवत. च्यायला झाडं आहेत तीही काटेरी.
मीः मग काढ ते सगळं. स्वच्छ कर जमीन.
तोः तेच म्हणतोय. एकदाची पेटवून टाकतो हिला. काय ते एकदाच जळून जाऊ दे.
मीः जाळतोस कशाला? धीराने स्वच्छ कर.
तोः अरे तशी व्हायची नाही ती. पार जीवात घुसलाय तिच्या हा ओसाड माळ. जाळावंच लागेल. एकदा जमीन जाळली की स्वच्छ होईल बघ सगळं. त्रास होईल थोडा. सुक्यासोबत ओलंही जळेल. पण, ही सगळी घाण जाईल दारातून.
मीः वा. मग नवी सुरुवात. नवी पेरणी.. नवं बी. नवा अंकुर.
तोः तेच की. नवा अंकुर बघायचा असेल तर जमिनीला जळावं तर लागेलच.
मीः हं.. पण मन जळतंय रे.
तोः मनाच्या जाळाचं कसलं घेऊन बसलास लेका. मनातल्या आगीनं मन स्वच्छ होत नसतं.
मीः असं?
तोः मग. मनातल्या आगीनं मनातले तण वाढतात बाळा. खुरटी, बुरसटली, मरून वर्षं झालेली रोपटी नव्याने वाढतात. बिनपानांची खोडं उगवतात झटाटा. बाबा रे. जमीनीची आग परवडली. पण, मनाची होरपळ  भलती वाईट. नको लाऊन घेऊस मित्रा. होरपळशील. आतल्या आता जळत जाशील. या जाळाला ना धूर ना ज्वाला. तिचं तंत्र वेगळं आहे. थंड करते. शांत करते. नव्या कोंबांना शमवून टाकते.
मीः अरे ए.. कुठल्या कुठे चाललायंस. जमिनीच्या जळण्याबद्दल बोलत होतो आपण.
तोः अहं. ते मी बोलत होतो. तू मनाच्या जळण्याबद्दल बोललास. 
............................................................................ पुस्तकातून.

Tuesday, April 2, 2013

सर, आपण थोर आहात हे मी कधीच अमान्य करत नाही. त्यामानाने मी फारच कनिष्ठ. परंतु, ही वयानुरुप येणारी थोरवी आहे. जन्म आधी झाल्याने तुम्ही अनुभवाने माझ्यापेक्षा जास्त समृद्ध झालात. जन्म कुणाच्याच हाती नाही. आता तुलनेने माझा अनुभव कमी आहे. परंतु, निष्ठेचा आणि वयाचा, जन्माचा फारसा संबंध नाही. जशी मी तुमच्या हेतूबाबत शंका घेऊ नये असं तुम्हाला वाटतं, तसा तोच नियम तुम्हालाही लागू आहेच. आपल्या दोघांची क्षेत्रं परस्परावलंबी असली तरी ती भिन्न आहेत. आपण आपापल्याप्रती निष्ठावान आहोत एवढं पुरेसं आहे संवाद साधण्यासाठी. वयाचा दाखला देऊन पुन्हा पुन्हा मला ‘लहान’ भासवण्यात आपण धन्यता मानत असाल, तर.. तर सर मी तुमचं सगळं शांतपणे ऐकून घेईन. पण, मग मी तुम्हाला कालबाह्य ठरवेन.
तेवढं मी करू शकतो. 
................................................................. पुस्तकातून.