Friday, August 30, 2013

प्रतीक्षा


ऐन रात्री सगळं शांत होतं. सबंध समाज निद्राधीन असताना मी मात्र सताड जागा असतो. एरवी नकळत हातातून सुटत जाणारी वेळ आता सतत धडका देत असते. एकाच लयीत मेंदूवर साठवेळा धडका देणारा सेकंद मिनिटामिनिटाने पुढे जात असतो. नजरेसमोरून कोणीतरी मुठीतली वेळ बोटं पिरगाळून खेचून नेतो. या संघर्षातून बाहेर पडायला मी माझे डोळे गच्च मिटतो. हात उशाशी घेतो. पण काही क्षणांपुरतं.. रोज येणारं.. रात्रीचं, काही तासांसाठीचं मरण मात्र मला येत नाही. त्याचवेळी तू मात्र अलगद निजून गेलेली असतेस दुसऱ्या जगात. तुझा देह माझ्याशेजारी शांत असतो आणि तुझे मिटले डोळे मात्र पाहात असतात तुझ्या मनस्वी विश्वातल्या नव्या स्वप्नांना.  
तुझा हेवा वाटतो.
एवढ्यात तुझा एक हात माझ्या छातीवर नकळत पडतो आणि सेकंदाच्या सतत बाहेरून येणाऱ्या धडकांशी माझ्या देहाने चक्क दोन हात केलेले मला जाणवतात. बाहेरच्या टीकटीकाटाला आतल्या धडधडीने उत्तर दिलेलं असतं. परंतु, नंतर हे दोन्ही आवाज एकच असल्याचं माझ्या लक्षात येतं.कोणीतरी बाहेरून मेंदू पोखरतंय आणि काहीतरी आतून हृदयाला डिवचतंय असं वाटू लागतं. मी हतबुद्ध होऊन पडून राहतो निपचित.
मी वेळ प्यायलो? की वेळेने मला गिळून टाकलंय ते कळेनासं होतं. मी पुन्हा माझे डोळे गच्च मिटतो. परंतु, मला झोप लागत नाही.
काय गंमत आहे नै. रोज जगण्याची उमेद घेऊन चालणारा मी, आज या दयाघनाकडे भीक मागत असतो ती एका रात्रीपुरत्या मरणाची.
................................................................................................... पुस्तकातून.