Tuesday, December 25, 2012

माझी वेदना बनावट आहे असं नव्हे. पण, ती शमण्यासाठी त्या दुःखाचं बोट पकडून येणाऱ्या काळाला शांतपणे जाऊ देण्याचं शहाणपण मला अजून आलेलं नाही. उलट ही जखम कशी सतत ओली राहील याची काळजी घेत मी त्या दुःखला या ना त्या कारणाने कुरवाळत राहतो.. गोंजारत राहतो.
आतून येणाऱ्या आर्त स्वरांना बाहेर काढून चौकाचौकातल्या चौथऱ्यांवर त्यांना उभे करतो. माझ्या सग्यासोयऱ्यांना जमवून त्यांचे उसासे, सबुरीचे सल्ले मिळवत राहतो. आता मला त्याची सवय जडली आहे. माझ्या वाट्याला आलेलं ‘अघटीत’ मी सर्वांना दाखवत सुटतो.
म्हणजे..
दुःख सेलिब्रेट करण्याची किमया आता मला साधली आहे बहुतेक.
........................................................................................ पुस्तकातून.

Sunday, December 23, 2012

हल्ली विचाराची प्रसुती होत नाही.
‘बाहेरचं’ आणि ‘आतलं’ अशी जगाची वाटणी हल्ली विचारही करू लागलाय.
पूर्वी त्याला दुनियेची फिकीर नसायची. जन्म झाला की थेट डोक्यातून बाहेर यायचा.
हेवा वाटायचा त्याच्या बिनधास्तपणाचा.
जन्मदात्याची तमा न बाळगता हा फुटीरऽ अशी काहीक्षणात सहीसलामत सुटका करून घेई डोक्यातून.
पण आता तोही हिरमुसला..
रुसला नक्की.
पूर्वी त्याला अक्षरांचा फुलोरा बिलगलेला असे.
हा असा बाहेर येऊन अलगद पडायचा शब्दांच्या टपोरी ताटव्यात.
त्याचं येणं सहेतूक असलं, तरी व्यक्त होणं समाधानी असायचं.
आताही तो येतो.
मात्र रेंगाळतो.. राहतो तिथेच.
मनात राहणं आवडू लागलंय आताशा त्याला.
का?
माहित नाही.
मनातल्या कोणत्या आमिषाला तो भूललाय तेही कळत नाही.
..
..
..
..
..
..
स्वतः ला कोंडून घेणं केवळ मलाच जमतं असा माझा गैरसमज होता तर!! 
...................................................................................................................... पुस्तकातून.








  




Tuesday, December 11, 2012

मनाला चौकटीचं बंधन नसतं.
ते कधीही कुठेही कुठलीही चौकट मोडून धावत असतं वेढ्यासारखं बेभान होऊन, असं मी कुठेतरी वाचलं होतं.. ऐकलं होतं..
मला त्याचा अनुभव घ्यायचा असतो. 

मी ठरवून चौकटीबाहेर उडी मारायचा प्रयत्न करू लागतो.
मुद्दाम स्वैर व्हायचं.
मुक्त, स्वच्छंद व्हायचं.
उधळायचं चौखूर..

मनात आलेल्या प्रत्येक विचाराला चिमटीत पकडून मुद्दाम दूर भिरकावण्याचा प्रयत्न होतो. आलेला विचार उन्मत्त होऊन स्वैर होत आकाशी उडी घेतो..
हा चालला विचार भरधाव वेगाने प्रवाहाविरोधात..
आता झालीच गुरुत्वाशी प्रतारणा असं वाटेपर्यंत.. विचाराला लगाम बसतो.
त्याच वेगाने परतीची वाट..
तो थेट खाली येऊन  विसावतो तुमच्या ठरलेल्या चौकोनी मैदानात.


माझं मन चौकटीत विचार करू लागलंय बहुतेक
कारण हल्ली विद्रोही विचारालाच चौकटीबाहेरचा समजतो.
ही मीच माझी केलेली सोय आहे बहुतेक.
च्यायला,
हल्ली चौकटीबाहेर जाणारा विचार येतंच नाही डोक्यात.
आला तरी तो आकारत नाही.
आकारला तरी तो व्यक्त करता येत नाही.
व्यक्त केला तरी तो कुणी ऐकत नाही.

सगळा वेडपट गोंधळ नुसता.
परिणाम शून्य.

........................................................................................ पुस्तकातून.

Monday, December 10, 2012

दृष्टी बंद करता आली पाहिजे काही काळापुरती..
बुद्धीचे, मेंदूचे, डोक्याचे सगळे दरवाजे आता घट्ट ओढून घ्यायला हवेत.
असा पुरता अंधार दाटून यावा चहूबाजूंनी.
आता भिरभिरतं मन नुसतं फिरत राहिलं पाहिजे वेगाने, उरलेल्या शारीरिक अंतराळात.

साचलेल्या विचारांच्या.. जून झालेल्या सवयींच्या.. उष्ट्या आठवणींच्या भूलभूलय्या भिंतींना  धडका मारणं सुरू व्हावं काही काळाने.
त्याला पर्याय नाहीच.
..
..
डोक्यापलिकडे आणि दृष्टीत न येणाऱ्या बाहेरच्या नव्या दुनियेत जायचं असेल..
तर साला, एक तरी भिंत पाडली पाहिजे.
.................................................................................... पुस्तकातून.

Monday, December 3, 2012

मनात येणाऱ्या विचारांनाही अक्षरांचा खांदा लागतो.
अक्षरामागून अक्षरं जोडत गेलं की त्या विचाराला शब्दांतून चेहरा लाभतो नेमका असं माझं मत.
पण, अशांमध्ये हा टेकू झुगारून काही विचार बंड करून उठतातच की.
मग अशा विचारांना ओळखायचं कसं?
बरेच दिवस शोध सुरू आहे मनात शब्दांविना विचारांबाबतचा...
..
काही काळापासून अनुभव येतो आहे की मेंदूत पिंगा घालणाऱ्या या चक्राला हल्ली असतं ते केवळ तुझं नाव.
बाकी त्यांना ना शब्दाचा चेहरा ना कुण्या अक्षराचा खांदा.
काय करायचं या विचारांचं? कसं समजून घ्यायचं त्यांना?
..
..
सापडलंय बहुधा उत्तर..
..
..
मेदूतल्या या विचारांना असलेला शब्दांचा टेकू काढला की सगळी बंधनं, सर्व लज्जा, सगळे नियम धाब्यावर बसवून हा प्रवाह उतरतो तो थेट डोळ्यांत.
..
..
आपण त्यांना भावना म्हणतो.
................................................................................. पुस्तकातून.
  

Saturday, December 1, 2012

"चल निघतो मी. नाही..
आता थांबणं शक्य नाही.
तेव्हा थांबलो होतो म्ह्णून तर आलो तुझ्याकडे. पण, तू तुझं दार केवळ किलकिलं करून माझ्याशी संवाद साधलास. सुरुवातीला ठीक होतं. पण, नंतर... पुरेसा परिचय झाल्यावर तरी तू तुझं दार सताड उघडायचंस माझ्यासाठी.
पण तू केवळ या दरवाजाच्या चौकटीतूनच बोलत राहिलीस.
मला ही चौकट नव्हती असं नाही. पण ती चौकट तोडून मी बाहेर आलो होतो.
इतका काळ जाऊनही तू त्यातून बाहेर यायलाच तयार नाहीयेस. मग आता निघतो मी. कारण असे ‘चौकटी’तले संवाद मला मान्य नव्हते कधीच. त्यामुळे आता थंबवण्याचा प्रयत्नही नकोत. तू तुला जमेल तशी चौकट मोडून बाहेर ये.. मग बघू.
आता मला नाही येता येणार तुझ्याकडे परत. कारण, या परतीच्या वाटेवर माझा ‘अहम’ दबा धरून बसला आहे.
तुझ्याकडे येतानाही मला तो जाणवला होता. पण, त्यावर तेव्हा मात करूनच मी इथवर आलो होतो. यापुढे ते शक्य नाही. त्याला मारुन टाकणं आता केवळ तुझ्या हातात आहे.
आता तू ये फक्त. मी तर कधीचा चौकटीबाहेर आहे..
तेव्हाही असेन.
..............................
पुस्तकातून."