Monday, February 24, 2014

सवय की सोय?

मला खरेतर तुझा खूप राग आलाय.
राग म्हणावा.. की रुसवा?
माहित नाही.
घुसमटीचा फुगा नेटका गळ्यात अडकून बसलाय.
संवादाचा अपेक्षाभंग आता संपर्कावर आला आहे.
साला.. संपर्कावरही आता साय धरली आहे.
तू म्हणशील आता पुन्हा सुरु झालं याचं.
म्हण ना. म्हण.
मी मुद्दाम थांबवलं होतं स्वत:ला.
म्हटलं बघू ना.. मी कितीकाळ रमतो त्या गळ्यातल्या फुग्यात.
पण फार नाही रमलो.
वाटलं, निघून जावं इथून.
..
..
ए.. ऐक ना.
समजा मी निघून गेलो तुझ्या आयुष्यातून तर काय होईल??
अडणार काहीच नाही. 
पण नुकसान तर होईलच ना.
होईल ना?
की फ़क्त एक गरम उसासा खर्च होईल?
..
तुझ्या असण्यामध्ये तुझ्या जगण्यामध्ये..
 माझं दिसणे राहील की माझ्या नसण्याचा रिचवशील आवंढा कॉफ़ीच्या गरम घोटासारखा??
माझी बुद्धी अंध होते आहे आणि माझ्या सवयी सूक्ष्म.
आता वाटते,
मी उघडा पडलो आहे पुरता..
आता माझे मरण जवळ आहे.

कारण तू मला आणि मी तुला असणे 
सवयीचे नव्हे, सोयीचे आहे.
.......................................... पुस्तकातून.