Tuesday, January 6, 2015

दूरवर दिसते काही..

मला आता इथून पुढे निघावं लागेल.
ही इथेच गवसली मला इच्छा.
मला माझ्या असण्याची खात्री झाली होती पूर्वीच.
पण इथे आल्यावरच मला त्याची उंची समजली होती.
माझ्या चालत येण्याचं अप्रूपही मला वाटलं ते इथेच.
दिशांना चारी मुंड्या चित करण्याचं धाडसही इथेच गवसलं मला.
मी इथेच भिडलो शब्दांना.
मी गळाभेट घेतली गंधाची तीही इथेच.
किंबहुना ती घ्यावी कशी हेही इथेच शिकलो मी.
आनंदाचा बहर म्हणा..
खवळलेल्या समुद्राची लहर म्हणा..
इथेच अनुभवता आली मला.
निळ्याशार चांदण्यांची सफर घडता घडता,
मरुन पडलेल्या चंद्राचे सुगावे लागले ते इथेच.
माझ्या पाऊलांखाली अंथरले गेलेले लाल गालिचे इथेच पहिल्यांदा पहिले.
मुखवट्यांची मजा लुटता आली.
भावनांची गोची पाहता आली.
मृगजळी गप्पांचे घोट रिचवता आले.
मृगनयनी कटाक्षांचे बाण चुकवता आले
हे सगळं इथंच तर घडलं.

काही मग्रूर पर्वतांच्या सावल्याही मी इथे नेस्तनाबूत केल्या
त्या सुरुंगांनी गडगडत आलेल्या कातळांनी
माझ्या जखमा मोहरुन गेल्या.
इथल्या गवतांनीच त्या जखमांचे तुरे माझ्या शिरपेचात रोवले.
या तुऱ्यांनी हा मुकुट असा भरुन गेला आहे.
आता हा इथेच ठेवून पुढे गेलं पाहिजे.
..
नव्या तुऱ्यांचा शोध अजून अशांत आहे.
नवा गंध
नवा वारा
बुद्धीचा संग हवा आहे
..
या इथे उभे राहून मी पाहातो दूरवर.
अन मला दिसते सावली हिमालयाची.
पलिकडे दिसते विस्तीर्ण.. शांत, शुभ्र काही.
ती जागा पहावी लागेल.
नवं काही शोधावं लागेल.
इथून आता निघायला हवं.
नवे विचार नवे आचार
हवं सर्व पारदर्शी
मुखवट्यांमागल्या चेहऱ्यांसाठी
माणसांमागे जायला हवं.
............................................... पुस्तकातून