Saturday, November 22, 2014

अबोल हुंकार

मला खात्री आहे
मी दिलेल्या हाकेला तू साद देशील.
एका क्षणात माझे नैराश्य हिरवे होईल..
मला गवसेल सूर वाऱ्यासोबत घोंगावणाऱ्या पानझडीचा

अशी अलगद येशील चालत,
भेटशील.. बोलशील..
झुरते दुःख हलके करशील.
सांगशील चार गोष्टी धीराच्या..
काही स्वैर सोबतीच्या..
मी साद दिल्यावर.

पण अलीकडे..
भीती वाटते दांभिक ज्वराची.
वाटतं..
पाहता पाहता माझं शरीर होईल ओसाड..
डोळे शुष्क
आणि घसा पुरता वांझ
आवाजाच्या उत्पत्तीला असेल
काळ्या लाळेचा शाप.
छातीमध्ये उरला असेल
नावापुरता श्वास.
आणि डोळ्याभवति आवळली जाणारी काळी वर्तुळे फ़क्त.
डोंबाऱ्याचा खेळ नुसता.
पण मला त्याची तमा नाही
.
आत्ममग्न..
तिरपांगड़ा संघर्ष म्हण याला हवं तर.

तुला या विस्कटलेल्या घडीची
चाहूल लागेल नक्की.
त्याचंही मला अप्रूप नाही.

पण हां अबोल हुंकार कानी पडल्यावर..
तू काय करशील?
प्रेक्षक होशील....
की प्रणय?
.....................................................................पुस्तकातून