Friday, November 23, 2018

थोडं थांबशील?

थोडं थांबशील?
मागे वळशील?
 दोघांमधल्या वितळल्या क्षणांना
उभ्या उभ्या कुरवाळशील?

तुझ्या-माझ्या सहवासातला
उसवला एक श्वास उर भरून घेशील?
मी नसल्याचा,
अडकलेला एक आवंढा
भरल्या डोळ्यात दाखवशील?

ऐक,
थोडं थांब ना.
काही सांग ना.
उणिवेच्या उंबरठ्यावर
माझ्यासोबत बैस ना.

पुस्तकातलं एक पान
माझ्यासोबत उलटशील?
ठाशीव चौकटीतल्या
आडव्या काळाला
डोळ्यादेखत निरोप देशील?

तुला कळतंय?

तुला कळतंय.
मला सलतंय.
आता किती वाट पाहशील?
दबल्या इच्छांना किती  दमवशील?

थोडं थांबशील?
मागे वळशील?
…..........................पुस्तकातून 

Tuesday, October 23, 2018

भिंत

ही चौकट माझी
इथली नीती माझी
वाटणारी भीती माझी
आशांचे धुमारे माझे
अश्रुंचे बांध माझे

माझ्या परोक्ष तू इथे येशील काय?

डोळ्यांतून सांडलेली स्वप्नं माझी,
तुला वाटेवर दिसतील काय?

वारंवार अडकलेल्या श्वासांची जागोजागची पोकळी तुला कळेल काय?

अस्वस्थ  एकटेपणा तुला जाणवेल काय?

इथला रेंगाळणारा वेळ..
माझा माझ्याशी झगडा..
आठवणींचा छातीत पहुडलेला भाला..
माझ्या थयथयाटाच्या पाऊलखुणा..
माझा गरम उसासा..

माझ्या प्राक्तनाचा कपाळमोक्ष..
माझ्या क्षीण आवाजाचे कंप..
माझ्या संवादाचे ओघळ..
न झालेल्या स्पर्शाची आस..
मला होणारे अनपेक्षित भास..

आणि सगळ्यात शेवटी..
इथल्या हवेवरल्या खुंटीवर वेळोवेळी मी अडकवलेले शब्दांचे असे पुंजके..

परत जेव्हा केव्हा येशील..
हे सगळं पाहता येईल का तुला?
माझ्या चौकटीत सामावलेली..
माझी-तुझी
आपली
एक
भिंत..

फिरता फिरता चौकटीत,
तू
इथे
थबकशील काय?

...................पुस्तकातून

कोण जाणे!

असं का होतं?
कोण जाणे!

तुझा आवाज येत राहतो,
श्वास कळत जातो,
हलचालींची
रेखीव सावली
दिसत राहते अभंग,

तुझे शब्द,
प्रत्येक वाक्य,
पडत रहातं  कानावर,

टपोऱ्या अर्थांचा प्राजक्त
ओसंडून गळताना,
मी होतो अधीर..
मला कळत जातं
तुझं माझ्या भवताली असणं.
पण
धजत नाहीत
हातची बोटं सैलवण्याला.

असं का होतं?
कोण जाणे!

मी उघड्या डोळ्यांनी
घट्ट मिटून घेतो माझा समज.
मी हट्टाने अव्हेरतो तुझ्या आभासी असण्याला.

तरी वाटत राहते
खोल पोटात
थंड भीती.

असं का होतं ?
कोण जाणे!

शब्द येता येत नाहीत
नजर उठता उठत नाही
व्याकुळ इच्छेला
कणा सापडत नाही

खरं सांगतो,
बागडत राहातं मौन अंगभर
शांतता मुकाट
मुसक्या बांधते जिभेचे.
वाकुल्या दाखवत
सुरकुतल्या अपेक्षा
नाचत राहतात डोळ्यात,
फेर धरून!

का होतं असं ?
कोण जाणे!

मी घाबरतो,
मला  या प्रवासाचा
शेवट सुचेना होतो.

दचकतो,
सताड उघडतो डोळे.
झटकतो आल्या वर्तुळांना.
ऐकवतो जिवंत हुंकार वर्तमानाला.

नजर स्वच्छ होते,
श्वास मोकळा होतो.
हात सैलावतो.
एक उसाशाने,
माझा तळहात डोळ्यांसमोर येतो..

एव्हाना माझ्या बोटांना
तुझा स्पर्श जाणवतो.

का होतं असं?
कोण जाणे!
...….................पुस्तकातून

Thursday, December 8, 2016

कार्डिअॅक अरेस्ट


हॅलो
अरे ए..

इकडेय मी
कळतंय का तुला..?
मी म्हणतोय काहीतरी..
ऐकू येतंय?
तुला बहुधा नसावं येत ऐकू

थांब,
हे पाहा..

माझे दोन्ही हात उंच
आकाशात हालताहेत.
पाहा इकडे.
दिसतंय का तुला?
तुला बहुधा दिसतही नसावं नीट

थांब..
अं..

एक कर,
डोळे बंद कर.
तू काही बोलला होतास कधी
दिला होतास शब्द..
आठवतंय का काही?
लक्ष दे
आठव..
जाणवतंय का काही?
तुला जाणवतही नसावं बहुधा.

मला 
दिसतोयस तू.
तुझी हालचाल.
कळतायंत, तुझ्या निश्चल असण्याची कारणं
पण, मी तुला.. नाही?

एकमार्गी हृदयाचे
रिक्त ठोके.

कार्डिअॅक अरेस्ट येण्यापूर्वी
काही सेकंद आधी..
………………………… पुस्तकातून

Tuesday, July 12, 2016

ओंजळ

तुम्ही जेव्हा केव्हा माझ्याकडे पाहता,
काय दिसतं तुम्हाला?
माझी ओंजळ भरून असलेली अक्षरंच,
तेवढी तुम्हाला दिसत असतील.
तुम्ही म्हणाल दुसरं आहे, काय तुझ्याकडे?
चुकताहात.
खरंतर,
तुम्हाला काही द्यायला म्हणून,
जेव्हाकेव्हा मी बाह्या सरसावतो,
तेव्हा माझ्या या ओंजळीतून
अक्षरांना लगडलेले शब्दच तर सांडतात नेहमी.
हे खरंय.
या शब्दांनाही,
तुम्ही ओंजळीत अलगद झेलता,
म्हणूनच त्यांना काय तो अर्थ.
अन्यथा,
तेही भटकेच अन दुर्दैवीच की.
पण खरं सांगा,
तुम्हाला,
ही ओंजळच दिसते ना फक्त?
कि दिसतायंत,
या शब्दांआड दडून बसलेली गनिमी अक्षरं?
निश्चयाच्या टोकदार भाल्यांसह सावध,
हे दडलेले शब्द दिसतायत?
कि फक्त चाखाव्या वाटतात,
माझ्या भूतकाळी पाकळ्यांचा गंध केवळ?
हे पहा,
मेंदूमध्ये
मी
प्रयत्नपूर्वक
खोचून ठेवलंय
बंडाचं
एक निशाण.
पाहिलंय तुम्ही?
बरं, निदान ओघळलेल्या अतृप्त इच्छांचा गंध आला का तुम्हाला?
अहं.. नाहीच.
यातलं काहीच तुम्हाला नसेल जाणवलेलं.
कळलंय मला.
कारण, विचार कसेही असले तरी
शब्दांवरच तर भाळतो आपण.
पण, आता मला फिकीर नाही या ओंजळीची.
आता फक्त,
निशाण फडफडतं रहायला हवं.
आणि इच्छांचे ओघळ भळाळते.
यापुढचं
माझं तुम्हाला देणं असेल,
ते असं..
मनस्वी.
…………………… पुस्तकातून

Tuesday, February 23, 2016

कडी

तू दरवाजा ओढून घेतलास 
न विचारता.
अनपेक्षित
...
नात्यांना दरवाजे..
दरवाज्यांची नाती..
आताशा सताड काही असते कुठे?
...
अनेक दिवस
कित्येक महिने
बरीच वर्ष
...
त्याच भिंती
तेच दार
तोच मी
आत
...
आता तू दाराशी
कशासाठी?
कोण जाणे.
....
नीट पाहा..
दरवाजाला
कडी
माझ्याबाजूची.
..................................... पुस्तकातून

Thursday, October 29, 2015

ख्वाहिशें

ख्वाहिशो के परोंपर
कुछ उम्मीदे बैठी थी..
उम्मीदे मेरी खुद की
कुछ अनजानी..
किसी और की
समझ नहीं आया कैसे कब
लेकिन ख्वाहिशोंके पर
फड़फड़ाते चुप हो गए..
 मासूम जैसे
जैसे परोपर बैठी कोई उम्मीद
गिर ना जाए..
 टूट ना जाए
भाई उम्मीद कौन सी..
किस की
मेरी ख्वाबोंसे भरी आँखे
पता नहीं
अब  धीरे धीरे खुलने लगी है
आँखे खोलू तो पता चले
पर है तैयार
भरने उड़ान  उम्मीदोंसे भरी
लेकिन ख्वाहिशे..
कहाँ गयी...??
.
चढ़ा सूरज आँख में चुभा
तब निचे देखा
तो दंग रह गया

मेरी ख्वाहिशोंका साया
मेरेही पैरोतले!
....................................पुस्तकातून