Sunday, December 23, 2012

हल्ली विचाराची प्रसुती होत नाही.
‘बाहेरचं’ आणि ‘आतलं’ अशी जगाची वाटणी हल्ली विचारही करू लागलाय.
पूर्वी त्याला दुनियेची फिकीर नसायची. जन्म झाला की थेट डोक्यातून बाहेर यायचा.
हेवा वाटायचा त्याच्या बिनधास्तपणाचा.
जन्मदात्याची तमा न बाळगता हा फुटीरऽ अशी काहीक्षणात सहीसलामत सुटका करून घेई डोक्यातून.
पण आता तोही हिरमुसला..
रुसला नक्की.
पूर्वी त्याला अक्षरांचा फुलोरा बिलगलेला असे.
हा असा बाहेर येऊन अलगद पडायचा शब्दांच्या टपोरी ताटव्यात.
त्याचं येणं सहेतूक असलं, तरी व्यक्त होणं समाधानी असायचं.
आताही तो येतो.
मात्र रेंगाळतो.. राहतो तिथेच.
मनात राहणं आवडू लागलंय आताशा त्याला.
का?
माहित नाही.
मनातल्या कोणत्या आमिषाला तो भूललाय तेही कळत नाही.
..
..
..
..
..
..
स्वतः ला कोंडून घेणं केवळ मलाच जमतं असा माझा गैरसमज होता तर!! 
...................................................................................................................... पुस्तकातून.