Friday, July 19, 2013


पाहा..
माझी कंबर पार झिजून गेलीय.
हातांचे तळवेही पुरते गुळगुळीत झालेत.
पूर्वी असं इथे विटेवर उभं राहिलं की समोर उभी अथांग गर्दी दिसे.
तीही झिजली आणि दृष्टीचा झोत केवळ या चौथऱ्यापुरताच उरला.
आता या वेशीपलिकडच्या गर्दीचा अंदाज येत नाही.
कपाळावरचा गंधही हल्ली ओघळून पुरता पायाशी येतो.
नाही म्हणायला खांदे आणि गुडघे तेवढे मजबूत उरलेत येवढंच.
 पायात बळ आहे तोवर इथून काढता पाय घ्यावा.
इथे वर्षानुवर्ष ठिय्या मारून उभं राहिल्याने माझ्याच काय तुझ्याही पदरात काही फारसं पडलेलं नाही.
बस झालं आता हे असं स्थितप्रज्ञ उभं ठाकणं.
इतकी वर्ष सतत उभं राहूनही
कंबरेपासून हात विलग करण्याचं स्वातंत्र्य आज मला नाही.
उद्या मी केलंच जरी तसं.. 
तर धर्मांध अविश्वास उफाळून येईल अंगावर.
मग.. इतकी वर्षं असं उभं राहून काय मिळवलं आपण?

म्हणूनच आता कंबरेवरचा हात खाली घेऊन पाहावं म्हणतो.
थोडं माझं अवघडलेपण जाईल.. थोडी तुलाही कवेत घेईन.
शिवाय, ठाम श्रद्धेआडचा फाजिल विश्वासही कळेल आपल्याला.
त्यानंतर मात्र तू म्हणतेस तसं वागेन मी.
इतकी वर्ष काही न बोलता निमूट उभी राहिलीस शेजारी.
आता तुझ्या मागोमाग चालेन म्हणतो.
आता लक्षात येतं...
एका जागी तिष्ठत साचण्यापेक्षा प्रवाही राहिलेलं बरं.
..
..
..
पांडुरंग पांडुरंग
...................................................................  पुस्तकातून.

Thursday, July 11, 2013

हत्या

सहज सुंदर हसू दिसणाऱ्या चेहऱ्यांमागे दडलेल्या मनाचा थांग लागणं दिवसेंदिवस अवघड होऊ लागलं आहे. तुम्ही हसताहात.. हसवताहात..
पण, मनाच्या कोपऱ्यात एखाद्या वेदनेने नखं मारून मारून बीळ तयार केलं असेलही कदाचित.
कदाचित उद्या ही वेदना उफाळून येईल आणि घेईल कवेत तुमच्या इतर सर्व भावनांना.
तेव्हा काय कराल?
नैराश्याने वेढलेल्या वेदनेला मारून टाकाल की स्वतःला?
मला भीती वाटते कधीमधी तुमची.
तुमच्या खरेपणाला आजकाल खोटेपणाचे कोंब फुटू लागले आहेत.
तुमच्या सच्चेपणाला शाप आहे घाईचा.
मला भीती वाटते, की तुमच्या या आनंदी चेहऱ्याला फाडून टाकायला नैराश्याचा एक क्षण पुरेसा पडेल की काय अशी.
कारण हल्ली तुम्ही आत्ममग्न होऊ लागला आहात.
भीती वाटते की हत्येचा सूक्ष्म दर्प तुम्हाला खुणावतही असेल कदाचित. जो मलाच काय, तुमच्या सावलीलाही नसेल जाणवला.
अशावेळी मी काय करायचं?
मला हे सगळं खूप नंतर कळतं हो. मला ऐकू येतं तुमच्या शेवटच्या किंकाळीचं मूक तार सप्तक आणि त्यानंतरची असंख्य निरूत्तर प्रश्नांनी भंडावून सोडणारी गच्च शांतता.
शेवटी शेवटी माझ्या मनात एकच प्रश्न ठाशीव होत जातो..
आज तुम्ही तुमच्या कुटुंबाची हत्या केली आहे.
या गर्भगळीत जिवंत शवांची जबाबदारी आता कोण घेणार?
....................................................................................... पुस्तकातून.

Tuesday, July 2, 2013

तलवार

शेवटी तलवार आहे ती. तीसुद्धा दुधारी.
सांभाळून वापरलीत तर तुमच्या फायद्याची. हां.. भले मुठ तुमच्या हाती असली, तरी एक छोटी चूक पडू शकते महागात. तलवारीला काय हो, आडवा येईल तो कापला जाईल.
नाहीतरी पूर्वीसारखी माणसं उरलीत कुठे हल्ली. फार पूर्वी अगदी तलवारही मोडून पडेल अशी व्यक्तिमत्त्वं असायची समाजात. दगडासारख्या शरीरांत जपलेली संवेदना होती. अशाच माणसांच्या हाती हे शस्त्र दिलं जात असे. नव्हे, अशीच माणसं ही तलवार हाती घ्यायचं धाडस करीत.
आजकाल माणसांचं काठीण्यच कमी होत चाललंय. त्यामुळे थेट हृदयाला छेद होणं सोपं झालंय तिला. शिवाय, आजच्या लोकांची सहनशक्तीही आटलीय. ओरखडा उठला की जणू शिरच्छेद झाल्यागत तांडव सुरू होतं. पण तलवार मात्र तितकीच निगरगट्ट.
तिला काय त्याचं? ती तिचं काम करत राहाते. तिला ना तुटण्याचं भय ना भावना ना जाणीवा.
आपलं काम चोख करणं एवढंच तिला माहीत.
हल्ली तलवारीही कमी झाल्यात आणि ती हातात घेणारी माणसंही.
तात्पर्य..
तलवार धारदार आहे. सांभाळा. दुधारी आहे ती. मनगटात ताकद असेल तरच हातात घ्या. नाहीतर तुमचाच शिरच्छेद होऊन तुमच्या रिकाम्या डोक्याचं रहस्य उघड व्हायचं.
........................................................................................... पुस्तकातून.