Friday, November 30, 2012



00000

सूर्याचं मावळतीला जाणं आता माझ्या सवयीचं होतं.
तो उद्या परत येणार, याची खात्री असल्यामुळेच त्याचं मावळणं तसं चटका लावणारं नव्हतं. उलट आनंदच वाटे त्याची जातानाची रंगांची उधळण पाहून.
पण, परवा पहिल्यांदाच चंद्राच्या मावळतीची चाहूल लागली आणि क्षणभराचा थरकाप उडाला.
चंद्राने असं निघून जाणं मला नवं आहे. उलट तो दिसत नसला, तरी सतत असतोच की सोबत. मग?
गृहित धरणं इतकं जीवघेणं असू शकतं?
मावळतीच्या दिशेने चंद्राचं क्रमण सुरू झालंय. मी हतबल.. हतबुद्ध.
आता आकाश पुन्हा अंधारून येणार.....
............................................................................................... पुस्तकातून.
0000हॅलो..

00000

मी सूर्य असा कुरतडला..
ही सांज अशी विस्कटली..

चंद्रालाही मग मी डसलो,
ही रात्र क्षीण, चुरगळली..

मग स्मरणाच्या झोक्यावरची,
पालवी पोरकी झाली.
.......................................... पुस्तकातून.
00000

000

मालाडवरून ट्रेनने सकाळी ऑफिसला येत होतो.
जोगेश्वरीदरम्यान नेहमीप्रमाणे कडेवर बाळसेदार बाळ घेतलेली एक दरिद्री बाई डब्यात चढलेली मी पाहिली.
बाई भीक मागायची आणि लोकांनी हातावर टेकवलेल्या चिल्लरशी कडेवरचं पोर खेळ करत रहायचं.
भीक मागत मागत ती माझ्यापाशी आली. नेहमीप्रमाणे तिच्या नजरेला नजर न भिडवता मी खिडकीच्या दिशेने पाहू लागलो.
एव्हाना बाई परत फिरली. कडेवरच्या पोराने आपली मान अलगद बाईच्या खांद्याव
र टेकवली आणि माझी नजर त्या बाळाच्या डोळ्यांवर खिळली.
मनात आलं..
हा जन्म घेणं तुझ्या हातात असतं, तर काय केलं असतंस? आला असतास बाहेर? की हा जन्म लाथाडून पुन्हा विरघळून लुप्त झाला असतास आईच्या गर्भात? तुझं असं या जगात येणं पाप म्हणावं की पुण्य?
प्रश्नांनी वेग घेतला..
तोच त्या बाळाने चटकन आपली नजर मला भिडवली. तरल, निरागस, निष्पाप असं कोणीतरी माझ्याकडे तितक्याच थंडपणे पाहात होतं.
ती नजर मला झेपेना.
मी माझी नजर चोरली आणि पुन्हा खिडकीकडे भिरकावली.
पण, या न संपणाऱ्या अन वेगाने मागे सरकणाऱ्या झोपडपट्टीशिवाय मला दुसरं काही दिसत नव्हतं.

No comments:

Post a Comment