Tuesday, October 23, 2018

भिंत

ही चौकट माझी
इथली नीती माझी
वाटणारी भीती माझी
आशांचे धुमारे माझे
अश्रुंचे बांध माझे

माझ्या परोक्ष तू इथे येशील काय?

डोळ्यांतून सांडलेली स्वप्नं माझी,
तुला वाटेवर दिसतील काय?

वारंवार अडकलेल्या श्वासांची जागोजागची पोकळी तुला कळेल काय?

अस्वस्थ  एकटेपणा तुला जाणवेल काय?

इथला रेंगाळणारा वेळ..
माझा माझ्याशी झगडा..
आठवणींचा छातीत पहुडलेला भाला..
माझ्या थयथयाटाच्या पाऊलखुणा..
माझा गरम उसासा..

माझ्या प्राक्तनाचा कपाळमोक्ष..
माझ्या क्षीण आवाजाचे कंप..
माझ्या संवादाचे ओघळ..
न झालेल्या स्पर्शाची आस..
मला होणारे अनपेक्षित भास..

आणि सगळ्यात शेवटी..
इथल्या हवेवरल्या खुंटीवर वेळोवेळी मी अडकवलेले शब्दांचे असे पुंजके..

परत जेव्हा केव्हा येशील..
हे सगळं पाहता येईल का तुला?
माझ्या चौकटीत सामावलेली..
माझी-तुझी
आपली
एक
भिंत..

फिरता फिरता चौकटीत,
तू
इथे
थबकशील काय?

...................पुस्तकातून

No comments:

Post a Comment