Friday, May 22, 2015

वळण

तू जाताना
तुझे काही माझ्याकडे राहिले  होते?
नसावे ना?.
मलाही हेच वाटे कालपर्यन्त.

आता जणवते आहे
तुझं बरेच काही आहे इथे.

सांग तर खरे
मागे राहिले आहे ?
की ठेऊन दिले आहेस..
मुद्दाम?

तू पाहां ना
अलीकडे
हे काय पाझरते आहे माझ्या स्पर्शातून?
ही सचेतन उबदार माया
कुठून आली या तळहातात?
या करारी नजरेत
कुठून आले हे मार्दव?

माझा स्पर्श..
माझी भावना...
माझी दृष्टी
माझी न उरता,
एकात्म पावते आहे
माझ्याच आत कुठेतरी.

तुझ्याशिवाय
जे आजवर मला दिसले नाही कुणात.
ते माझ्यात इतके खोलवर?
दड़वले कुणी?
तू?

गेल्या 22 जन्माच्या शोधाचे हे उत्तर मानावे?
की त्या हट्टाला मिळालेले नवे वळण?

की उत्तरार्धाची ही सुरुवात असावी?
माझे उरले जीवन
पुन्हा मंगलमय बनवणारी?
..................................... पुस्तकातून

Monday, March 30, 2015

साखरझोप


माझ्या समाधानात
तुझ्या आनंदात
माझ्या नैराश्यात
तुझ्या दुःखात
आपल्याला आपण दिसत नाही
आपल्याला आपण आठवत नाही. 

आता दोघादरम्यान आहे
अदृश्य काही
निरूपद्रवी असे फक्त.

एकमेकांच्या तळहाताची ओजळ
झाली आहे कधीच रीती.
आता उरला हाती आहे
काही जुन्या
काही उण्या क्षणांचा प्याला केवळ
या प्यालाचा घोट होणे नाही.
इथे उरते फ़क्त बाष्प प्रीतीचे. 

हळूहळू साखरझोपेत
स्वप्नेही पडतात ती सांजवेळचीच.
निरभ्र आकाश ढगाळते आहे..
दूर सूर्य मा!वळतो आहे..
डोळा मिटतो आहे,
हात सुटतो आहे अशी.. 

मिटतो डोळा मिटू दे
सुटला हात सुटु दे
आठवणीची ही पीड़ा
चितेवर चढूं दे!
..............................................पुस्तकातून

Tuesday, January 6, 2015

दूरवर दिसते काही..

मला आता इथून पुढे निघावं लागेल.
ही इथेच गवसली मला इच्छा.
मला माझ्या असण्याची खात्री झाली होती पूर्वीच.
पण इथे आल्यावरच मला त्याची उंची समजली होती.
माझ्या चालत येण्याचं अप्रूपही मला वाटलं ते इथेच.
दिशांना चारी मुंड्या चित करण्याचं धाडसही इथेच गवसलं मला.
मी इथेच भिडलो शब्दांना.
मी गळाभेट घेतली गंधाची तीही इथेच.
किंबहुना ती घ्यावी कशी हेही इथेच शिकलो मी.
आनंदाचा बहर म्हणा..
खवळलेल्या समुद्राची लहर म्हणा..
इथेच अनुभवता आली मला.
निळ्याशार चांदण्यांची सफर घडता घडता,
मरुन पडलेल्या चंद्राचे सुगावे लागले ते इथेच.
माझ्या पाऊलांखाली अंथरले गेलेले लाल गालिचे इथेच पहिल्यांदा पहिले.
मुखवट्यांची मजा लुटता आली.
भावनांची गोची पाहता आली.
मृगजळी गप्पांचे घोट रिचवता आले.
मृगनयनी कटाक्षांचे बाण चुकवता आले
हे सगळं इथंच तर घडलं.

काही मग्रूर पर्वतांच्या सावल्याही मी इथे नेस्तनाबूत केल्या
त्या सुरुंगांनी गडगडत आलेल्या कातळांनी
माझ्या जखमा मोहरुन गेल्या.
इथल्या गवतांनीच त्या जखमांचे तुरे माझ्या शिरपेचात रोवले.
या तुऱ्यांनी हा मुकुट असा भरुन गेला आहे.
आता हा इथेच ठेवून पुढे गेलं पाहिजे.
..
नव्या तुऱ्यांचा शोध अजून अशांत आहे.
नवा गंध
नवा वारा
बुद्धीचा संग हवा आहे
..
या इथे उभे राहून मी पाहातो दूरवर.
अन मला दिसते सावली हिमालयाची.
पलिकडे दिसते विस्तीर्ण.. शांत, शुभ्र काही.
ती जागा पहावी लागेल.
नवं काही शोधावं लागेल.
इथून आता निघायला हवं.
नवे विचार नवे आचार
हवं सर्व पारदर्शी
मुखवट्यांमागल्या चेहऱ्यांसाठी
माणसांमागे जायला हवं.
............................................... पुस्तकातून


Wednesday, December 24, 2014

कोलाहल

मला चव कळत नाही
माझी भूक भागत नाही

मला विरह पचत नाही
आठव सहन होत नाही

मनात विचार येत नाही
येता थांबता थांबत नाही

मला मी आवडत नाही
मला मी आडवत नाही

मी मला ओळखत नाही
मला मी पटत नाही

इच्छा व्यक्त होत नाही
घुसमट शांत होत नाही

धड़ गिळता काही येत नाही
वा मुकाट बाहेर निघत नाही

वेग जागी थिजत नाही
धावणे पुसता येत नाही

प्राक्तन वाचता येत नाही
नजर प्रारब्धाला भिड़त नाही

आवर्तनाची आस शमत नाही
समेची झिंग सरत नाही

वर्तमानी शेपटावरला पाय
भूत मागे घेत नाही...
...............................पुस्तकातून

Monday, December 22, 2014

आठवण

तुझ्यामाझ्या बोटांमधले
आकाश निरभ्र निळे
चंद्र चांदण्यात न्हाले,
माझे आठवणींचे तळे
................................ पुस्तकातून.

Thursday, December 11, 2014

पाऊलखुणा

चला,
या खोलीतलं
सगळं सामान मी आवरून ठेवलंय.
आवरून म्हणण्यापेक्षा
माझं माझं सगळं मी पुन्हा भरून घेतलंय म्हण. 
आता ही खोली पूर्ण मोकळी झाली पाहा.
एरवी बोलताना,
एकमेकांमध्ये मुरणारे शब्द..
आता मात्र इथल्या भिंतींना धडका देत विखरून जातायंत.
ही आवाजाची कंपन
पुन्हा पुन्हा आपल्याच अंगावर चालून येतायंत.
हं.. 
आता इथे देणारंही कोणी राहिलं नाही.
ना स्वीकारणारं कोणी.
आता इथून निघून जायचं मी फक्त.
उरणारं काही नाही.
ना आक्रंदन.. ना प्राक्तन.
सर्व शून्य. निश्चल. स्तब्ध.
पण साला या पाऊलखुणा बंडखोर.
रिकामपणाला चुरगळून टाकणाऱ्या.
कुणीतरी इथे होत्याची आठवण.
आणि इथे आता कोणीही नसल्याचा पुरावा.
काय करावं यांचं?
पुसून टाकाव्यात का मी त्या?
पण खुणा गेल्या तरी वावर दिसतोच की.
किंबहुना पुसूच नयेत त्या खुणा.
नाहीतरी, पाऊलखुणा पुसण्यासाठी,
‘काळा’ने बागडायला हवंच की खोलीभर.
एकदम सगळं लुप्त होणं सजा आहे.
हळूहळू विरत जाण्यात मजा आहे. 
...................................................... पुस्तकातून.

Saturday, November 22, 2014

अबोल हुंकार

मला खात्री आहे
मी दिलेल्या हाकेला तू साद देशील.
एका क्षणात माझे नैराश्य हिरवे होईल..
मला गवसेल सूर वाऱ्यासोबत घोंगावणाऱ्या पानझडीचा

अशी अलगद येशील चालत,
भेटशील.. बोलशील..
झुरते दुःख हलके करशील.
सांगशील चार गोष्टी धीराच्या..
काही स्वैर सोबतीच्या..
मी साद दिल्यावर.

पण अलीकडे..
भीती वाटते दांभिक ज्वराची.
वाटतं..
पाहता पाहता माझं शरीर होईल ओसाड..
डोळे शुष्क
आणि घसा पुरता वांझ
आवाजाच्या उत्पत्तीला असेल
काळ्या लाळेचा शाप.
छातीमध्ये उरला असेल
नावापुरता श्वास.
आणि डोळ्याभवति आवळली जाणारी काळी वर्तुळे फ़क्त.
डोंबाऱ्याचा खेळ नुसता.
पण मला त्याची तमा नाही
.
आत्ममग्न..
तिरपांगड़ा संघर्ष म्हण याला हवं तर.

तुला या विस्कटलेल्या घडीची
चाहूल लागेल नक्की.
त्याचंही मला अप्रूप नाही.

पण हां अबोल हुंकार कानी पडल्यावर..
तू काय करशील?
प्रेक्षक होशील....
की प्रणय?
.....................................................................पुस्तकातून