Monday, September 1, 2014

सांग ना..


मला वाटते आता सर्व संपले आहे.
गरज, सोय, सवय या सर्व शब्दांनी आपले अर्थ म्यान केले आहेत.
म्हणून पूर्वीसारखा उच्चार होत नाही यांचा.
ना ओठ विलग होत..
ना जीभ पुढे सरसावत..
शब्द अबोल.. गालांमध्ये दडलेले.
बरेच गिळलेले..
काही लाळेत विरघळलेले..
गिळलेल्या शब्दांचं संचित पोटात एकटं..एकाकी.
श्वासावाटे येणारे आपुलकीचे फक्त बुडबुडे..
दिसायला पुरते आकर्षक.. पण तितकेच पोकळ.
सगळं सुटत चाललेलं.
थांबता न थांबणारं..
हे काय आहे?
दिसत नाहीय नीट,
ना समजत.
सगळे खुंटते आहे तासागणिक
आखूड होते आहे.
वाढ होतेय ती केवळ पोटात असलेल्या थंड गोळ्याची.
गारठा वाढतो आहे आतून.
प्राणवायूही संपत आला आहे.
तुझ्यामाझ्या दरम्यान नेमकं काय उरलंय कळत नाही.
ना संग.. ना वियोग.
सर्व काही स्थिर. नेटकं.
जिथल्या तिथे.
..
..
..
..
..
अचेतना अशीच असते ना?
या संपण्यावर मी विश्वास ठेवायचा?
की तू आपणहून श्वास फुंकणार आहेस?

.................................................. पुस्तकातून

Monday, June 30, 2014

अंतर

मला वाटते,
श्वासाच्या त्या टोकाला कालपर्यंत कोणी होते.
कधी खूप जवळ आल्यावर
त्या टोकाला असलेला श्वास बोलायचा.
मी आहे म्हणायचा.
माझ्या उच्छवासात असलेल्या रित्या जागा मूक भरायचा.
आता लक्षात येते,
माझ्या उच्छवासात कोणी पलिकडे,
आपला श्वास शोधायचा.
काळ्या मिट्ट अशा पसरलेल्या रात्री,
कधीमधी एकट्या पडलेल्या माझ्यात तो निश्चयाचे इरादे भरायचा.
ही दोन टोके निकटही यायची सावकाश.
जवळ.. खूप जवळ.
जणू दोन भिन्न अवकाशाची घट्ट वीणच ती.
निमूट प्रणय चालायचा महणा हवे तर.
यातून जन्माला काय यायचे समजत नसे.
अगदी कालपर्यन्त नव्हते ठाऊक.
आज इथे थोड़ा टेकलो..विसावलो
आणि कधी नव्हे ते या अंधारात किलकिल्या नजरेने पाहिले
अन लक्षात आले,
 कि त्या घट्ट विणेने
माझे एका श्वासाचे अंतर
सुबक, रेखीव बनवले आहे
.......
पुस्तकातून

Tuesday, June 24, 2014

तेच ते

इथे मक्तेदारी शब्दांचीच  फ़क्त.
तेच शब्द .. अर्थही तोच..
उच्चारही ठरलेला आणि त्याचा वापरही..
तोच चन्द्र.. तीच चंद्रिका..
त्याच भावना आणि वेदनाही तितकीच.
शब्द.. ओळीवरून घसरणरे..
अर्थाचे गर्भारपण न पेलवणारे..
नुसते नेत्रदीपक वांझ फुगव्टे..
सर्व काही दिसणारे..
दाखवता येणारेच सोज्वळ फ़क्त.

कवितेला रोमांचित करणारा प्रणय इथे नाही.
इथे नवा जन्म नाही..
ना पुष्ट वाढ प्रतिभेची.
माझ्या पदरी मी पाहातो डोकावून..
..
..
..
आता इथे उरलेत ते केवळ
टोकदार.. थेट व्यक्त होणारे
सातत्याने दुर्लक्षित झालेले काही.
...........................................पुस्तकातून

Monday, May 5, 2014

समज

नेमकं काय झालं
किंवा काय होतं कळत नाही.
पण, कुणीतरी पुरचुंडी उघडतो..
कुणीतरी हात घालून अलगद,
येतील ते शब्द उचलतो.
भिरकावतो मेंदूतून मनाकडे.
साला मनही हुशार.
दिले कुणीतरी म्हणून वेचत नाही काही.
तेही थबकतं.
पाहातं..
हे असं पाहता आलं पाहिजे शब्दांकडे.
शब्द तेच दृष्टी वेगळी.
दृष्टी बदलली की अर्थ उमलतो.
हे असं जमलं पाहिजे.
मग मनधरणी कायमची ठरलेली.
मनही बेणं.
तळहातांच्या होणाऱ्या कमंडलूची वाट पाहणारंं.
कोणता शब्द काय लेवून पडतो ते मी फक्त पाहायचं.
ओंजळ भरली की ती रिती करावी नितळ कोरेपणावर.
काय प्रगटतं..
कसं उमटतं..
देव जाणे.
पण, त्या पुरचुंडी उघडणाऱ्या कुणा एकाला,
नेमकं म्हणायचंय काय..
ते मला तिथे समजतं.
आता मला एक लक्षात आलंय.
पुरचुंडीतला अर्थ गवसण्यासाठी,
कोरेपणा हवाच. 
.............................................. पुस्तकातून

Sunday, April 20, 2014

उपसा


सर्वात आधी मला तुझा मेंदू उपसू दे.
बघू दे नेमकं काय कुठे कसं ठेवलंयस तू ते.
काही महत्त्वाच्या गोष्टी..
काही महत्त्वाच्या घटना..
काही महत्त्वाची माणसं..
असं सगळं तुला अचानक सापडेनासं होतं..
म्हणजे नक्की काय घडतं?
बघू देत ना मला आपल्या गप्पा..
आपले तंटे
आपले फुगवे..
एखादी बोलकी दाद
एखादा अबोल संवाद .
दिसू दे तुझ्या डोळ्यांमधलं
तू आपणहून साठवलेलं माझं संचित
कुठाय आपण एकमेकांना दिलेली
स्पर्शाची चोरटी मोकळीक?
ती जाणवू तरी दे निदान
..
..
कुठायत आपले शब्द..
तू दिलेले काही..
काही मी झेललेले?
....
जे होतं ते आहे फसवं?
की नव्हतंच कधी काही?
..
..
..
..
हं
नाही म्हणायला,
इथे या बंद, भक्कम पिंजऱ्यआड हे गाठोडं दिसतं आहे.
अस्पष्ट.
काय आहे कळत नाही.
पण, ती सुकलेली प्राजक्ताची वेणी तेवढी दिसतेय.
तशीच बिलगलेली.
तेंव्हाची.
..
..
..
आता....
आता मला तुझ्याकडून काही नकोय.
त्या माझ्या एका कोंडलेल्या श्वासाला
मोकळीक दे
लवकर!
..................................................... पुस्तकातून.
 .







Sunday, April 13, 2014

मला मी



मी
मी कोण?
मी अमुक.
ही झाली ओळख.
मी त्यापुढे येतो खरंतर.
मग?
मग मी कोण?
मी.. माहित नाही.
म्हणजे?
म्हणजे मी कुणीतरी होतो,
हा इथे येईपर्यंत.
पण इथे
या निर्मनुष्य बेटापाशी आल्यावर,
मला मी स्मरत नाही.
मला मी ​चिकटत नाही.
मला मी भिववत नाही.
इथे माझ्यातून मी वजा होतो.
उरतं काय ते मला आठवत नाही.
पुरणार काय याची मला तमा नाही.
मला मीचा विसर पडतो
मला माझा विसर पडतो.
मी मला तुझ्यात घेण्याचा आकांत मांडतो
मी रडतो.
झगडतो..
मला मी पुन्हा बिलगतो.
त्याच प्रहरी,
मी मला पुन्हा गवसतो.
..................................................... पुस्तकातून.

Wednesday, March 12, 2014

आज तुझ्याशी बोलावं वाटत नव्हतं.
पण मग म्हटलं, तसं करून चालणार नाही. आज संवाद साधावा लागेलच.
मी बनवलेली सर्वांत सुंदर गोष्ट म्हणून मी तुझ्याकडे पाहात आलो. आजही पाहातो. कारण, तुझ्या निर्मितीनंतर तुझ्याइतकी सुंदर संतुलित निर्मिती मला जमली नाही. किंवा मला ती करावी वाटली नव्हती.. कालपर्यंत.
आज मात्र मला वेगळंच वाटू लागलं आहे. तुझा मला फार उपयोग होणं सोड. उलट आता उपद्रव होऊ लागला आहे. या ना त्या कारणाने मी तुला ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण, तू मात्र उन्मत्त हत्तीसारखा धुडगूस घालतो आहेस माझ्या छाताडावर. मी छोटे भूकंप करून पाहिले. एखाद दोन त्सुनामी आणून पाहिल्या. वादळाची तर गणतीच नको. तरीही तू काही भानावर यायचं नाव घेईनास.
बघ, आता हातात गारपीट घेऊन मी कणखरतेची एक पायरी वर चढलो आहे. मला दुसरा पर्याय नव्हता. भरल्या डोळ्यांनी मी माझ्याच हिरव्यागार दुर्मिळ निष्पाप निर्मितीला मृत्यूपथावर पाठवलं. असंख्य निरागस प्राणीमात्रांना पुन्हा माझ्याकडे बोलावून घेतलं. वाटलं, त्यांना नेण्यापेक्षा साल्या तुलाही पुन्हा खेचावं आपल्याकडे कायमचा. तुझी जातच नामशेष करावी एकदाची. मग, परत वाटलं, की माझी ही सर्वांग सुंदर निर्मिती आहे. एवढ्यात नको हात लावायला. तुझे डोळे उघडले, तर विज्ञान, तंत्रज्ञान आदींच्या साह्याने तू पुन्हा नवनिर्मिती करशील. म्हणून बाकीच्यांचे बळी घ्यावे लागले मूर्ख मनुष्या.
हातची वेळ निसटते आहे. आता मात्र मी केवळ तुझ्यावर विसंबून राहणारा नाही. तुझ्यापेक्षा सुंदर निर्मिती करण्यासाठी मी माझी सर्व शक्ती पणाला लावली आहे. ज्याक्षणी मला तुझ्यासाठी पर्याय सापडेल, त्याक्षणी मी तुला संपवण्याचा चंग बांधेन.
वेड्या, मीच मांडलेला हा पसारा मोडणं दुःखदायक असेल. पण, अशक्य नाही. कारण नवनिर्मिती पुन्हा माझ्याच हाती आहे.
या पुढचा दणका मात्र मोठा असेल, की तुझा इतिहास, वर्तमान आणि भविष्य तीनही काळ पुरते शुन्यात जातील.
तुला काय करायची ती तयारी कर.
....................................................................... पुस्तकातून.