Thursday, October 10, 2013

स्वागत

अरे तू?
एकदम अचानक आलीस..
काहीच कळवलं नाहीस. ना साधं पत्र.. ना फोन.. ना इमेल.
अशी एकदम कशी काय?
बरं आलीस ते आलीस.. वर अशी एकदम थेट आत..
नाही.. नाही.. राग नाही.
घर तुझंच आहे म्हणा. परवानगीची गरज नव्हतीच.
थोड कळवलं असतंस, तर जुजबी का होईना तयारी करता आली असती..
कसली म्हणजे? तुझ्या स्वागताची.
अहं. आताही करता येईलच. पण, आधी या धक्क्यातून तरी सावरू दे.
तुझं बरंय..
हे असं एकदम येऊन असं सगळं घर एका क्षणात भरून टाकलंस.
मलाच सुचेना बघ काय कराव ते.
काय घेणार? काय आवडतं तुला?
थांब, मीच देतो तुला काहीतरी छान.
अर्रर्र.. पण हे असं होतं..
तू अशी अवचित आल्यामुळे, आत्ता माझ्याकडे काही नाही द्यायला तुला.
नाही म्हणायला तू येताना आणलेलं समाधान तेवढं आहे माझ्यापाशी.
ते मात्र मागू नकोस.
एकदा दिलेली गोष्ट पुन्हा मागत नाहीत आपल्याकडे.
आत्ता आलीयेस. आता असणारच आहेस सोबत. आराम कर.
तोवर मीही ताळ्यावर येईन थोडा.
त्यानंतर सगळे लाड पुरवेन तुझे.
शब्द आहे माझा.
....................................................................... पुस्तकातून


Friday, October 4, 2013

आनंद आणि आकाश


दुःख सोसता येतं. तसा साला आनंद घेता यायला हवा.
..
सोसलेलं दुःख दिसतं माणसाच्या चेहऱ्यावर. आनंदाचं तसं नाही नै.
आनंदाची आलेली लाट कधी ओसरते ते सालं जाणीवेलाही उमगत नाही.
..
आनंदाची व्याख्या काय?
..
आनंदाला तळ असतो काय?
..
आनंदाच्या तळाशी काय असतं?
..
आनंदाची घनता एकसमान असते.. की चढती.. की ओसरती?

एकापेक्षा दोन.. दोनापेक्षा चार आनंद झाले तर? तर व्यक्त कसे करायचे?
..
आनंद होतो. आणखी आनंद होतो. मग तो आनंद गगनात मावेनासा होतो.. असं म्हणतात. मग गगनात न मावणाऱ्या आनंदाचं पुढं काय होतं?
..
आनंदाचं डिसेक्शन करून पहायला हवं.
दुःख त्याबाबतीत सुखी आहे. कारण शोकात्म क्षणांच्या चिरफाडीची गरज नसते.
या सुखाचा आनंद दुःखाला होत असेल काय?
दुःखाला झालेल्या आनंदाची व्याख्या काय?

बरं. हे सगळं बाजूला ठेवू.
..
..
मला आनंद दिसतो?
कसा?
आनंद आहे.. ऐसपैस.. उनाड.
पण, आनंदाला तळ नाही. आनंद मला खोलात नेत नाही.
उलट वर आणतो थंड दरीतून.
भिजवतो.. आणि आणून ठेवतो उघड्यावर.
आनंदापेक्षा माझं मन हलकं आहे बहुधा.
सालं.. आनंदात.. आत बुडत नाही.
आनंदाचा केवळ स्पर्शच हा.
फक्त पडून रहायचं या विस्तीर्ण आनंदावर.
हे असं वरच्यावर तरंगताना घ्यावी वाटते, आनंदातली एखादी डुबकी.
म्हणून मी हळूच डोळे उघडतो..
त्यावेळी माझ्या लक्षात येतं,
या आनंदावर पहुडलं की एरवी माझ्या डोळ्यात मावणारं माझं आकाश इथून मला दिसत नाही.
................................................................................... पुस्तकातून.
 

Wednesday, September 25, 2013

सूचन


तुझ्या डोळ्यांमध्ये आज आकंठ बुडून जावं वाटतं.
असं पाहाणं नवं नाही म्हणा.
तरी आज काहीतरी वेगळं सूचन होतं आहे.
एरवी तुझ्या डोळ्यांमध्ये असलेल्या बहुरंगी चकत्यां मला मोहून टाकायच्या.
त्यांच्यासाठी मग नाइलाजाने तुझ्या डोळ्यांचा पिच्छा पुरवावा लागे.
आजही मला त्या विश्वात्मकी रंगाने लुब्ध केलं.
इतकं, की तपश्चर्या भंग व्हावी.
पण त्यांचं आजचं काम बहुतेक तेवढंच होतं.
आज मला भूरळ पडते आहे ती या मधोमध असलेल्या कृष्ण कंच अवकाशाची.
ही टीचभर जागा लपेटून घ्यावी वाटतोय अंगभर.
लुप्त होऊन जावं का या भोर अवकाशात?
तुझ्या स्वप्नांचं उगमस्थान शोधण्यासाठी?
त्या ठिकाणचं ओंजळभर पाणी निदान पाहता तरी येईल.
त्यामुळे कदाचित पाझरतील डोळे.
 ..
..
..
..
बघितलंस..
या सगळ्या प्रवासात,
तिथे उजळून निघालेला सावळा चंद्र पाहायचा तेवढा राहिला.
.................................................................................................. पुस्तकातून

Sunday, September 15, 2013

छत्रपतींचा मला अभिमान आहे, कारण...

शिवाजी महाराजांचा मला कमालीचा अभिमान वाटतो.
का?
कारण, शिवराय माणूस होते. माझ्यासारखेच दोन हात, दोन पाय, दोन डोळे, एक मेंदू असलेला हट्टाकट्टा मनुष्य होता तो. तरीही त्यांनी आपल्या मनगटातल्या ताकदीने स्वराज्य उभं केलं. शिवराय देव असते तर कदाचित आज वाटणारा अभिमान वाटला नसता मला. कारण, देवच तो. त्याला ‘काहीही’ शक्य आहे. त्यात फारसं कौतुकास्पद ते काय? उलटपक्षी प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करणारे शिवराय मला जास्त प्रिय वाटतात. प्रेरणा देतात.
तसा मला साईबाबांबद्दलही आदर वाटतो.
कारण तोही माणूसच होता. अपूर्व मायेने.. अमाप कष्टाने त्या माणसाने समाजाला शहाणं करण्याचा प्रयत्न केला.

अगदी आजचं बोलायचं तर बाळासाहेब ठाकरेंचा बाणाही मला ​अचंबित करतो.
कारण, बाळ ठाकरे नावाचा एक चित्रकार साठच्या दशकात मैदानात उतरतो आणि तमाम मराठी जनतेला आपलंसं करतो, असं देवाचंही उदाहरण नाही. एक माणूस ‘चला’चा नारा देतो आणि सबंध महाराष्ट्र सोबत चालू लागतो. ही मला कमाल वाटते.
अशा निकषांनी मला संभाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज यांच्यापासून महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, वल्लभभाई पटेल, नेल्सन मंडेला, मदर टेरेसा, दादासाहेब फाळके, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, रजनीकांत, झाकीर हुसेन, ए.पी.जे अब्दुलकलाम, एस.एल.भैरप्पा ही सगळी सगळी माणसं होती.. आहेत. म्हणून त्यांच्या कामगिरीचं मला नेहमीच अप्रूप, कौतुक वाटत आलं आहे.

आता जरा गल्लत झाली आहे.
या सगळ्या माणसांना दैवत्व प्रदान करण्याचा हावरट हेतू आकाराला येतो आहे.
माणसातलं माणूसपण संपवण्याच्या वाटेवर असलेल्या या मारेकऱ्यांना कोण वठणीवर आणणार हा प्रश्न सतत मनात घर करतो.
मनुष्य वंशात जन्म घेऊन त्यांनी पराक्रम केल्यामुळेच त्यांचं मोठेपण सिद्ध होतं. शंकराच्या सागरप्राशनापेक्षा शिवरायांनी करवून घेतलेली आग्र्याची सुटका मला जास्त अचंबित आणि प्रेमात पाडते ती त्यामुळेच. मग या अशा हिमालयाएवढ्या लोकांना जर आपण देवपण दिलं तर त्यांच्या कर्तृत्वाचा तो अपमान आहे, हे आमच्या अजून लक्षातच येत नाही.समजूनच घ्यायचं नाहीय आम्हाला.
कदाचित दैवत्व दिलं की काम सोपं होतं. वर्षातून एकदा सेलिब्रेशन आणि रोज उदबत्तीच तेवढी लावावी लागते.

दुर्दैवाने मी त्याच समाजाचा घटक आहे.
............................................................................................. पुस्तकातून

Friday, August 30, 2013

प्रतीक्षा


ऐन रात्री सगळं शांत होतं. सबंध समाज निद्राधीन असताना मी मात्र सताड जागा असतो. एरवी नकळत हातातून सुटत जाणारी वेळ आता सतत धडका देत असते. एकाच लयीत मेंदूवर साठवेळा धडका देणारा सेकंद मिनिटामिनिटाने पुढे जात असतो. नजरेसमोरून कोणीतरी मुठीतली वेळ बोटं पिरगाळून खेचून नेतो. या संघर्षातून बाहेर पडायला मी माझे डोळे गच्च मिटतो. हात उशाशी घेतो. पण काही क्षणांपुरतं.. रोज येणारं.. रात्रीचं, काही तासांसाठीचं मरण मात्र मला येत नाही. त्याचवेळी तू मात्र अलगद निजून गेलेली असतेस दुसऱ्या जगात. तुझा देह माझ्याशेजारी शांत असतो आणि तुझे मिटले डोळे मात्र पाहात असतात तुझ्या मनस्वी विश्वातल्या नव्या स्वप्नांना.  
तुझा हेवा वाटतो.
एवढ्यात तुझा एक हात माझ्या छातीवर नकळत पडतो आणि सेकंदाच्या सतत बाहेरून येणाऱ्या धडकांशी माझ्या देहाने चक्क दोन हात केलेले मला जाणवतात. बाहेरच्या टीकटीकाटाला आतल्या धडधडीने उत्तर दिलेलं असतं. परंतु, नंतर हे दोन्ही आवाज एकच असल्याचं माझ्या लक्षात येतं.कोणीतरी बाहेरून मेंदू पोखरतंय आणि काहीतरी आतून हृदयाला डिवचतंय असं वाटू लागतं. मी हतबुद्ध होऊन पडून राहतो निपचित.
मी वेळ प्यायलो? की वेळेने मला गिळून टाकलंय ते कळेनासं होतं. मी पुन्हा माझे डोळे गच्च मिटतो. परंतु, मला झोप लागत नाही.
काय गंमत आहे नै. रोज जगण्याची उमेद घेऊन चालणारा मी, आज या दयाघनाकडे भीक मागत असतो ती एका रात्रीपुरत्या मरणाची.
................................................................................................... पुस्तकातून.

Tuesday, August 13, 2013

बऱ्याच वर्षांनी तू पुन्हा माझ्यासमोर येणार. कल्पनेनंच धडधडू लागलंय.
भीतीने नव्हे. पण, अनेक वर्षांपासून भक्कम उभा असलेला माझ्या नजरेआडचा बांध तुझ्या येण्याचा लोट पेलू शकेल की नाही, अशी चिंता वाटते. आजवरचे अनेक प्रवाह येताना दिसले.. काही अनपेक्षित येऊन धडकले. काही नुसतेच येऊन थबकले. पण, त्यांना पेलणं फार सोपं होतं. कारण, प्रलयातून तयार झालेला बांध होता तो. जगबुडी एकदाच येते म्हणतात ना.. तसंच झालं नव्हत का. त्यामुळे या नवनिर्माणानंतर खरंतर मी निर्धास्त होतो. पण, आता तुझ्या येण्याच्या शक्यतेने मी काहीसा गर्भगळीत झालो आहे.
काय करावं.. तुला टाळावं का? ते माझ्यादृष्टीने खरंतर फार सोपं आहे. मग वाटतं का टाळावं आणि कशासाठी? कुणाला वाटेल मी असा लिहितो आहे म्हणजे, तुझ्या-माझ्यात काही असेल भयप्रद.. किंवा अनैतिक काही.. असं तर नाहीच. उलट होतं ते फार प्रेमळ.. मायेपलिकडचं असं काही. मग?
मग कधी वाटतं एकदा भिडूच देत प्रवाह. होऊच देत नजरा नजर.
नेमकं काय वाटतं ते तरी कळेल.एकदा गमेल तरी की आता तो धक्का पचवायची ताकद उरलीये स्वतःत की वयापरत्वे मीही झुकू लागलोय काळापलिकडच्या वृद्धत्वाकडे.
कधी वाटतं, त्यानिमित्ताने कळेल तरी की खूप वर्षांपूर्वी तुझ्या जाण्याने ​ओल्या झालेल्या या भिंतींमध्ये त्यावेळी भोगलेलं थोडं काही उरलंय.. की सगळंच कोरडं ठणठणीत असं सुकून गेलंय सारं. 
कधी वाटतं, गेल्या अनेक वर्षांपासून मी जो ओलावा शोधतो आहे तो पुन्हा मिळवण्यासाठी या स्थितप्रज्ञ बांधापलिकडून जागा करावी का हळूच.
वाटतं, त्याच ओलाव्यावर नवी हिरवी शाल पांघरली जाईल.. हळूच एखादं पान डोकावेल नव्याने. कदाचित नवी जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी म्हणून का असेना, तुझी अबोल भेट अनुभवावी काय?
.................................................................................................. पुस्तकातून.

Thursday, August 1, 2013

एकाचे दोन
दोनाचे चार
चाराचे आठ
आठाचे सोळा.
तुकडे तुकडे होऊ देत सारे.
लहान लहान
एकदम छोटे
इतके बारीक की
गरज वाटली पाहिजे एकमेकांची..
नव्याने उभं राहण्यासाठी.
नव्याने काही घडवण्यासाठी.
म्हणजे त्या निमित्ताने तरी पुन्हा एकजीव होऊ.
आपल्या सर्वांना नव्याने एकरूप होता येतं का.. ते तरी पाहू.
................................................. पुस्तकातून.